Wednesday, January 13, 2016



कालजयी कुमार
अंजली मालकर


नुकत्याच 'कालजयी कुमार गंधर्व' या ग्रंथ प्रकाशनाच्या कार्यक्रमाला गेले होते. भरगच्च भरलेल्या हॉंल, मोठ्या रांजणांमध्ये गुलछ्ड्यांनी केलेली स्वरमंचाची सजावट मस्त दिसत होती. पण सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतले ते मागे असलेल्या कुमारांच्या ब्लॅक अॅण्ड व्हाइट फोटोने. वाटत होते कि संपूर्ण स्टेजच त्यांच्या अदृश्य अस्तित्वाने व्यापले होते. कुमारांच्या मिटल्या डोळ्यातूनही दिसणारी त्यांची विजिगिषु वृत्ती, ताठ बसलेल्या बैठकीतून दिसणारा आत्मविश्वास आणि एक हात उंचावून अवकाशातल्या नाद तत्वाशी त्यांचा संवाद;  हा फोटो नसून बंदिशच होती कुमारांची, उर्ध्वमुखी उर्जिता ! विचाराच्या नादात माझ्या समोर चाललेला कार्यक्रम पुसट झाला आणि शंभरवेळा ऐकलेल्या बंदिशी रुंजी घालू लागल्या. मनाची घालमेल सुरु झाली. मन पुन्हा त्या दुनियेत जायला मागू लागले. तेव्हा अभ्यासकाचा कोट उतरवला, मन निर्लेप केले, आणि आपलं शिष्य मन आणि श्राव्य अनुभवाची शिदोरी घेऊन कुमार पाहण्यासाठी त्यांच्या संगीत घरात शिरले
शिरल्या शिरल्याच अंग न्हाऊन निघाले ते तेजस्वी, स्वरबिंदूच्या पार गाभाऱ्यात पोहोचणाऱ्या स्वरवर्षावाने. काय सूरातला आत्मविश्वास ! स्वर लावताना मनात जरा ही शंका नाही ! कुठेच आणि कधीच ! बाप रे ! मग थोडं लक्षपूर्वक त्या स्वरांकडे पाहू लागले. त्यांची पोत, गाण्यातल्या इतर घटकांबरोबर त्यांचे वागणे, केवढा सहजपणा होता त्यात. तारातल्या माध्यम पंचमापासून खर्जातल्या धैवत पंचमापर्यंत सगळे स्वर अतिशय स्पष्ट आणि ठसठशीत होते. त्यांची गमकाची जाड स्वररेखा असो की मुर्कीतून आलेली वेगवान हलकीशी सर, पुसटपणा नावाला ही नव्हता. शरीराच्या कमजोरीला पार धुवून टाकणारे हे स्वर ऐकले की वाटत होते, कुमारांचे गात्र न् गात्र या स्वरांनी स्पंदित होतय. आणि या स्वरांचे आकार तरी किती ! मेणासारखे स्वर करून कुमार एखाद्या जादुगारासारखे कधी त्यांना आघातातून, मींडेतून, कणातून, खटक्यातून, गमकेतून घालून स्वर सहजपणे फिरवत होते. अगदी त्यांच्याशी बोलल्यासारखं. हे असं कसं बोलू शकतात ही माझी विचारांची तंद्री मला लय / तालाकडे घेऊन गेली. मध्य आणि द्रुत लयीच्या संवेदना आपल्यात जेव्हा एकरूप होतात तेव्हा हे सगळं सोप्पं होत असणार या उत्तराच्या आनंदात असताना त्यांच्या बंदिशी पाशी कधी पोहोचले हे कळलंच नाही. आता मात्र माझे डोळे विस्फारले होते. एकानंतर एक सुरेख पैठण्या समोर उलगडल्यावर जे होते अगदी तसे, हे बघू का ते बघू अस्स झालं ! नंद रागाच्या 'राजन अब तो आ' गाताना '' म्हणण्यातला लाघवीपणाने घायाळ झालेले मन 'थीर न रहत कजरा आंखन में' मधल्या 'आंखन' वर लावलेल्या ओलसर सुराला अस्फुट 'ओह' म्हणून गेले. पुढे 'अब ना सहु रे' गाताना 'रे' या अक्षराला पंचमाची आस देऊन जे षड्जावर असं उचलून ठेवलं की वाटलं धावत जाऊन त्या पिया ला सांगावे 'अरे खरच सहन होत नाही रे तिला'....  स्वरचित्र काय असत याचा अनुभव मी घेत होते .
तेवढ्यात भटियारच्या कोमल ऋषभाने मला खेचून पुढे नेले. सोहोनी - भटियारची 'म्हारो जी भूलो ना म्हाने' समोर उभी होते. कुमारांनी 'भूलो' म्हणताना भटियारच्या तार  कोमल ऋषभाला दीर्घ कंपन देऊन जी माझी अवस्था केली ..... ही अवस्था फार वेळ चांगली नाही हे ओळखूनच की काय मग त्यांनी पुढचा 'भूलो ना' तार षड्जावर स्थिरावला आणि माझा जीव भांड्यात पडला !  वाटलं आपण बोलताना जसे मध्येच थांबतो, कधी एखादेच वाक्य बोलून विषय संपवतो तसच कुमारांचे गाणे अवकाशाच्या समतोलावर बोलत आहे. त्यांची प्रत्येक बंदिश अशीच भरभरून बोलत होती.. स्वर लगावातून,स्वरांच्या दैदिप्यमान आकार ,इकार,उकारातून,आघात-अनाघातातून ,लयीच्या नोंक झोंक मधून , राग वाक्यातून, शब्द उच्चारणातून. 'शून्य गढ शहर मे' मधला अलिप्त स्वर बहार रागातल्या 'ऐसो कैसो आयो रिता रे' मध्ये 'ऐसो' ला कसे प्रश्न विचारत आहे हे बघत होते.

जन्मतःच कुशाग्र बुद्धी, संवेदनशील मन, आणि कलेतील संवाद मूल्य समजणारी प्रज्ञा लाभलेल्या कुमारांना हिंदुस्तानी संगीतातील पारंपारिक सौंदर्य मूल्य आत्मसात करून ही काही प्रश्न पडलेच होते. परंपरेच्या चौकटीत न मावणारी त्यांची प्रतिभा आपली स्वतःची चौकट तयार करण्यात रमली. त्यांच्या निडर, थेट स्वभाववृत्तीने बंडखोरी केली. कुमारांची प्रत्येक बंदिश या बंडखोरीची कहाणी मला सांगत होती. कुमार गंधर्वांच्या घरातल्या प्रत्येक खोलीत फिरताना सहज मनात आलं, 'या घराच घराणे होऊ शकेल का? छे छे ! कसं शक्य आहे? चौकट मोडलेल्याची पुन्हा चौकट ? ते तेजस्वी स्वर, सुरेलपणाचा कहर, रंध्रा रंध्रातुन बोलल्यासारखी तयार होणारी स्वरचित्रे , प्रत्येक बंदिश ऐकताना 'यांना हेच म्हणायचे होते' असा येणारा प्रत्यय पुन्हा कसा येणार ? या प्रतिभेचा एखादा बिंदू घेऊन नवीन चित्र तयार करणं हेच याचं खरं उत्तर असू शकेल असा मनाशी विचार करत श्राव्य अनुभवाने जडावलेली बुद्धी, आणि शिष्यत्वाने जडावलेले मन घेऊन मी पुढच्या प्रवासाला निघाले ...