अरंगी सूराच्या
शोधात
अंजली मालकर
शास्त्रीय
संगीत गायनाचे बाळकडू शब्दशः बाळ असल्यापासून आईने दिल्यामुळे रागदारी ख्याल म्हटल्यावर
रागाच्या आलाप, ताना ‘आकारात’ म्हणायच्या असतात हे ‘शास्त्र’ असल्यासारखे ठरलेले
असते, असा समज अनेक वर्षे होता. ते का म्हणायचे, कुठे म्हणायचे असे प्रश्नच मुळी मला
आणि माझ्याबरोबर गाणं शिकणाऱ्या मैत्रिणींना कधी पडल्याचे आता आठवत नाही. ‘आकारात’
गायचं म्हणजे गायचं ! त्यात माझी आई दट्टा घेऊन माझ्याकडून ते करवून घ्यायची.
जेवायला जेवढ्या सहजपणे आपण ‘आ’ करतो, तेवढ्याच सहजपणे मी गातानाही ‘आ’कारात गाऊ
लागले. (छोट्या गावांमधून गाणं शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांना आकारात गाणे खूप
अवघड जातं, हे या संदर्भाने मला महत्वाचे वाटते). काही वर्षांनी आकाराच्या बरोबर
इकार, उकार, मकार मंडळी देखील महत्वाची असतात आणि ख्याल गायनात पण शब्दांचे
नादसौष्ठव पहायचे असते, हे पण कळाले. काही विद्यार्थ्यांना या गोष्टी त्यांच्या
गुरूंकडून लहानपणीच कळतात, काहींना त्या उपजत येतात, तर काहींना त्याचा अभ्यास
करावा लागतो. माझ्याबाबतीत मात्र गाणं शिकण्याच्या प्रवासात आधी अडखळणे, मग का
अडखळले याचा बोध घेणे आणि मग शोध अशी वहिवाट राहिली आहे. हा ‘समज’दार सोबती माझ्याबरोबर
सदोदित राहिला आहे.
मध्यंतरी
अशीच तारसप्तकातल्या षड्जाला अडखळले. काही केल्या मला हवा तसा तरल, सहज ‘सा’
आकारातून येईना. विनाकारण जोर लावावा लागत आहे, हे जाणवत होते. मी अस्वस्थ झाले.
मदतीचे हात होतेच, पण प्रयत्न माझे मलाच करावे लागणार होते. तसे पाहिले तर
पुण्याची हवा मला मानवली नव्हती. इथे आल्यापासून सर्दीची त्रैमासिक सभा ठरलेली
असायची. शहरातली हवा बदलली की माझा मूड बदलायचा. आभाळात ढग आले की माझ्या मनावर
मळभ दाटायचे. हवा पालट, कस्तुरी हुंगणे पासून स्टीरॉइड पर्यंत असे अनेक वर्षे अनेक
उपचार केल्यावर निसर्गोपचारातून रामबाण उपाय सापडला. त्यामुळे माझ्या नाक, कान,
आणि कपाळाच्या पोकळ्या मोकळ्या झाल्या. अनेक वर्षांनी मी ‘मोकळा श्वास’ अनुभवला. आवाजातील
घुमार, हलकेपणा ऐकून मला खूप बरं वाटलं. तरी पण तार षड्जाचा तिढा काही सुटेना.
बुद्धी आणि गळ्याचा मेळ काही केल्या जुळेना. ही घालमेल पाहून गुरुजींनी
आवाजतंत्राचे तज्ञ श्री राजेंद्र मणेरीकर यांच्या ‘आवाज साधना’ शिबिरात जाण्याचा
सल्ला दिला. वर्षभर चालणाऱ्या या अभ्यासक्रमातून, किमान ज्ञानात तरी भर पडेल अशा
माफक अपेक्षेने मी प्रवेश घेतला. हा वर्ग त्यांचे शिष्य जयंत केजकर घेणार होते.
विषयाचा परिचय व्हावा म्हणून मणेरीकर सरांनी एक प्रस्तावना वर्ग घेतला. नादाचे
अरुपत्व, सूर व स्वरातील भेद, आवाजाच्या तंत्र आणि मंत्रातील फरक अशा अनेक छोट्या
मोठ्या गोष्टींच्या चर्चेने माझे कुतूहल जागे झाले. वर्गात शिकण्याची प्राथमिक
तयारी या चर्चेने पूर्ण झाली. अभ्यासक्रमाला येणारे अनेक विद्यार्थी आणि जयंत सर
यांचा माझा तसा जुना परिचय असल्यामुळे वर्गात अनौपचारिक वातावरण होते. आठवड्यातून
दोन तास वर्ग चालणार होता.
पहिल्या
दिवशी उत्सुक विद्यार्थी- विद्यार्थिनी जयंत गुरुजींसमोर अर्थगोलाकार करून बसले.
गुरुजी देखील नव्या मुलांना बघून उत्साहात होते. गाण्याच्या तयारीने आलेल्या
विद्यार्थ्यांना पहिला धडा मिळाला तो समस्थितीत उभे राहण्याचा. शरीर संपूर्ण सरळ
रेषेत ठेवण्याचा ! गाण्याच्या नादात आपण आपल्या शरीर रचनेकडे किती सहजपणे पाहतो हे
या निमित्ताने लक्षात आले. दीड पायावर उभे राहणे, खांदे पाडणे, मान आणि नजर सरळ न
ठेवणे, पायात कमी, जास्त अंतर ठेवणे, असे अनेक छोटे मोठे दोष आणि त्यामुळे आवाज
निर्मितीमध्ये आलेले दोष देखील व्यवस्थित कळले. नव्या दृष्टीने आता आम्ही शरीर
रचनेकडे पाहू लागलो. दोन्ही हात कमरेवर ठेवून ‘विठ्ठल मूर्ती’ होण्यात मजा वाटू
लागली. ताणरहित समस्थिती साधल्यावर आवाजनिर्मितीचा अनुभव मिळाला आणि संपूर्ण विचार
प्रक्रियाच बदलून गेली. या नंतर गुरुजींनी दुसरा धडा दिला तो जबडा उघडून स्वतःच्या
स्वरपात्राची (vocal chords) ओळख करून घेण्याचा. माझा असा लाडका समज होता की मी
फार सुंदर आकारात गाते. पण वास्तवात स्वरपात्रातून येणारा आकार आणि नादाच्या निकोपपणात
गफलत होत होती. आकाराचीच वेगवेगळी रूपे बघून मी आश्चर्यचकित झाले. स्वरयंत्रापाशी सूराचे
आकार, इकार, उकार तयार होताना जबड्याची, जिभेची, दात, हिरड्या आणि ओठांच्या
ठेवणीकडे मी आता सजगपणे न्याहाळू लागले.
बुद्धीने
एखाद्या आकाराचा विचार करताना, व त्या अमूर्त स्वराकाराला स्वरयंत्रावर ठेवताना
त्याच्याशी संबंधित मुखावयवात कसा बदल घडतोय याचा प्रत्यक्ष अनुभव घेताना शरीरातील
सगळ्या संवेदना जागृत व्हायच्या. मनावर कुठलाही अनामिक ताण आला की स्वराकारावर नकळत
कसा परिणाम होतो आहे, याच्या जाणीवेने मी स्तिमित झाले. अंतर्मनाच्या संवादाचे
प्रत्यक्ष दर्शन मुखावाटे येणाऱ्या स्वरातून पाहताना मी आनंदित झाले होते. स्वतःला
बघण्याचा आनंद होता तो. सुराला ताकद न लावता, विनासायास मुखातून बाहेर टाकताना येणारी
अलवारता निरखताना माझेच मन मोहून जात होते. ज्या तरल नादाची अस्पष्ट प्रतिमा
माझ्या मनात होती, ती प्रत्यक्षात साकारताना होताना झालेला स्वप्नपूर्तीचा आनंद शब्दापलीकडचा
होता. माझ्या सूराबरोबरच दुसऱ्यांचे सूर ऐकताना ते नव्याने समजत होते. सूर लावताना
त्याचा भावात्मक विचार( मींड, कण, गमक इ.) न करता तंत्राच्या अंगाने विचार करायला
आम्ही आता शिकलो होतो. गळ्यातील सहजनाद ‘आकार’ जेव्हा सरकत सरकत उंच पट्टीत जातो आणि
जिभेचा मागचा भाग मागे जाऊन पुढचा भाग खाली ठेवला जातो, तेव्हा त्या नादाला पौर्णिमेची
शीतलता लाभते. जयंत गुरुजींनी आकाराबरोबर इकार, उकार, ओकार, मकाराचे घुमारदार
उच्चारण करताना केलेली जबड्याची ठेवण, ओठांच्या हालचाली सविस्तर सांगून त्या
आमच्याकडून करवून घेतल्या. या स्वरांतून उमटलेले चपटे, गोल, तीक्ष्ण नाद,
त्यांच्या संयोगातून झालेल्या लयदार नादरेषा बघताना आमच्यातील शैशव जागे झाले.
स्वरांच्या
अभ्यासाबरोबर व्यंजनांचा अभ्यास करताना त्यांना चिकटलेली बाराखडी उच्चारण
शास्त्राचा नवा पैलू सांगून गेली. गाताना व्यंजनांचे स्वर वाढवायचे तर व्यंजनांची
स्पष्टता संभाषणात कशी प्रभावी ठरते, हे या निमित्ताने समजले. त्यावेळी घुमारदार
व्यंजनांचा प्रभावी उपयोग करणारे कुमार गंधर्व आठवले. ‘ह’चा उच्चार करताना
व्यंजनात ओलसरपणा कसा ठेवावा हे कुमुदताईंनी सांगितल्याचीही आठवण झाली. वर्षभरात
मला या विषयाचा आवाका समजला. त्याचे महत्व, आणि गरज सुद्धा लक्षात आली. प्राचीन
काळी यज्ञवेदीसमोर उद्गाता सामाचे गायन करताना उच्चारांच्या बाबतीत दक्ष असे, कारण
विशिष्ठ पद्धतीच्या उच्चारणाशिवाय त्या कार्याची फलप्राप्ती होत नसे. हा वर्ग
संपल्यावर सहज माझ्या मनात आले की, त्या काळचा फलप्राप्तीचा अर्थ स्वरोच्चारणातून
निर्माण होणारी नादवलय तर नसतील !
आवाज
साधनेचे तंत्र आणि मंत्र सांगताना श्री राजेंद्र मणेरीकर आणि त्यांचे शिष्य श्री
जयंत केजकर आणि श्री सचिन चंद्रात्रे यांनी त्याच्या प्रयोगिकतेवर भर दिला आहे.
त्यांनी माझ्यासारख्या अनेक गायकांना बोट धरून हा अनुभव घडवला. आज मी जेव्हा
तंबोरा घेऊन गायला बसते आणि आकार लावते, तेव्हा आवाजसाधनेचे धडे डोळ्यापुढे येतात.
मी लगेच दक्ष होते आणि रागांच्या अनंतरंगी शिंपल्यातील अरंगी स्वरमोती आपल्याला
गवसतो का याचा शोध पुन्हा सुरु करते.
No comments:
Post a Comment