Tuesday, March 7, 2017

शुद्धकल्याणच्या निमित्ताने




             शुद्धकल्याणच्या निमित्ताने .......

                                    अंजली मालकर


कलेचे प्रवाहित्व हे तिच्या जिवंतपणाचे लक्षण मानले गेले आहे. शतकानुशतकाच्या वाहण्यात त्यातल्या काही गोष्टी बदलतात, काही पुढे प्रवाहित होतात. संगीतकला विशेषतः भारतीय शास्त्रीय संगीतासारख्या कलेमध्ये, ज्यात पारंपारिक कला सौंदर्याची गृहीतके असोशीने सांभाळली जातात, नव्हे मिरवली जातात, त्यात बदलाचा स्वीकार जरा उशीराच होतो. काळाच्या प्रवाहात रागरूपे बदलतात, प्रस्तुतीकरण बदलतात, कधी कधी कलेची उद्दिष्टे देखील थोड्याफार फरकाने बदलतात. पण सूर लयीची चिरंतन मुल्ये अबाधित रहातात, रहात आली आहेत. सूर लयीशी एकरूपत्व हे पूर्वीसुद्धा आणि आजही कलेचे सर्वश्रेष्ठ ध्येय मानले गेले आहे. परवा कृष्णाजी गाडगीळ स्मृती सभेत पं. विकास कशाळकर यांनी गायलेला शुद्धकल्याण अशीच चिरंतन संगीतमुल्ये दाखवून गेला.
कशाळकर सर माझे गुरु. एखाद्या शिष्याने गुरूविषयी काय बोलावे? जवळच्या माणसाविषयी बोलणे खरंतर अवघडच नव्हे अशक्यच असते. सरांच्या या आधी अनेक मैफली मी ऐकल्या आहेत. तरीपण गुरूच्या गायनाचे परिपक्व दर्शन आणि शिष्याच्या संगीत आकलनाचा परिपक्व टप्पा म्हणून या सभेतल्या शुद्धकल्याणाकडे  मला पहावेसे वाटले. त्यांनी गायलेल्या शुद्धकल्याणने शास्त्रीय संगीतातील मला माहित असलेल्या काही पारंपारिक मूल्यांना प्रश्न विचारले. मैफिल मारणारे गवयी म्हणून सरांचा लौकिक नाही, पण शास्त्रशुद्ध, प्रयोगशील, अभ्यासू कलाकार म्हणून शास्त्रीय संगीत क्षेत्रात त्यांचे नाव आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या गायनाने माझ्या संगीत चिंतनाला परत मुळाकडे नेले.
शास्त्रीय संगीतात घराणेदार गायनासाठी भरदार, पल्लेदार आवाजच लागतो, नाहीतर ते सुगम संगीत होते या माझ्या पहिल्या गृहितकाला त्यांनी छेद दिला. सरांचा आवाज पातळ आणि मर्यादित पल्ल्याचा. पण जेव्हा या गृहितकाला बाजूला सारून त्यांच्या आवाजात डोकावले तर जाणवली ती आवाजाची पारदर्शक, हलक्या जवारीची नाजूक स्थिरता ! साबणाच्या पाण्याचा मोठा बुडबुडा अलगद हातावर स्थिरावावा इतका अलवारपणा. मग मी अजून आत शिरले, तेव्हा दिसले सौम्य, मधुर विशुद्ध सूर ! एरवी अनेकवेळा आपला मुद्दा पटवण्याच्या नादात स्वरांवर अवाजवी दाब दिला जातो, विनाकारण आवाज मोठा होतो. अहंकाराची छोटी खेळीच असते ती. पण इथे जाणवला तो सुरेल तंबोऱ्याला समर्पित सहज सूर. शुद्धकल्याण मध्ये षड्जावरून धैवताकडे जाताना लागणारा निषाद, आणि पंचमाकडून गांधाराकडे जाताना लागणारा तीव्र मध्यम, पक्ष्याने वरच्या फांदीवरून खालच्या फांदीवर  बसताना हलकेच उतरावे असा होता. ते उतरणे इतके हलके, की मला वाटले हा स्वरपक्षी फांदी चुकणार. बसताना देखील कुठे धडपड नाही, अंदाज चुकण्याचा संदेह नाही. त्या अलगदपणाने शास्त्रीय संगीतातील माझ्या ठोसपणाच्या गृहितकाला दुसरा धक्का दिला. शुद्धकल्याणची ही सात्विक सुंदर शीतल आभा, पूर्णचंद्रासारखी मैफिल भर पसरली होती. तिलवाड्याचा ठेका सुरु झाल्यावर स्वरलयीचे नक्षीकाम सुरु झाले. रागवाक्य छोटी होती, पण फेड आउट आणि फेड इन मुळे ती तंबोऱ्यात मिसळून त्यांना दिर्घत्व मिळत होते. लहान श्वासात इतकं सहजपणे मांडणे, ते ही कुठलीही ओढाताण स्वतःला आणि इतरांना न जाणवता, म्हणजे मनाच्या स्थैर्याची केवढी मशागत असणार ! गाताना सर दोन रागवाक्यांमध्ये अवकाश ठेवत होते. कधी एका मात्रेचा तर कधी दोन मात्रेचा अवकाश. एक वाक्य संपल्यावर दुसरे वाक्य टाकायच्या मधला अवकाश असा काही तोलत होते की जसं काही अवकाश पेरत त्यांची आवर्तनाची कशिदाकारी चालली आहे. तंबोऱ्याला लगडलेले शुद्धकल्याणचे सूर आणि लयीला बिलगलेल्या रागवाक्याने सगळेच जण ‘प्रवाहपतित’ झाले होते.
शब्द, हे शास्त्रीय संगीतात स्वर टांगायच्या खुंट्या आहेत किंवा अडगळ असतात अशी धारणा असणारे बरेच गायक आहेत. माझी अशी धारणा नसली तरी शास्त्रीय संगीत हे सुराधीष्ठितत संगीत असल्यामुळे शब्दांवर विशेष मेहनत घ्यायची गरज नसते या गृहितकाला देखील शुद्धकल्याणने छेद दिला. व्यंजनांच्या शेवटी येणाऱ्या आकार, इकार, उकार आणि मकार यांना श्वासाच्या नियंत्रित दाबाने फुलवले तर त्यांची प्रभा किती उल्हासित करू शकते याची प्रचीती सरांच्या शुदकल्याणने तेव्हा दिली. कधी इकाराच्या चपटेपणाला धारदार करीत, कधी उकारात स्वरांची भेंडोळी सोडत, ‘न’ कारात नाकाचा संयमित वापर करीत त्यांनी या अमूर्त नादाकृती अधिक व्यापक आणि अर्थपूर्ण केल्या. एका लयीत धावणाऱ्या घोडागाडीत बसल्यावर जी एकतानता जाणवते, ती, सरांच्या बोलताना आणि ताना ऐकताना तिथे जमलेल्या श्रोत्यांना लागली होती. मधाळ आलापी नंतर सुखावह वाटेल इतकाच जोर देत गमक आणि आघातांच्या तानलडी बरसत होत्या. अनेकवेळेला अवाजवी पुरुषी आक्रमकता दाखवण्यासाठी अंगावर धावून येणाऱ्या किंवा डोक्याला मुंग्या येतील इतक्या खाली वर ताना घेणाऱ्या अनेक गायकांच्या तुलनेत या ताना अंगभर मोरपीस फिरवून गेल्या. माझ्या मनाची तृप्ती झाल्यामुळे माझ्यासाठी ही मैफल इथेच संपली होती. खरतर कुठल्याही मैफिलीचे यश हे केवळ कलाकारच नाही तर रसिकांवर देखील अवलंबून असते. भिंग लावून चुका काढण्यापेक्षा, रसिकांचे मनाचे औदार्य, सहिष्णुता कलाकाराची कला आणि कलाकार या दोघांना वेगळ्या उंचीवर नेते. याचाही अनुभव या मैफिलीच्या निमित्ताने आला. मोठमोठ्या समारोहामध्ये भिरभिरणाऱ्या डोळ्यांनी श्रोत्यांना न बघता छोट्या बैठकांमध्ये रसिकांच्या नजरेला नजर देऊन पावती मिळवणाऱ्या मैफिलींची रंगत या सभेत  शुद्धकल्याणने आणली. गाणं कुठल्या घराण्याचे होते, किती कौशल्यपूर्ण होते, शास्त्रीय कसोट्यामध्ये किती बरोबर होते, यापेक्षा विचारांचा एकजिनसीपणा, कल्पकता यातून निर्माण होणारा प्रवाह या रागाने मला दाखवला. त्यातील मानवीयता मला अधिक व्यापक आणि उदार बनवून गेली. प्रवाहात गाण्याचे आणि जीवनाचे देखील सार दडले आहे, या शाश्वत मूल्याची या निमित्ताने पुन्हा एकदा आठवण हा शुद्धकल्याण देऊन गेला.