Thursday, April 6, 2017

शोध एका जिप्सी स्वराचा ..........




                              
                                
शोध एका जिप्सी स्वराचा ..........
                                                    अंजली मालकर


भारतीय संगीताच्या निरंतर प्रवाहात असे काही कलाकार होतात जे ‘मार्गी’ असतात. नवीन मार्गाचा शोध घेत, प्रचलित क्षितिजे विस्तारण्याचे काम करतात. संगीताच्या स्वर,लय,शब्द या मूळ घटकांकडे पुन्हा नव्याने पहात एका अर्थाने परंपरेचा वसा पुढे चालवत असतात. किशोरी आमोणकर हे या मार्गी कलाकारांमधले ठळक नाव होते. माझ्यापुरते बोलायचे तर ‘किशोरीताई’ या fatal attraction चा शोध अपूर्ण राहणार याची चुटपूट मनात कायमची राहणार असे वाटून गेले. त्यांच्या स्मरणरंजनात राहताना आठवले ते पोथीनिष्ठ तरुण मनावर पडलेले भूप, बागेश्री आणि जौनपुरीचे आव्हानात्मक ठसे. त्या अबोध वयातही ‘बाजे झनन’ मधला आवेग स्पर्शून गेला होता. ‘छननन बिछुवा’ मधला खनकदारपणा त्यावेळी भलताच आवडून गेला होता. गाणे शोधण्याच्या प्रवासात मला किशोरीताई नावाचे वादळ कळत्या वयातच भेटले. अनेक थोरामोठ्यांच्या उंचावलेल्या भुवया, तटस्थ आवाज झेलीत छातीठोकपणे उभे ठाकलेले वादळ ! चौकटीतले प्रश्न सोडवण्यात गुंतले  असल्यामुळे, या चौकटीबाहेरच्या प्रश्नाला तेव्हा वैकल्पिक म्हणून सोडून दिले होते. आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात त्याच्याकडे पाहता येईल म्हणून त्यांच्या विचारांना तेव्हा बाजूला ठेवले होते. पण या विचारांनी परत परत धडका देऊन, असे फार काळ बाजूला ठेवता येणार नाही अशी तंबीच मला तेव्हा दिली होती. शास्त्राला वाकवत, कधी झुगारत, तर कधी कधी त्याच्याशी दोन हात करत, त्याचेच तत्व त्याच्या गळ्यात टाकण्याचा ताईंचा बेधडकपणा समजून घेण्याची माझ्या कलामनाची कुवत एकीकडे वाढवत असताना दुसरीकडे स्वतःच्या अनुभवाशी एकनिष्ठ राहून तर्क आणि विवेकाचा काटा तोलत होते.....

वेळ सकाळची. टिळकस्मारक मध्ये किशोरीताई गाणार होत्या. हॉल संपूर्ण भरलेला होता. सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. टाळ्यांच्या कडकडाटात ताई स्वरमंचावर बसल्या. त्यांनी हातात स्वरमंडळ घेतले, डोळे मिटले आणि तोडीच्या स्वरांनी रंग भरायला सुरुवात केली. बराच वेळ षड्जाभोवती घुटमळत त्यांनी कोमल रिषभ लावला, आणि रसिकांची कुजबुज सुरु झाली. माझ्या शेजारच्याने त्वरित कोमल रिषभ ‘चढा’ लागलाय असा निर्वाळा देऊन टाकला. माझ्या तोपर्यंतच्या स्वरानुभावानुसार तो रिषभ चढाचहोता. त्या दिवशी ताईंनी संपूर्ण मैफल त्या ‘चढ्या’ रिषभाने रंगवली. कार्यक्रम संपल्यावर मी विचार करू लागले तर जाणवले ते संपूर्ण रागभर राखलेले ‘चढा’ रिषभाचे स्थान, त्याला वापरून केलेल्या विलक्षण स्वरसंगती आणि गवताच्या पात्यासारखे लवलवित स्वर ! तो राग त्यादिवशी माझ्या डोळ्यात अंजन घालून गेला. त्या कार्यक्रमानंतर त्यांचा तोडी अनेकवेळा ऐकायला मिळाला. पण त्या दिवशीच्या तोडीने कला, कलाकार आणि परंपरा यावर जे भाष्य केले, त्याने माझी रागरसास्वादाची अनेक कवाडे उघडली. संगीतासारख्या श्राव्य कलापरंपरा कालप्रवाहात वाहताना एखाद्या महानदी सारख्या आपला प्रवाह बदलता ठेवत असतात. त्यात रागातल्या स्वरांच्या श्रुतींचे थांबेदेखील काळाच्या प्रवाहात बदलतात. काल ज्या श्रुतीचा थांबा स्वर झाला असतो, तो कदाचित आज नसतो. उद्या अजून वेगळाच असू शकेल. इतक्या सूक्ष्म पातळीवर चाललेल्या श्रुतींच्या भरती, ओहोटीवर आपली हुकुमत ठेवणे अशक्यच ! त्यामुळे त्याक्षणी कलाकाराच्या सृजनपटलावर स्वराची कुठली ‘कला’ उमटेल आणि ती ‘कला’ घेऊन तो कलाकार रागाच्या किती कॅलिडीओस्कोपिक सौंदर्याकृती निर्माण करून त्याचे भावबंध रसिकांपर्यंत पोहोचवतो हीच त्याची कामगिरी !

जन्माच्या आधीपासून गाण्यात बुडालेल्या किशोरीताईंना त्यांच्या घराण्याच्या पारंपारिक ज्ञानाचे आकलन खूप लवकर झाले. घरातून मिळालेली गाण्याची सौंदर्य खाण आणि त्याच्याविषयी बाहेरच्या जगात असलेली उदासीनता, अज्ञान यातून त्यांच्यातला कलाकार डिवचला गेला असावा आणि जे हाती घेईन ते सुंदर करून ठेवीन या मनस्वी आवेगाने त्यांनी मुळातून काम सुरु केले. एखाद्या शास्त्रज्ञाप्रमाणे गायन परंपरांचे पुनरावलोकन त्या करू लागल्या. भरताच्या नाट्यशास्त्रापासून जगन्नाथ पंडिताच्या रसगंगाधरापर्यंत अनेक रसशास्त्र, नाट्य, काव्य ग्रंथांचे वाचन मनन, चिंतन करण्याच्या ओघात संगीतातील प्राणघटक ‘स्वर’ याचे दर्शन त्यांना घडले. स्वयंप्रकाशी उर्जा जेव्हा कंठातून उमलते, तेव्हा तिचा असर स्वतःसह सर्वांना आपल्याकडे ओढून नेतो याची जाणीव किशोरीताईंना याच दरम्यान झाली असणार. त्यानंतर त्या असराचा शोध घेण्यासाठी त्यांचे मन जिप्सी झाले. त्याच्या शोधात व्याकूळ झाले. ही विरहदग्धता जेव्हा स्वररूपाने प्रस्फुटीत झाली, तेव्हा रागरूपाची मानवी बंधने गळून पडली. कधी ती झुगारली देखील गेली ! हा स्वरकृष्ण एकांतात भेटू शकतो असे वाटल्यामुळे चिंतन, मनननाने एकांतिक झालेल्या किशोरीताई अधिकाधिक आपल्याआपल्यात राहू लागल्या. ‘भेटी लागी जीवा लागलीसी आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी’ अशी अवस्था त्यांची झाली असणार. एकीकडे या स्वयंप्रकाशी उर्जेचे गुपित रसिकांना सांगण्याची तळमळ, तर दुसरीकडे ती निसटून जाईल म्हणून जगाला पाठ करून त्याच्या मागे धावण्याचा आवेग, अशा द्वंद्वात सापडलेले त्यांचे कलामन मला त्यांच्या कलाविचाराचा मागोवा घेताना दिसू लागले. अर्जुनाला बाण मारताना झाडावरल्या पक्षाचा फक्त डोळाच जसा दिसत होता, त्याप्रमाणे किशोरीताईंना केवळ ‘स्वरत्व’ दिसू लागले होते. स्वरातली लय, शब्दातील स्वरत्व, त्याची व्याप्ती, स्वरभाव, त्याचा प्रभाव यांच्या अस्पष्ट जाणीव त्यांना अस्वस्थ करू लागल्या. त्या ‘स्वराला’ सखा बनवण्यासाठी धडपडत होत्या. त्यामुळे व्यावहारिक जगातले विसंगत आयुष्य त्या जगत असतानाही या विसंगतीकडे डोळेझाक करून त्यांच्या स्वरामृताला प्राशन करण्यास उत्सुक असलेला रसिकवर्ग सदोदित त्यांच्या मैफलीला हजर असायचा. स्वरसख्याबरोबर राहताना त्यांचा स्वरभाव कधी आरक्त राधेचा होई तर कधी विरागी मीरेचा ! त्यांचे गाणे मानवीय होते. मनुष्याच्या अनंत रंगात रंगलेले त्यांचे स्वर त्यांच्या जीवनदर्शनाचा मोठा भाग व्यापून होते.

सृजनशील कलाकार ही मोठी बेटं असतात. किनाऱ्यावर उभे असणाऱ्या लोकांना ती स्वतःकडे खेचून घेतात. त्यांच्यावरील सौंदर्यशोभा पाहणाऱ्याला नेत्रसुख आणि चित्तशांती देतात. पण जर त्या बेटाच्या जवळ गेलात तर तुमचे स्वागतच होईल असे नाही. ते जरी अंगाखांद्यावर वृक्ष, वेली, झुडुपं खेळवत असली तरी एका क्षणी ते बेट कोणाचेच नसते. ते केवळ स्वतःचेच असते. त्याची सुखदुःख त्याचीच असतात. ती इतर कोणाची नसतात, होऊ शकत नाहीत. किशोरीताई देखील अशाच एक बेट होत्या. जगात असताना रागांचे रागत्व स्वरांमधून शोधत त्या फिरल्या. आता उरलेला शोध त्या दुसऱ्या जगाच्या  मैफलीत घेतील. दात्याने दिलेला प्रत्येक श्वास त्यांनी स्वरध्यासासाठी खर्च करून त्यांच्या जीवनाची मैफिल रंगवली. आता त्या आयुष्याच्या प्रबंधाचा आभोग पूर्ण करून संगीताच्या आकाशात ‘ध्रुव’ झाल्या आहेत. या धृवाकडे बघून आता मागून येणाऱ्या वाटसरूंना पुढची वाट दिसेल. 





11 comments:

  1. किशोरीताईंच्या सुरेल स्वरासारखेच सुरेख लिहीले आहे.

    ReplyDelete
  2. अप्रतिम विश्लेषण... किशोरीताईंच्या व्यक्तित्त्व व कर्तृत्त्वाचे यथोचित आकलन मांडलेय....

    ReplyDelete
  3. खूप छान आहे. मनभावन.

    ReplyDelete
  4. सुरेख...
    शब्दांपालिकडे...

    ReplyDelete