सुवर्णभूमीतल्या स्वरसावल्या
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. गोष्ट
तुमच्या माझ्या पूर्वजांच्या पूर्वजांच्या पूर्वजांची. एका आटपाट देशामध्ये ते रहायचे.
देश कसला मोठ्ठा प्रदेशच होता तो. उपखंडच म्हणा ना त्याला ! सुजलाम सुफलाम त्याचे
नाव होते. नावाप्रमाणेच होता तो भाग, सदाहरित वृक्षराजिंपासून मोसमी झाडांपर्यंत
असणारी जंगलं, खळाळणाऱ्या अवखळ झऱ्यापासून महाकाय नद्यांपर्यंत नवजीवन
पाणी, लांबून सुद्धा ज्याचा दाह जाणवायचा अशा गंधकाच्या उष्ण स्रोतापासून हाडं
गोठवणाऱ्या हिमनगापर्यंत पर्वत, क्षितिजापर्यंत पसरलेल्या वाळवंटापासून डोळ्यात
मावणार नाही इतक्या दूरवर हजारो गलबत वाहून नेणाऱ्या सागरापर्यंत, किडे, मुंगी, पशू, पक्षी काय नव्हतं या
उपखंडात. पृथ्वीवरच्या भौगोलिक वैविध्याचे लघुरूपच जणू ! सुजलाम
सुफलाम मध्ये राहणारी संस्कृती सुद्धा अशीच बहुरंगी बहुढंगी. कित्ती प्रकारचे वेष, केवढ्या भाषा, खाण्या
पिण्याच्या केवढ्या पद्धती. नंदनवनच म्हणायचं की याला ! अशा रंगाढंगात वावरणारी इथली
माणसं बुद्धिमान, लवचिक आणि श्रद्धाळू होती. अध्यात्म, कला, तत्वज्ञान, भाषा आणि उपचारपद्धती
या पाच अदृश्य धाग्यांनी इथल्या माणसांभोवतीचे कोष घट्ट विणले गेल्यामुळे ती त्यात
अत्यंत सुरक्षित होती. बाहेर कितीही आक्रस्ताळेपणा झाला तरी मनाचा गाभा शाबूत
राही. मनात उमललेली स्वप्न पंचमहाभूतांवर स्वार होत आणि ज्ञानाची कवाडे सताड उघडी
होऊन नाद, स्पर्श, रूप, गंध आणि रसनेची अलौकिक आभूषणे समाजात मूर्त
रूपात प्रकट व्हायची. बुद्धिमत्तेचा पिवळा, चैतन्याचा हिरवा आणि भक्तीच्या भगव्या
रंगातून फाकलेल्या सुवर्णप्रभेने या अवघ्या उपखंडाला सुवर्ण भूमी केले होते. पुनर्जन्मावर
प्रगाढ विश्वास आणि मोक्षसाधना हेच
आयुष्याचे अंतिम ध्येय अशा मुशीतून घडलेल्या इथल्या लोकमानसाच्या सावल्या स्थिरता
आणि दैववादाच्या अद्भुत मिलाफातून बनल्या होत्या. समाजरचनेतल्या आपल्या आपल्या
पायऱ्यांचा मनापासून स्वीकार करून त्यात आयुष्याची सार्थकता शोधणे यात इतर सर्व
लोकांप्रमाणेच तिथली कलाकार मंडळीही सहभागी होती. राजाश्रयातील स्निग्धता, स्वप्रतिभेच्या
सुगंधाची उमज आणि कला निर्मितीतून मोक्षसाधनेचे ध्येय हेच त्यांचे भाव विश्व होते.
एकाच कला प्रकाराचा ढोल बडवण्यापेक्षा बहुपदरी कलाज्ञानातून आलेली समृद्धता शिल्प,
प्रासादे, मंदिरे यातून ओसंडून वाहत होती. समाजातील या सौख्याचे समाधान लोकोत्सवात
गाणाऱ्या, वाजवणाऱ्या तुर्यवादकाच्या आनंदी चेहऱ्यांवर स्वच्छपणे दिसून येई. अवकाश
तत्वाशी नाते सांगणारी नादविद्या आणि स्थापत्य कला यांचा सूक्ष्म अभ्यास करून
नर्तकी राणीच्या रंगमंडपात शेकड्याने उभे असलेले वाद्यनादाचे स्तंभ तिच्या संगतीसाठी
कोरण्याची किमया करणाऱ्या किमयागार कलाकारांनी पुढच्या अनेक पिढ्यांसाठी हा वारसा ठेवला
होता. आपल्या प्रज्ञेच्या जोरावर संगीतासारख्या अलवार कलेला शिल्परूपात गोठवून
ठेवण्याची किमया त्यांनी साधली होती. या
अशा विस्मय चकित करणाऱ्या कलाकृतींचे पडसाद नंतरच्या अनेक पिढ्यांना एकाचवेळी अंतर्मुख
आणि बहिर्मुख करून जात होती.
परंतु काळाची चक्रे फिरली. सुजलाम सुफलाम स्वप्नभूमीला
ग्रहण लागले. सुवर्णमृगाच्या सुगंधाने वेडावलेले याचक या भूमीचे दार ठोठावू लागले.
अतिथीच्या रूपाने आलेल्या काळाने, दिलेल्या ओसरीचा अपमान करीत घराचा ताबा मिळवला. ज्या
घराची दारे उघडली नाहीत, ती दारे फोडून तिथली समृद्धता लुटून नेण्याचा उद्दामपणा
देखील करण्याचे त्यांनी सोडले नाही. इतके दिवस लुटुपुटुच्या लढायांची सवय असलेल्या
या सुवर्णभूमीतल्या लोकांच्या मनाच्या गाभ्यालाच जेव्हा धक्का बसला तेव्हा सारा
उपखंडच थिजून गेला. जगण्याचा जीवनरस असणारे दृश्य अदृश्य धागे तुटू लागले आणि सारा
समाज सैरभैर झाला. हे सारे हतबद्धपणे पाहत असलेल्या कलाकाराला प्राणापलीकडे
जपलेल्या कलेची विटंबना सहन करणे जेव्हा शक्य झाले नाही, तेव्हा त्याने कलेला सती
चढवले. आपले प्रज्ञाचक्षु बंद करून टाकले आणि राजाश्रयाची स्निग्धता हरपल्याने
मोक्षमार्ग स्वतःसाठी आणि इतरांसाठीही नाकारला. इतिहासाला एवढी जबर शिक्षा
कुठल्याच काळात मिळाली नव्हती. ऐहिक श्रीमंतीचा पुरेपूर उपभोग घेणाऱ्या याचकाला या
भूमीच्या कलेतली समृद्धी कळलीच नाही. इथल्या मनांचा धागाच उलगडला नाही. पुढच्या
काळात सत्ताधीशांनी मग आपल्या पद्धतीने ही समृद्धी विलासितेत परिवर्तीत केली. आता
गर्भरेशमी वस्त्रातल्या मखमली तेजापेक्षा चटकदार चमकेचा भाव जास्त वधारला होता.
लोकोत्सवातले तुर्यवादक अस्वस्थ झाले होते तर किमयागार कलाकारांची प्रतिभा निस्तेज
झाली होती. संभ्रमातून आलेल्या निष्क्रियतेचा अंमल साऱ्या समाजावर चढू लागला. स्त्रियांचा
मुक्तपणा बंदिस्त झाला. पारंपारिक ज्ञानाचे कंबरडे मोडले. कलाकार देशोधडीला लागले
आणि समाज जीवनाची घडी विस्कटली. जसे जसे समाजाला हीनत्व स्वीकारण्यात धन्यता वाटू
लागली तसा तसा या सुवर्णभूमिच्या समृद्धतेभोवती फास आवळला गेला................
न जाणे कितीक पिढ्या तशाच गेल्या. आता इथल्या
माणसांभोवती असलेल्या कोषाचे धागे विदीर्ण होऊन त्यांची मनं कधीच उघड्यावर आली
आहेत. समृद्धतेच्या कलेवरावर देखील आता खरेदी विक्रीचे ठोक व्यवहार या सुजलाम
सुफलाम देशात होतात. स्थिर चित्ताच्या निढळ मनाला आता शोधावे लागते. भिरभिरणाऱ्या
डोळ्यांनी स्वीकारलेली तडजोड राजरोस झाली आहे. प्रज्ञा आणि समाधानाचा आस्वाद
घेणाऱ्या हाडामांसाचे कलाकार दुर्मिळ झाल्यामुळे वीजेवर चालणारी रसहीन वाद्ययंत्र मानवी
आनंदाची रोबोटिक अभिव्यक्ती बनली आहे. जगण्यासाठी
काम न करता कामासाठी जगणाऱ्या यंत्रमानवी कलाकारांची फौज ही सध्या इथली कथा आणि
व्यथाही. सामुहिक प्रतिभांचा वापर तेव्हाही होता आजही आहे. फरक पडला तो स्वप्नांमध्ये
!
आज रणरणत्या उन्हात कालच्या समृद्ध अवशेषांचे
शिल्पस्वर ऐकताना आणि त्याच वेळी वास्तवातला गोंगाट पाहताना मन काहूरले. त्याच मातीत
जगलेल्या आणि जगणाऱ्या दोन वेगळ्या जगांचा महासेतू बांधताना माझी दमछाक झाली. कलाकाराची
भावुकता आणि नियतीची तटस्थता यांचे द्वंद्व बघताना बेचैन झाले. अनुपम अशा कलाभूमीत
अजूनही एखादा चैतन्यमयी स्वर कोणीतरी गाईल या आशेने, ही शोधयात्रा थोडी थांबवून पुन्हा सुरु
करण्याच्या मानसाने मी परत फिरले.
No comments:
Post a Comment