Saturday, October 3, 2015


बंदिश आलाप आणि रिमिक्स
                                                                                             anjalimalkar@gmail.com



गायनाच्या क्लासमध्ये मुलींना एक बंदिश नुकतीच शिकवून झाली होती. गाण्याविषयी अशाच गप्पा चालू असताना एकीने मोबाईल मधल्या व्हॉट्स अॅप मधून व्हायरल झालेले एक जुनं चित्रपटगीत ऐकवले. ते गीत त्या काळात बरंच लोकप्रिय झालं होतं. मूळ गीत एका नामवंत संगीतकाराने संगीतबद्ध केले होते आणि एका थोर गायिकेने त्याचे सोने केले होते. तेच गीत आज मी एका प्रसिद्ध गायकाकडून ऐकत होते. मूळ गीतातला मुग्ध शृंगार,संगीतकाराने त्या काव्याला संगीत देताना केलेला सुंदर विचार आणि अप्रतिम गायन, आज ऐकत असलेल्या त्याच गीतामधून कुठेच दिसत नव्हते. गायकाचे नाव होते, त्याचे गायन कौशल्यही वादातीत होते. पण या शृंगारिक गीताला त्याने आलाप, ताना, मुरक्या घेऊन पार बिघडवून टाकले होते. संपूर्ण गीत ऐकल्यावर मी नवल करू लागले ‘ का बरं यांना असं करावसं वाटलं? का इतरांची रचना आपले गायन कौशल्य दाखवण्यासाठी वापरावी वाटली? विचारांची आवर्तने एका पुढे एक सुरु झाली. मग असं लक्षात आले की केवळ यांनीच नाही तर अनेक प्रसिद्ध कलाकारांनी जुनी लोकप्रिय गाणी घेऊन आलाप, ताना घेण्याचा सपाटा लावला आहे आणि श्रोतेही त्याला भरभरून दाद देत आहेत. पाच मिनिटांचे गाणे वीस,पंचवीस मिनिटे गाण्यात ना कलाकाराला प्रॉब्लेम ना श्रोत्यांना. विन् विन् सिच्युएशन म्हणतात ते बहुधा यालाच ! कधी मूळ गाण्याच्या सुरावटीमध्ये काही वेगळे सूर घालून चमत्कृती निर्माण करायची, कधी वर खाली धुंवाधार ताना घेऊन श्रोत्यांना स्तिमित करायचे, आणि अस्सल गाणं गायल्याचा फील द्यायचा. सगळंच मजेशीर ! सगळं भुलणं ‘ वरलिया अंगा ‘ शी होते. तेव्हा एका मोठ्या संगीतकाराने म्हटलेले वाक्य आठवले “ अवघड गाणं म्हणणं सोपं असतं, पण सोपं गाणं म्हणणं अतिशय मुष्कील. बुद्धीला चाळवणं सोपं असतं पण हृदयाला हात घालणं अतिशय अवघड”. मग आठवली मुकेश यांच्या आवाजातली सादगी, लताबाईंच्या आवाजातली निकोपता, रफीसाहेबांच्या आवाजातला प्रामाणिकपणा. सर्वच आवाज हृदयस्पर्शी ! संगीतकारांनी रचलेल्या गाण्याचा हेतू सफल करणारे. त्यांनी गायलेल्या रचनेतल्या सौंदर्याचा मोह होऊन मग अनेक नवीन गायकांना ती गाणी गावीशी वाटू लागली. त्यातल्या काहींनी आपले कौशल्य दाखवण्याच्या अनिवार इच्छेपोटी, गाण्यातला विवेक बाजूला ठेवला आणि शक्तीप्रदर्शनालाच प्रतिभा म्हणू लागले. तांत्रिक बाजू बळकट असल्यामुळे आलाप, तानांच्या हुकुमी मसाल्याने गाण्याची लांबी देखील भरपूर वाढवली. थोडक्यात गाण्याची बंदिशच केली. विचाराचे मंथन ‘बंदिश’ या शब्दावर येऊन थांबले. अनेक वर्ष, अनेक रागांच्या अनेक बंदिशी गायल्यावर पुन्हा बंदिशीचा नव्या संदर्भाने पडताळा घ्यावा असे वाटून गेले.

खास राग संगीतातला शब्द ‘बंदिश’ म्हणजे रागातालात बांधलेली आकर्षक रचना. राग रसाच्या इष्टमन कलर मधला एक रंग म्हणजे बंदिश. रागासारख्या महासागरातील एक ओंजळ म्हणजे बंदिश. एका ओंजळीत महासागरातील पाण्याचे सर्व वैशिष्ट्ये सामावलेली असतात,पण म्हणून सगळा समुद्रच ओंजळीत येत नाही त्याचप्रमाणे बंदिश सुद्धा रागस्वरांच्या रक्तामांसानेच बनलेली पण आपलं वेगळं अस्तित्व जपणारी असते. मधल्या काळापर्यंत ती इतकी प्रबळ होती की गायक मंडळी रागाच्या नावाने न गाता तिच्या नावाने गायचे. म्हणजे राग यमन गातोय असं न म्हणता ‘कह सखी’ पेश करणार आहे असे म्हणायचे. राग नावाच्या अमूर्त रसाचा मूर्त भाव असणारी बंदिश एक रसरशीत चैतन्यपूर्ण अभिव्यक्तीच असते. लयतालाच्या वस्त्राने ती कधी चंचल अभिसारिका होते, तर कधी विरहात बुडालेली विप्रलब्धा. कधी भांडणारी कलहन्तरिता, तर कधी सुखावलेली स्वाधीनपतिका. एकाच स्त्रीमधल्या या अनेक नायिका जशा जीवनाचा मूळ रस व्यक्त करतात तशाच एका रागाच्या अनेक बंदिशी राग रसाचा मूळ रस ‘आनंद’ श्रोत्यांपर्यंत वेगवेगळ्या भावातून पोहोचवत असतात. त्यामुळे पूर्वी ज्या गवयाला एका रागातल्या अनेक बंदिशी येत,, त्याला गाण्यातल्या श्रीमंतीसाठी वापरला जाणारा खास शब्द ‘कोठेवाले गवयी’ म्हणायचे. अशा या बंदिशीच्या अंतरंगात सामावलेले रागाचे स्वर जनुके, मींड, कण, खटका, मुरकी, गमक अशा अलंकारांनी सजून, संवाद, पुनरावृत्ती, संतुलन, विरोध सारख्या सौंदर्यमूल्यांच्या स्वभावाने आपले व्यक्तिमत्व घडवतात. दहा, बारा, किंवा सोळा अशा मात्रांच्या तालातल्या दोन, चार, आठ अशा मात्रांनी आपला मुखडा ( तोंडावळा) बनवून धीम्या, मध्य, किंवा जलद लयीत आपले चालणे ठरवून संपूर्ण तयारीनिशी जेव्हा त्या श्रोत्यांसमोर येतात तेव्हा त्यांच्या काळजाचा ठोका चुकतो. हिंदी भाषेच्या बहिणी ब्रज, मैथिली, किंवा अवधी या बंदिशींची देहबोली असल्यामुळे त्यांच्यातली अंगभूत लवचिकता, माधुर्य आणि मृदुता गायक आणि श्रोत्यांची मने जिंकून घेतात. तिच्या प्रेमात पडलेला गायक स्थायी आणि अंतरा या दोन भागात तिला फिरवत हळू हळू शब्दलोकातून स्वरलोकात घेऊन जातो. शब्दाला चिटकलेल्या स्वरातले आकार, इकार, उकार, मकाराच्या नादाकृतींमध्ये तिला खेळवतो. कधी एका स्वरावरून दुसऱ्यावर नेलेला झोका, कधी लागोपाठच्या स्वरांनी केलेली घसरगुंडी, कधी एक आड एक स्वरांचा खो खो, खेळता खेळता ते हरवून जातात. या नादरंगात भिजता भिजता दोघांनाही परतत्वाची ओढ लागते. नकळत राग रसाचा चस्का लागून अतृप्ती वाढते. अजून हवंय अजून हवंय असं म्हणत कधी शब्दांना तर कधी स्वराकारांना या रसात घोळवून तालाच्या चौकटीत खेळवून बोल आलाप आणि आलापाची पेशकारी सुरु होते. रागातले स्वर कधी झिम्मा, तर कधी गोफ विणत शब्दार्थातून मोकळी होतात. कधी एखाद्या स्वरावर रेंगाळत, तर कधी स्वरांची भेंडोळी करून ताल आणि स्वरांचा विलास दुसऱ्या जगात नेतो. असा किती वेळ जातो, डाव किती वेळ रंगतो कळतच नाही. शब्दांना मागे टाकत स्वरांच्या अशा नक्षीदार आलापीतून दोघेही देहातीत होतात. रागातली ही स्वरांची गोंदणे रस रंग तयार करून अवघा आसमंत दरवळून टाकतात. बंदिशीच्या अक्षरशः चार ओळीतून ही रागाची मायानगरी उभी राहते. फैलावलेल्या या रागाच्या आलापीला आता भावनेचा भार सहन होइनासा होतो. तिची पावले जलदगतीने आणि तीव्रतेने पडू लागतात. शब्दभाव, स्वरभावातून तालपरिक्रमेत फिरणारा रागभाव मुखड्याच्या गाडीतून समेवरल्या भोज्यावर येऊन येऊन कंटाळतो. त्याची तीव्रता वाढू लागते. घरंगळणाऱ्या मोत्यांप्रमाणे स्वर संपूर्ण आवर्तनभर घरंगळू लागतात. हे मोती कधी व्यंजनांच्या रंगात रंगतात तर कधी स्वरांसारखे स्फटिक होतात. पुढे पुढे हे घरंगळणे देखील संपून जाते आणि स्वरवर्षावातून तानांचे रूप उलगडू लागते.सटकन बाणासारखी जाणारी छूटची तान, गडगडत जाणारी गमकेची तान, सापशिडीच्या खेळासारखी घटकेत वर तर घटकेत खाली जाऊन परत वरच्या दिशेने धाव घेणारी वक्र तान, नाना प्रकारच्या स्वरप्रतिमा हा जादुगार राग तयार करतो. गायकासहित श्रोत्यांना संमोहित करत आपले वर्चस्व प्रस्थापित करतो. सगळा आसमंत रागमय होऊन जातो. एकरस होतो.

बंदिश, आलाप, ताना यांचा हा अद्वितीय नाट्य रस संपला आणि मी भानावर आले. त्यांच्या सौंदर्यशक्तीची मला पुरेपूर प्रचीती आली होती. एवढेच नाही तर या शक्ती एखाद्या भावाला जेवढ्या उंचीवर नेऊ शकतात तेवढ्याच खड्ड्यात पण घालू शकतात याची ही कल्पना आली. एखाद्या सौंदर्यवतीने समारंभानुरूप जर माफक दागिने घातले तर जशी ती खुलून दिसते पण तेच अंगभर दागिने घालून मिरवले तर बेगडी सौंदर्याच्या प्रदर्शनाशिवाय दुसरे काही साध्य होत नाही हे जितके खरे होते, तितकेच खरे माफक स्वरालंकरणांनी नटलेल्या रचनेचे होते. नादाचा पोत, शब्दांचे उच्चारण, गायन प्रकाराच्या भावसौन्दर्यानुसार माफक आलाप तानांनी म्हटली गेलेली रचना, कलाकारासहित श्रोत्यांना एका उंचीवर आणून आनंद द्विगुणीत करते. समाजाच्या श्लील अश्लील संकेतांना ही सौंदर्यमापके चार चांद लावतात. मिडास राजासारखा हात लावेल तिथे सोने होण्याचा वर मिळालेल्या सिद्ध गायकांना तर ही मोकळी कुरणेच असतात. अत्यंत आकर्षक आणि धुंद करणारी. त्यामुळे विवेकाचे बळ जर त्यांना मिळाले तर संगीतासारखी प्रभावी कला दुधारी तलवार न होता एक अमृतानुभव होऊ शकते.