नामदेवांचे संगीतशास्त्र अंजली मालकर
महाराष्ट्रातील संतांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा असे लक्षात येते की संत
नामदेव महाराजांचे वेगळेपण हे त्यांच्या सांगीतिक ज्ञानाचा, त्यांनी वारकरी
संप्रदायाच्या प्रचार आणि प्रसारासाठी केलेल्या उपयोगात दिसून येतो. ज्ञानदेवांच्या वारकरी संप्रदायाच्या पायाभरणी
नंतर सगळ्या वारकरी समाजाला एकत्रित बांधून ठेवायचे नामदेवांचे कार्य संगीताच्या
माध्यमातून झाले आहे. नामदेवांनी संगीताचे ज्ञान कुठून मिळवले असा जर शोध घेतला तर
असे दिसते की त्या काळात अस्तित्वात असलेल्या गुरुकुल पद्धतीने हे ज्ञान घेतले
नसून, समाजात वेगवेगळ्या प्रसंगात गायल्या जाणाऱ्या संगीताचा अभ्यास करून त्यातून
संगीताचे ज्ञान संपादन केले व त्याचा समर्पक उपयोग त्यांनी आपल्या कीर्तनात केला.
ते विठ्ठल भक्त तर होतेच, पण त्याचा मूळ पिंड गायकाचा होता.
‘हाती वीणा मुखी हरी| गाये राऊळ भीतरी॥ देह भान विसरला|
छंद हरीचा लागला॥
वेद पुराण सासत्र अनंतागीत कबित न गाऊ गो l अखंड मंडल निरंकार महि अनहद बेनु बजाऊ गो ll बैरागी रामही गाऊ गो l
‘दुधावरली साय तेवी’ वानु काय| तैसे गाणे गाय नामदेवा| परिसा म्हणे नाम्या तैसे तुझे गाणे| जैसे का नाणे टाकसाळींचे॥
प्रत्यक्ष ज्ञानदेवांनी देखील नामदेवांच्या रसाळ वाणीचे वर्णन करताना म्हणले, ‘भक्तभागवत बहुसाल ऐकिले| बहु होऊनी गेले, होती पुढे| परि नामयाचे बोलणे नव्हे हे कवित्व| हा रस अद्भुत निरपमू ||
नामदेव हे संगीत शास्त्राचे जाणकार होते. संगीत कलेचे मोठे साधक होते, त्यांची संगीत विषयक आपली एक धारणा होती. गायन हे पांडित्य मिळवून लोकांवर छाप
पाडत उदरनिर्वाहासाठी नाही हे त्यांच्या दोन अभंगात स्पष्टपणे आढळते.
ताकही पांढरे दूधही पांढरे |चवी जेवणारे जाणविते॥ केळाच्या पाटीवर ठेवला दोडका | तोही म्हणे विका तेणे मोले ॥ ढोर म्हणती आम्हां हाकारलास |वारूवा सरसे खाऊ द्या घास॥
‘मंदल्या जेती घरोघरी गाती| धृपदासाठी ताक मागती॥ नामा म्हणे सोपी कवित्वे जाली फुका| हरी हरी म्हणता आपुलिया सुखा॥
दुसऱ्या अभंगात ते म्हणतात
‘शिकला ते गाणे राग आळवण| लोकांरंजतण करावया॥ भक्तांचे ते गाणे बोबडिया
बोली| ते ही श्री विठ्ठल अर्पियेला॥बोबडिया बोली जे कोणी हासती| ते पचिताती रौरवी ॥ नामा म्हणे बहुत बोलो आता काय| विठोबाचे पाय अंतरती ॥
रागशास्त्र शिकून तयार झालेला अहंकार
भक्तिमार्गापासून लोकांना दूर नेतो हे त्यांनी जाणले होते. गायन, वादन आणि नर्तन या तीनही घटकांचे उत्तम ज्ञान
नामदेवांना जरी होते, तरी साध्य कोणते, साधन कोणते या संबंधीची स्पष्टता त्यांना होती
.त्यामुळे कीर्तनात त्यांनी योजलेले सांगीतिक घटक आणि त्यांचा भारतीय संगीत परंपरेशी असलेला संबंध त्यांच्या सांगीतिक द्रष्टेपणाची
साक्ष देतात.
नामदेव वारकरी पंथाचे पहिले कीर्तनकार. नामदेव वारकरी पंथाचे पहिले कीर्तनकार होते. अठरा पगड जाती जमातीच्या लोकांना एकत्र करून कीर्तनाच्या माध्यमातून समानता, भक्ती, प्रेमाची शिकवण त्यांनी दिली. कीर्तनात संगीताची योजना अशा प्रकारे केली की त्यातून भक्तीचे सामूहिक आवाहन प्रभावी ठरावे. यातूनच वारकरी कीर्तन परंपरा फुलली. संगीताची लगेच आकर्षून घेण्याची शक्ती, त्यातून निर्माण होणारी तल्लीनता आणि जनसामान्यांचा समावेश याची सांगड नामदेवांनी आपल्या कीर्तनातून घातली. त्यासाठी त्यांनी अभंग छंदात रचना केल्या. आधी उल्लेख केला त्याप्रमाणे अभंग हा स्वरतालगेय छंद आहे. साडे तीन ते साडे चार चरणात अभंग गाताना उरलेले अर्धे चरण तालाच्या तोडीसाठी वापरले जाते. ‘एके हाती टाळ एके हाती दिंडी म्हणा वाचे उदंडी राम नाम’ असे म्हणत जेव्हा कीर्तनातले अभंग गायन लयतालात सुरू होतात तेव्हा त्या अनुषंगाने शरीराच्या लयबद्ध हालचाली देखील सुरू होतात. गीत, वाद्य आणि नर्तनाची एकात्मता साधली जाऊन रसरंग निर्माण होतो. प्रेमभक्तीचे सोपे तत्त्वज्ञान नामदेवांनी आपल्या आयुष्यातून घालून दिले, त्यासाठी अभंगातील शब्द हे लोकांच्या तोंडी सहजपणे बसतील असेच वापरले. वैष्णवाघरी सर्वकाळ|सदा झणझणिती टाळ|| कण्या भाकरीचे खाणे| गाती रामनाम गाणे|| बैसावयासी कांबळा| द्वारी तुळसी रंगमाळा || असे म्हणत गायन, वादनाची भूमिका प्रेमभक्तीच्या साधनेत स्पष्ट केली. ही अभंगे जेव्हा भजन कीर्तनात आबालवृद्ध गात, तेव्हा होणारा भक्तीचा साक्षात्कार विलक्षण असे.
नामदेवांनी केलेले सांगीतिक बदल वारकरी कीर्तन प्रकारात नामदेवांनी अनेक सांगीतिक बदल केले. इतर कुठल्याही कीर्तनकाराप्रमाणे नामदेवांना स्वरज्ञान, तालज्ञान आणि रागज्ञान होते. हातात वीणा घेतल्यावर तो स्वरात लावणे, मृदंगाच्या थापेमध्ये असणार्या स्वराशी आपला स्वर जुळवणे, नादाची पोत कळणे, अशा गोष्टी नामदेवांच्या अभंगांमधून स्पष्ट होतात.‘टाळ विणे मृदंग सुस्वर गायन| कोंदले गगन दाही दिशा|’ असे म्हणत नामदेवांनी कीर्तनातल्या संगीताचे सुपरीणाम स्पष्टपणे चित्रित केले आहेत . सर्व समावेशकता वाढवण्यासाठी नामदेवांनी वारकरी कीर्तनपरंपरेत प्रत्येक व्यक्तीला कीर्तनाचा भाग बनविले. त्यात टाळकरी, गायक वीणेकरी मृदंगमणी यांचा तर प्रत्यक्ष सहवास असायचाच या शिवाय कीर्तनासमोर बसलेला भक्त मेळा हाताने टाळी वाजवून सहभागी व्हायचा. वारकरी कीर्तनात गायनापेक्षा भजनाला प्राधान्य दिले गेले. भजनचा उल्लेख संगीत शास्त्रात रंजकतेने राग आळवणे असा दिला आहे. त्यामुळे वारकरी कीर्तनात संपूर्ण कीर्तनभर भजनाची सूक्ष्म प्रक्रिया सुरु ठेऊन नामदेवांनी संगीताचा वेगळा विचार मांडला. त्यासाठी कीर्तनकाराच्या मागे दहा- वीस टाळकरी उभे केले. संगीतातून सर्वसमावेशकता अशी वेगळी उभारणी नामदेवांनी केली. भजनात मूळ स्वर पक्का लागतो. गायन कुठल्याही स्वरात गेले तरी मूळ स्वर सुटू नये म्हणून वीणेचे प्रयोजन निर्माण झाले. वीणा आणि मृदंग एका स्वरात जुळले कि मूळ स्वराच्या नादातून निर्माण होणारा रसरंग कीर्तन करणारे, ऐकणारे अनुभवत. गाता गाता बोलणे, बोलता बोलता गाणे, असा आधीच प्रचलित असलेली पद्धत नामदेवांनी वारकरी कीर्तनातही घेतली. यालाच निरुपण म्हटले गेले. कीर्तनातील नामगजराची कल्पना नामदेवांचीच. चढत्या आणि उतरत्या स्वरांच्या योगाने असणार्या नामगजराचे मूळ, रागसंगीतातील जाती गायनातून आले आहे. नामदेवांच्या काळात विठोबा रखुमाईचा नामगजर होता. एकेक स्वर चढवणे आणि येताना स्वर संवाद साधत परत मूळ स्वरावर येणे यातून आपल्या आवाजाचा आवाका कळणे, व स्वरांमधील संवाद तत्त्वाचा वापर दिसून येतो. याच पद्धतीने पुढे तुकाराम महाराजांनी ‘जय जय राम कृष्ण हरीचा’ गजर वारकरी कीर्तनात रूढ केला.
कीर्तनकार, वीणेकरी, मृदंगी आणि टाळकरी असलेली ही कीर्तन पद्धती सामगायनाच्या पद्धतीशी साधर्म्य राखते. साम पद्धतीत प्रस्तोता किंवा उद्गाता सर्वप्रथम गायल्यावर इतर त्यांच्या मागे गातात. वारकरी कीर्तनातही कीर्तनकार किंवा वीणेकरी अभंगाचे ध्रुवपद गायल्यावर त्याचे अनुकरण इतर टाळकरी करतात. कीर्तनाच्या प्रस्तुतीकरणातदेखील सामूहिकतेचे भान ठेवत नामदेवांनी अनेक पद्धती सुरू केल्या. दहा ते बारा टाळकर्यांचा समावेश त्यांनी वारकरी कीर्तनात केला. कीर्तन करताना कीर्तनकाराजवळ वीणेकरी आणि मृदंगी उभे राहिल्यामुळे मृदंग आणि वीणेचा स्वर कीर्तनकाराला सतत मिळणे, त्यामुळे प्रमाण चालीचे निरूपण करतानाही नामगजर म्हणण्यात सूर सापडायला सोपे गेले .कीर्तनकाराच्या उजव्या आणि डाव्या अंगाला टाळकरी मागे उभे राहिल्यामुळे टाळांच्या नाद लयीने बसलेल्या वारकर्यांमध्ये चैतन्य निर्माण होते. कीर्तनकाराच्या मागे जेव्हा सर्व वारकरी गातात तेव्हा त्यांना सूर, लय टाळामधून मिळतो. कीर्तनकारांनी ठाय धुमाळीत सुरु केलेला अभंग संपल्यानंतर गजरात टाळकरी लय वाढवतात. श्रोत्यांची उत्कंठा वाढे पर्यंत हा गजर द्रुत लयीत उंच पट्टीपर्यंत गायला जातो. त्यानंतर मृदंगावर तोड घेऊन विठ्ठल जयजयकारात स्वर आणि ताल परत मूळ स्वर लयीवर येतात. या नंतर कीर्तनकार दुसऱ्या अभंगाला सुरुवात करतो.आधी अभंग मग निरूपण अशा क्रमवारीत कीर्तन चालू असताना मध्येच ‘विठ्ठल विठ्ठल’चा गजर पहिल्या स्वरावर करून सप्तकाचा पहिला सूर कीर्तनकाराला पुरवला जातो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल तार सप्तकाच्या पहिल्या स्वराला म्हणून मध्यस्वर आणि तार सप्तकाचा संवाद दाखवला जातो. आजच्या वारकरी कीर्तनात काळाच्या ओघात जरी अनेक बदल झाले तरी सर्वसमावेशक गायन पद्धतीतून नादब्रम्ह उभा करणे, याची अनुभूती नामदेवी कीर्तन पद्धतीतून येणे हे नामदेवांना अपेक्षित होते. नामदेव स्वतःच्या गायनाविषयी म्हणतात
प्रेम पिसे भरले अंगी | गीते छंदे नाचो रंगी ||कोण वेळे काय गाणे| हे तो भगवंता मी नेणें || वारा धावे भलतेया | तैसी माझी रंगछाया || टाळ मृदंग दक्षिणेकडे | आम्ही गातो पश्चिमेकडे || बोले बाळक बोबडे | तरी ते जननीये आवडे || नामा म्हणे बा केशवा | जन्मोजन्मी देई सेवा ||
सकृत दर्शनी त्यांनी प्रचलित राग संगीताच्या प्रस्तुतीकरणाविषयी अनभिज्ञता
दर्शवली असली तरी संगीताचे मर्म, प्रयोजन त्यांनी जाणले होते. प्रचलित गायन
पद्धतीचा अभ्यास करून आवश्यक तेवढे आत्मसात करून, नसलेले तयार करण्याची सांगीतिक
प्रतिभा त्यांच्यात दिसून येते. नागर संगीताचा जरी त्यांनी स्वीकार केला नसला तरी
त्याकाळातले त्यांच्या आजूबाजूचे सांगीतिक वातावरण बघता त्यांनी अभंग गायनात देशी रागांचा वापर केलेला असावा.
नामदेवांचे तालशास्त्र
तालासंदर्भात ही नामदेवांची कल्पकता दिसून येते. चार/चार मात्रेच्या छंदाला त्यांनी
धींऽत धिंऽ|धाधातिंऽ| तिरकिट धिन| धागे तिरकिट असे संपूर्ण तालाचे ज्याला ठाय धुमाळी म्हणतात, असे रुप दिले. अभंग सादर करताना ताल दुगुनीत जाऊन, त्याची तोड होऊन परत मूळ लयीत वाजवताना लयीचे वैविध्य साधले जाणे, यात देखील त्यांनी पारंपरिक संगीतशास्त्रातून नवनिर्मिती केल्याचे दिसून येते. ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर नामदेवांनी महाराष्ट्र सोडला आणि वीस वर्षे पंजाबमधील घुमान गावी ते राहिले. त्यांनी तिथल्या भाषा, वेषाबरोबर संगीतसुद्धा आत्मसात केले. नानकसाहेबांच्या ‘गुरु ग्रंथ साहिब’मध्ये नामदेवांचे ६२ सबद, म्हणजेच अभंग रागा, तालाबरोबर उधृत केलेले आपल्याला दिसतात. भैरव, मारूषभाईचा कल्याण, सारंग, धनश्री. सोरठी, आसा, टोडी अशा रागांचे नावे त्यांच्या सबदांवर सापडतात. ही नावे जरी शे-दोनशे वर्षांनंतर लिहिली गेली, तरी मौखिक परंपरेने आलेली राग परंपरा लिहिण्याची पद्धत त्यावेळपर्यंत नव्हती. ती नंतर आली. असा निष्कर्ष निघू शकतो. संगीतासारख्या श्राव्य कलेचा मागोवा घेण्यासाठी मौखिक परंपरेचा अभ्यास येथे अनिवार्य ठरतो. जसे मंदिराचा बाह्य आकार बदलला तरी गाभारा बदलत नाही. त्याचप्रमाणे काळाच्या ओघात स्वरस्थाने, तालाक्षरे, प्रस्तुतीकरणाची बाह्य स्वरूपे बदलत गेली तरी नामदेवांनी आपल्या कीर्तनपद्धतीत वापरलेल्या सांगीतिक संकल्पना एका गायकाच्या भूमिकेतून लोककल्याणाचे कार्य करणाऱ्या ठरतात, म्हणूनच त्यांच्या ध्येयाशी त्या सुसंगत वाटतात. गाऊ नाचू आम्ही आनंदे कीर्तनी| भुक्ती मुक्ती दोन्ही मागो देवा॥ असे आपल्या अभंगात लिहून त्यांनी त्यांच्या लेखी संगीताला दिलेले अत्युच्च स्थान अधोरेखित केले आहे .
ठाय धुमाळी वरून रण धुमाळी हा शब्द आला असेल का ?
ReplyDeleteनाही 😊
DeleteWhat is a beautiful explaination with example mam. In Varkari Sampradaya example called Drishtanth. you are criticize it like a Kirtankar.
ReplyDeleteधन्यवाद
Deleteअप्रतिम अशी माहिती धन्यवाद
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete