Tuesday, August 29, 2017

लहजा

लहजा
                           अंजली मालकर

 “या फार मोठ्या गायिका आहेत बरं का, शास्त्रीय संगीताच्या” एका अनौपचारिक समारंभात, एका वकील मित्राने त्याच्या वकील भाचीला माझी ओळख करून देताना म्हटले. माझ्या विषयाचे लेबल घेऊन फिरताना मला आतापर्यंत शास्त्रीय संगीत आवडणारी आणि न आवडणारी अशी दोन्ही टोकाची माणसं पहायला मिळाली आहेत. शास्त्रीय संगीतासारखा क्लिष्ट तरीही आकर्षक विषयासंबंधी, त्या परिघाबाहेरच्या सुशिक्षित लोकांच्या मनात त्याच्या विषयीचे आकर्षण आणि गोंधळ मला सातत्याने पहायला आणि ऐकायला मिळाले आहेत. त्यादिवशी सुद्धा या दोन वकील रसिकांचे कुतूहल, कौतुक आणि आदराचे विधान मला सुखावून गेले, ते यासाठी की वकिलीसारख्या तर्कनिष्ठ व्यवसायातले लोक देखील शास्त्रीय संगीतासारखा भावनिष्ठ पण किचकट विषयाची मजा घेऊ शकत होते. तिथे जमलेल्या प्रतिष्ठित वकील आणि लेखक मंडळींनी गप्पांच्या ओघात शास्त्रीय संगीत हा विषय काढला. एक जण माझ्याकडे बघून म्हणाले, ‘ काहो, तुमच्या बंदिशी हिंदीतच का असतात? मराठीत का असू शकत नाहीत. मी त्यांना मराठी भाषेतली कठोर व्यंजने, त्यांचा गाण्यासाठी होणारा अडथळा, खंडित होणारा प्रवाह वगैरे समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी मुद्दा सोडला नाही. मृदू व्यंजने वापरून बंदिशी करता येतील इत्यादी मुद्दे समर्थनार्थ मांडू लागले. तेवढ्यात तिथे असलेले एक बहुश्रुत लेखक म्हणाले, “ अरे यांचं संगीत उत्तर हिंदुस्तानातून आले आहे, त्यामुळे ते हिंदी भाषा वापरतात.” मी एकदम चकित झाले. शास्त्रीय संगीतात शब्द हे सुरांचे वाहक असतात, असे आम्ही मनात असल्यामुळे शब्दांना घेऊन त्यांनी आणलेला हा प्रादेशिक भेद, यावर मी कधी विचारच केला नव्हता. जाणीवपूर्वक मराठी बंदिशी करणे आणि रागाला सहज घेऊन फिरू शकतील अशा हिंदी भाषिक बंदिशी घडणे, यातले ‘करणे’ आणि ‘घडणे’ यातले अंतर जाणवण्याइतके मोठे असते,हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे अशा परिघाबाहेरच्या प्रश्नाने मला विचारात टाकले. नाही म्हटलं तरी मराठीतून बंदिशींचा प्रयत्न न.चि. केळकरांच्या काळापासून आजतागायत सुरु आहेत. त्या वैचित्र्य म्हणून गायल्या सुद्धा जातात. पण मूळ प्रवाहात रुजू शकल्या नाहीत. एरवी हिंदी बोलताना मराठीपणाचा ठसठशीत लहजा असणाऱ्या गायक कलाकारांनी उत्तम बंदिशी मात्र उत्तर भारतीय भाषेत केल्या आहेत. हे कसं काय? उत्तर हिंदुस्तानी संगीत या भागात येऊन किमान आठशे वर्षे झाली असताना, व ते आपल्या जगण्याचा एक भाग बनले असताना, त्यातली भाषा परकी कशी होते? अशा अनेक प्रश्नांचे या निमित्ताने मनात उठले. समोर अनेक पारंपारिक बंदिशींचे शब्द आणि त्या गायल्या गेलेल्या अनेक बुजुर्ग कलाकारांचे रेकॉर्डिंग समोर दत्त म्हणून उभे राहिले. त्यांच्या उलटतपासणीत पहिला मुद्दा लगेच लक्षात आला. तो हा की, उत्तर हिंदुस्तानी ख्याल संगीताच्या बंदिशी या हिंदी भाषेत कमी आणि ब्रज, मैथिली या पोटभाषेत अधिक आहेत. म्हणजे व्याकरणनिष्ठ नागर भाषेपेक्षा भावनिष्ठ बोलीभाषेला इथे झुकतं माप दिलं आहे. त्यामुळे ‘पिया’ या शब्दाला ‘पियर’, ‘पियरवा’, ‘पियू’, ‘पी’ किंवा ‘गगर’ या शब्दाला ‘गगरी’, ‘गागर’, ‘गगरीया’ असे अनेक पर्याय रचनाकाराला मिळाल्यामुळे या लवचिक भाषेला अधिक स्वीकारले गेले. याच लवचिकतेने सुराधिष्ठीत गायन प्रवाही केले. शब्द हे दगडी अडथळे न ठरता, रागात वापरल्या जाणाऱ्या अमूर्त स्वरभावांचे सुंदर शिल्प झाले. सुरांचे प्रवाहित्व अबाधित राखण्यासाठी मग बंदिशीतल्या जोडाक्षरांनाही गोंडसपणे तोडून विलग अक्षर गाण्यात गायकांना जरा ही संकोच वाटला नाही. त्यामुळे ‘तुर्कमान’चे ‘तोरेकमान’, ‘प्रताप’चे ‘परताप’ म्हणून गाताना, शब्द गाणाऱ्याच्या तोंडात खड्यासारखे न लागता, खडीसाखरेसारखे ते सुरात विरघळून जातात. अशा उच्चारातून स्वर, लय मिळते आणि स्वरलयीतून तल्लीनता ! त्यामुळे सुराच्या भाषेचे मराठी सारख्या सडेतोड भाषेपेक्षा मृदू व्यंजनी हिंदीतल्या बोलीभाषेशी सख्य असणे स्वाभाविकच आहे असे वाटले.

शास्त्रीय संगीत आस्वादनाच्या एका छोटेखानी मैफिलीत, रागसंगीतातल्या एका नवसाक्षर रसिकाने मला विचारले ‘ का हो, तुमच्या बंदिशींमध्ये सैंया, सास, ननंद या शिवाय इतर विषय नसतात का? आणि तुम्ही शब्द विसरल्यासारखे एकच शब्द सारखा का म्हणता? अशा प्रश्नांमुळे ख्याल संगीतातील बंदिशींची घडण आणि हेतूकडे अधिक डोळसपणे पाहू लागले. रागसंगीतातील इतर गायनप्रकारांमध्ये ख्यालसंगीत हा सर्वात आधुनिक प्रकार मानला गेला आहे. धृपदातली रागशुद्धता, कव्वालीतली तानक्रिया आणि ठुमरी, दादरा,कजरी या लोकगीतप्रकारातून आलेले शब्द, यांच्या संयोगाने या गायन प्रकाराची निर्मिती झाली असे संगीतज्ञ मानतात. जेव्हा शब्दाधिष्ठीत काव्यप्रकार स्वराधिष्ठीत गायन प्रकार म्हणून बदलले तेव्हा त्यांची अनेक कडवी गळून पडली. फक्त स्थायी आणि अंतरा ही दोनच राहिली. मग या दोन कडव्यांना रागातील स्वरवाक्यांच्या झालरी लावून त्या मखरात एका अमूर्त भावस्वप्नाची स्थापना करणे हा या गायन प्रकाराचा हेतू बनला. एकाच शब्दाला रागातल्या अनेक स्वरवाक्यांनी खुलवणे ही त्या भावस्वप्नाकडे जायची एक रीत झाली. शब्द जरी तोच तोच असला तरी त्यांची स्वर रीत वेगळी असते. शब्दावर स्वर मांड टाकून त्याला एका अनामिक अवस्थेकडे नेतात, तेव्हा ही सुरांची भाषा अधिक बोलकी होते. स्वरांची झुंबरं जर लक्षवेधी करायची, तर शब्द दालनाच्या भिंती साध्याच असाव्या लागतात. त्यामुळे प्रेमासारखा चिरंतन विषय असो, जीवन तत्वज्ञान असो किंवा ऋतूवर्णन असो, सामान्य लोकांना आवडेल, रुचेल अशा विषयवास्तूतून नादाच्या अनिर्बंध,असीम सफरीला नेणे या गायनप्रकाराचे ध्येय बनले. ज्या शब्दांच्या पालख्या रागातले स्वर वाहून नेतात त्यांची नक्षी मी आता अजून जवळून बघू लागले. शब्दोच्चाराबरोबरच कुठल्याही रागांचे स्वर, त्या स्वरांची लय, त्यांचे उच्चारण आणि त्यातून साधली गेलेली भावप्रभा हा संस्काराचा परिणाम असतो. तो संस्कार गुरु शिष्यावर घडवत असतो. या विचारांच्या दिशा मला प्रादेशिक रागांकडे घेऊन गेल्या. प्रादेशिक भाषेतले शब्द तिथल्या संस्कृतीचा आरसा बनून, तिथल्या धुनांमध्ये न्हाऊन रागाच्या कोंदणात बसून येतात तेव्हा त्यांचा सुवास रातराणीच्या फुलांसारखा दरवळतो. माझ्या डोळ्यासमोर धनाश्री रागाची बंदिश तिच्या रंग वेषासाहित तरळू लागली. ‘थे म्हारो राजेंद्र, मोह्यो मोह्यो ढिली नथवाली’ गाताना नाकात मोठे, जड नथ घातलेल्या  राजस्थानातल्या मरूभूमीतल्या स्त्रिया आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करताना दिसू लागल्या. धनाश्रीतल्या स्वरांची लगबग लय, रागाची छोटी स्वरवाक्य आणि गाताना ‘ढिली’ला दिलेला हलकासा झोका ! रंगीलो राजस्थानचे गानचित्र उभे करून गेले.
जुन्या बंदिशींच्या शोधात, अशाच एका बंदिशीने माझा ठाव घेतला तो ‘ ए नबी के दरबार, सब मिल गावो बसंत की मुबारकी’ या बसंतच्या बंदिशीने. बसंत रागाची चैनदार लय. स्वरांच्या लगावातली भव्यता आणि दरबारातला बसंतोत्सव शब्दांमधून येताना तिचे सर्व सामाजिक, राजकीय संदर्भ घेऊन येत होता. केवळ शब्दच नाही तर बंदिशींच्या व्यंजनांचे, त्यातल्या स्वराचा लहजा, नादोच्चाराच्या वेगळ्या जाणीवा निर्माण करतात. ‘हँस हँस’ म्हणताना उच्चारलेला अनुनासिक ‘ह’ जेव्हा छातीच्या पोकळीतून येतो, तेव्हा नकळत अस्फुट हास्याची भासमानता तयार होते. ‘रंग’ म्हणताना जेव्हा ‘र’ चा ‘रौं’ होतो, तेव्हा अनुनासिक तीव्रता साऱ्या रागछटेत गडदपणा आणते. असं म्हणतात की सामगायन काळात प्रत्येक ऋचा गायनाचे फळ ठरलेले असायचे. आज वाटते की ते फळ म्हणजे त्या नादोच्चारातून निर्माण झालेले नादवलय असावेत, जे सजीवांना सुखाच्या जाणीवेपर्यंत घेऊन जायचे. रागदारी संगीतातील बंदिशी वाचताना, ऐकताना मला वाटून गेले की यांच्या उच्चारणाच्या ढंगदार लकबी त्यांना जिवंत करतात. त्यांच्यातला काव्यार्थ आणि काव्याला लगटलेला स्वरार्थ तिचे व्यक्तिमत्व घडवतातच या शिवाय कलाकाराची गायकी देखील घडते. अशा बंदिशी आणि त्यातल्या गायकीचे सांस्कृतिक मूल्य आतल्या खणात ठेवलेल्या वंशपरंपरेने चालत आलेल्या दागिन्यांसारखे असते. एकदा का या घडणावळीचे मर्म कळले की मग आत्मानंदाचा सुवास शतगुणित होतो. मन हलकं होतं. अत्तराचा सुगंध कुठूनसा येऊन चित्तवृत्ती प्रफुल्लीत होते. कदाचित हाच परिणाम रागसंगीतातील बंदिशींमधून अपेक्षित असावा.
लेखक मित्राच्या प्रश्नातून घुसळून निघालेल्या विचार मंथनाने पारंपारिक बंदिशींकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन बदलला. ओबडधोबड काव्याच्या आडून त्यांची समाजाशी घट्ट जोडलेली नाळ दिसून आली. रागाच्या एकत्वातून बंदिशींचे प्रादेशिक वैविध्य, देशाच्या हरवलेल्या समृद्ध पाऊलवाटा दाखवून गेले.