Sunday, March 25, 2018

जयपूर गायकी आणि कुमुदिनी काटदरे

      




जयपूर गायकी आणि कुमुदिनी काटदरे                                       अंजली मालकर 

भारतातल्या सगळ्या मुलांसारखीच मी देखील गुरु - शिष्यांच्या ऐतिहासिक आणि पौराणिक गोष्टी ऐकत वाढले. महाभारतातील अर्जुनाने, धनुर्विद्येचा सरावात गुरु द्रोणाचार्यच्या आज्ञेवरून फांदीवर बसलेल्या पक्ष्याच्या डोळ्याचा वेध घेतलेला असो, द्रोणाचार्य आणि एकलव्याची गोष्ट असो, श्रीकृष्णाने सांदिपनी ऋषींचा मुलगा सुकर्मा, याला गुरुदक्षिणा म्हणून दास्यातून मुक्त करणे असो किंवा धौम्य ऋषी आणि त्यांचा आज्ञाधारक शिष्य अरुणी असो, या सर्व कथांनी माझ्या मनात या नात्याविषयी आणि त्याच्या परंपरांविषयी लहानपणीच आकर्षण निर्माण केले होते. ते इतके, की अशा नात्यावर आधारित एक भाबडा चित्रपट तेव्हा मी पाच वेळा पाहिला होता ! जसे जसे वय वाढू लागले, आणि शास्त्रीय संगीतासारख्या पारंपारिक गुरुमुखी कलेचा अभ्यास करू लागले, तसे तसे या नात्यातले खाच खळगे दिसू लागले. शरीर, बुद्धी आणि मन या तीनही गोष्टी कला निर्मितीत अनिवार्य आहेत. गायन कला ही मनुष्याकडून मनुष्याकडे प्रवाहित होणारी असल्यामुळे आणि याला अजूनतरी पर्याय सापडला नसल्यामुळे, गुरु शिष्य नात्याचे प्रचंड वलय तयार झाले आहे, हे सुद्धा या कला प्रवासात लक्षात येऊ लागले. गाण्यासारख्या क्षणात मनाचा ठाव घेणाऱ्या कलेच्या अभ्यासाचे अनेक मार्गही दिसू लागले. आणि गंमत म्हणजे सगळेच मार्ग, त्या त्या वेळेला बरोबर आहेत असे जाणवायला लागले. प्रामाणिकपणाचा खांब जीवापाड धरून या कलेचा, कलाव्यवहार, गुरु, शिक्षण, माणूस अशा अनेक पैलूंनी अभ्यास करत असताना मला पारंपारिक घराणेदार गायनाच्या अनेक सुंदर खिडक्या दिसू लागल्या. पुढे, खिडक्यांच्या चौकटीवर रेखाटलेल्या कलाबुतींचे निर्मितीक्षण पहायला मिळाले आणि त्या रेखाटण्याचे थोडेफार कौशल्यही मिळाले. निर्माणकर्त्या गुरुकलाकारांसमोर बसून ही जादू बघताना, माझी मनाची अवस्था एकाच वेळी हरखलेली आणि आसुसलेली अशी कैक वेळा अनुभवली. मनुष्यत्वाच्या मर्यादा, कलेची अथांगता आणि जीवाची तडफड, हेच काय ते माझ्या अभ्यासाचे फलित !
बंदिशीच्या समेनंतर सरधोपटपणे रागाचा आलाप सुरु करून मुखडा घेऊन परत पहिल्या मात्रेवर, समेवर येणे, या प्रारंभिक टप्प्यानंतर, हळू हळू  अवर्तनातल्या तालासुरांची लगट मला कळू लागली. तालाच्या प्रत्येक मात्रेला सुरांचा विळखा देत चालणाऱ्या बंदिशींचा चुस्तपणा समजू लागला. तिची घट्ट वीण तितकीच घट्ट रहावी म्हणून तिला वश करण्यासाठी ती हज्जारवेळा तशीच म्हणण्याची रग कळू लागली. बंदिश गाताना, संगतकाराकडून लयीचे जे दान पडेल त्यातच खेळताना आखलेले डावपेच कळू लागले. डाव हरण्याचे जास्त आणि जिंकण्याचे कमी असतात ही पण अनुभवांची शिदोरी वाढायला लागली. एरवी अशक्तपणाने निपचित झोपलेला कलाकार, गायला लागल्यावर कसा परकाया प्रवेश करतो, हे चमत्कार सुद्धा या काळात मला पाहायला मिळाले. स्वतःचे गाणे न ऐकण्याचा भित्रेपणा सोडून मी जशी अंतर्मुख होऊन पुढे सरकले, तशा मला या घट्टविणीच्या बंदिशींमधल्या मोकळ्या जागा दिसू लागल्या. रागांच्या वाक्यांमधले स्वल्पविराम, पूर्णविराम, उद्गारचिन्ह दिसू लागले. रागांची भाषा आता पूर्ण उलगडू लागली होती. घराण्यांच्या वेशीच्या आत मी शिरल्याचे मला लक्षात आले. ग्वाल्हेर, आग्रा, किराणा, या दिमाखदार राजवाड्यांमध्ये विसावलेले हे राग प्रत्येक ठिकाणी किती वेगळे भासतात याचे अप्रूप वाटत असताना जयपूरचा राजवाडा मात्र माझ्यासाठी उघडत नव्हता. मी लांबूनच त्याच्याकडे जरा भीतीने, थोड्या अविश्वासाने बघत होते. दीड, तीनच्या विषम संख्येची त्याची महिरप, थोडी मागे, मग पुढे अशी चालणारी त्याची मांडणी, पूर्ण आकाराचा आवाका मला कोड्यात टाकत होता. याने माझ्या ‘गाणं कळण्याच्या’ शोधाला आव्हान दिले. ते आव्हान स्वीकारून, मी उलट फिरले आणि त्यासाठी ‘गुरुमुखाचा’ शोध सुरु केला. माझी विमनस्क अवस्था पाहून मैत्रिणीने दया येऊन मला एका गरीब वस्तीच्या मागे असलेल्या सोसायटी मध्ये नेले. फाटकाजवळ फणस लगडलेले प्रौढ झाड, अंगणात शहाबादी फारश्या आणि चार पायऱ्या चढून ओटा असलेल्या घरात आम्ही गेलो. गेल्या गेल्या खुर्चीवर बसलेल्या कृश स्त्रीला उद्देशून मैत्रीण म्हणाली “काकू , ही अंजली. तुमच्याकडे तुमच्या बंदिशी शिकायला आली आहे”. जयपूर घराण्याची विशुद्ध गायकी ज्यांच्याकडे आहे, त्या विदुषी कुमुदिनी काटदरे यांच्या समोर मी उभी होते. श्री ना.र मारुलकर, श्रीमती कमल तांबे,        सौ कौसल्या मंजेश्वर, मधुसूदन कानेटकर आणि गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांच्या सारख्या जयपूरच्या धुरंधर गुरूंकडून ज्यांनी अतोनात कष्टाने गायकी मिळवली, त्यांच्याकडे, म्हटलं तर फुटकळ कारण घेऊन शिकायला आले होते.

जुजबी विचारपूस झाल्यानंतर मी माझ्या ‘भीतीबद्दल’ मोकळेपणाने सांगितल्यावर हसून त्या म्हणाल्या,”बघू, पुढच्या आठवड्यात ये”. जयपूरचा महाल माझ्यासाठी किलकिला झाला होता. माझ्या भडभड बोलण्याला मोजके पण नेमके उत्तर देत कुमुदताईंनी कधी त्यांच्या गुरूंच्या आठवणीतून कधी बंदिशींच्या रचना उलगडून दाखवताना जयपूरचे पीळदार सौंदर्य माझ्यासमोर ठेवले.
एखाद्या महालाची रचना समजण्यासाठी ठराविक रागांच्या माड्याच लागतात असे नव्हे, तर कुठल्याही माडीवर जाण्याच्या पायऱ्या समजाव्या लागतात हा पहिला मूलभूत विचार मला त्यांच्याकडून कळला. त्यांच्या सौम्य, तजेलदार आकाराच्या दर्शनाने मी स्तिमित झाले. कुठेही जरासुद्धा खरचट नसलेला सुभग गोल आकार मला पहिल्यांदाच उमजला. श्वासपटलापासून मुखावाटे निघणारा स्वर जेव्हा नैसर्गिक दाबाने घशातील स्वरतंतूना स्पर्श करून सहज आकाराच्या खुल्या जबड्यातून बाहेर येतो, तेव्हा त्याला येणारी गोलाई एखाद्या नितळ गोलकासारखी भासते. हा आकार केवळ मुखाचा न राहता तो मनाच्या गाभाऱ्यात आकृती रूपात दडलेला असतो. तो जेव्हा प्रस्फुटीत होऊन तालाच्या आवर्तनात गुंफला जातो, तेव्हा येणारी नादाची भव्यता, जयपूर गायकीच्या धृपद कुळाकडे नेते. आवर्तन भरताना रागविचारांमध्ये जराही संदेह निर्माण झाला तर मुखाचा आकार आक्रसताना मी मला अनेकदा पाहिले असल्यामुळे आकारातगाणे किती अवघड आणि धाडसाचे आहे, किती अमूर्ताकडे नेणारे आहे हे उमजू लागले. अतूट श्वासाची, बेजोड दमसासाची कलाकुसर करताना लागणारा संयम, आणि तशात गायल्या जाणाऱ्या बडाख्यालाची लय ‘मध्य’ ठेवणे किती गरजेचे असते हे माझ्या लक्षात येऊ लागले. जयपुरी कथक नृत्यांगनांच्या गिरक्यासारखी गोलाईने चालणारे स्वर अधिक वेगाने पळू शकत नाही. आणि पाळले तर त्यांची गोलाई अबाधित रहात नाही. त्यामुळे जयपुरी तानांचा वेग गिरक्यांइतकाच मध्य लयीत राहू शकतो, हे आता कळू लागले होते.
तालाचे आवर्तन शब्दात भरताना मात्रेवर आधी स्वर ठेवावा मग अक्षर म्हणावा, कुमुदताईंच्या या सोप्या क्लुप्तीमुळे तालाचा जयपुरी आघात, अनाघात आणि अतीतचा खेळ, सर्पगतीची चाल कशी सहजगत्या साध्य होते, हे पाहताना गंमत वाटून आपोआप ‘वाह’ निघून जातो. मोठ्या आजारपणामुळे अशक्त झालेल्या शरीराने कुमुदताई वरच्या स्वरांचा प्रभाव, स्वतः वारंवार गाऊन आमच्या गळ्यातून काढण्यासाठी धडपडतात तेव्हा स्वतःचीच लाज वाटून आम्ही आमच्या असामर्थ्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तेव्हा ‘माझ्या गुरुंनी देखील माझ्यावर असेच कष्ट घेतले आहेत’ या त्यांच्या वाक्यातून मला गुरु-शिष्य नात्याचे नितांत सुंदर दर्शन घडते. ज्या गोष्टी ऐकत मोठी झाले, त्या गोष्टींमधले साररूप अनुभवताना मन भावूक होते.
कुमुदताईंची कलासंवेदना त्यांच्या रचनांमधून प्रकर्षाने जाणवतात. गोव्याला आग्रा घराण्याचे प्रसिद्ध गायक, रचनाकार पं. रत्नकांत रामनाथकर यांचा सहवास त्यांना काही काळ लाभला. सुरेख बंदिशींची बीजे बहुतेक तिथेच रुजली असावीत. बंदिशीतल्या शब्दांचा, त्यातील अक्षरांच्या उच्चारणातून येणाऱ्या नादवलयांचा इतका सूक्ष्म विचार मी त्यांच्याकडे पहिल्यांदाच अनुभवला. अक्षरांना स्वरवाहक करताना त्याच्या स्वतःच्या नादाचा आणि त्यातील शब्दार्थाचा प्रभाव बंदिशीचे लपलेले अनेक परिमाणं श्रोत्यांपुढे आणतात याची प्रचीती मला अनेक वेळेला त्यांच्याकडे आली. छातीतून येणारा ‘ह’, नाकपुडीतून येणारा ‘न’, ‘म’ म्हणताना विलग होणाऱ्या ओठांचे मार्दव उच्चारण, या शिवाय त्यांचे शब्दातले लघुत्व, गुरुत्व आणि त्यातून निर्माण झालेल्या आकर्षक लयाकृती जेव्हा तालाच्या चौकटीतून पुढे येतात, तेव्हा बंदिशीतली प्रगल्भता मनाला दिपवून टाकते.                       
कुमुदताईंच्या बंदिशीतल्या शब्दरचनेचा बारकावा जेवढा लक्षात आला तेवढाच बारकावा त्यांच्या बंदिशीतल्या स्वररचनेत आहे, हे त्यांनी उलगडून दाखवल्यामुळे कळला. षड्ज, पंचम हे एकरूपी स्वर जेव्हा रागवाक्यांमध्ये पूर्णविरामाचे काम करतात तेव्हा रागाचे इतर स्वर अल्पविराम आणि उद्गारचिन्हाचे काम करतात ही मेख त्यांनी गाऊन दाखवल्यावर लक्षात आली. रागातले वेगवेगळे न्यास स्वर राग वाक्य पूर्ण करण्यासाठी जेव्हा षड्ज किंवा पंचमात विलीन होतात, तेव्हा स्वरविचार आणि स्वरभावाला आलेला ठहराव, पूर्णत्व शब्दातीत असते, हा अनुभव कुमुदताईंकडे मला उमजला. बंदिश म्हणताना तालाच्या एखाद्या खंडात स्वर सहज दुगुनीत म्हणणे, बंदिशीतल्या शब्दार्थांचे स्वल्पविराम गाताना देखील सहज राखत त्यांना लयार्थाचे वेगळे परिमाण देणे, अशा छोट्या छोट्या पण प्रभावी गोष्टी चपखल पणे सांगून त्या बिंबवणे यातून त्यांची जबाबदारीने शिकवण्याची तळमळ आणि जयपूर गायकीशी असलेली एकरूपता नेहमी पहायला, अनुभवायला मिळाली आहे.
मी कुमुदताईंकडे जयपूरचा महाल पहायला शिकले. त्यातून उस्ताद अल्लादिया खाँ साहेब यांनी आपल्या प्रतिभेतून घडवलेल्या या भव्य वास्तूचे दर्शन झाले. यामुळे आग्रा, ग्वाल्हेर, या राजवाड्यांचे वैभव मला चांगले कळू लागले. संस्कृतीचा मानदंड असलेल्या शास्त्रीय संगीताच्या समृद्ध परंपरेचे दर्शन अशा थोर गुरुंमुळे झाले याची विनम्र जाणीव जेव्हा जेव्हा होते, तेव्हा तेव्हा मी या गुरु-शिष्य नात्याच्या विशुद्ध रूपापुढे नतमस्तक होते.