Monday, February 22, 2016

निर्गुण

                            



                                                              निर्गुण
                       

                                                                                                     

अंजली मालकर      
 www.anjalimalkar.com

गाणगापूरला गाणं म्हणायचं निमंत्रण आलं. सहज जमतंय तर जाऊन येऊ असं वाटलं म्हणून त्यांना होकारही कळवला. ‘फार भाग्यवानांना अशी निमंत्रण येतात‘ वगैरे प्रतिक्रिया, मी कुठलीच भावना व्यक्त न करता जिरवली. कारण माझा असे ‘भाग्यवान वगैरे गोष्टींवर फार विश्वास नाही, त्याही पेक्षा मी त्यावर फारसा विचार करत बसत नाही. गाणं आणि गाण्याच्या अनुषंगाने येणारे अनुभव, मग ते माणसांचे असो, जागेचे असो किंवा आणि कुठलेही असो, यात मला जास्त रस असतो. (जन्माला आलेल्या प्रत्येकाने काहीतरी पराक्रम करून मेले पाहिजे असा बाणेदारपणा बाळगणाऱ्या माझा आता असा अट्टहास कमी झालाय. ही अनुकंपा तत्वावरची सवलत माझ्यासहित सर्व मानवजातीला मी देऊ लागले आहे हेही तेवढेच खरे! असो ) तर होकार देताना माझ्या मनात कुतूहल होतं ते या मागच्या परंपरांची मूळं अनुभवण्याचे. लोकसंगीत आणि नागर संगीताला जोडणारा धागा संत काव्याबरोबरच, महाराष्ट्रभर फोफावलेल्या अशा प्रकारच्या परंपरांमध्ये आपल्याला सापडतो.त्यात ही इतर परंपरापेक्षा दत्त संप्रदायाची व्याप्ती महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाडा, विदर्भात पाहायला मिळते. समाजातील सगळ्या स्तरात रागसंगीताचा झालेला शिरकाव दत्त संप्रदायाच्या पीठांमधून, तिथल्या मठाधिपतींकडून मोठ्या प्रमाणावर झाला हे मला माझ्या घरावरूनच माहित झाले होते. (माझ्या आजोळसारख्या अनेक घरांमध्ये दर गुरुवारी होणारी दत्ताची आरती आणि गाणी यांचा गायन संस्कारात मोठा वाटा आहे हे ओघाने आलेच ) सारंग,भूपाली,काफी,पटदीप सारखे साधे साधे राग ज्यांना देशी राग म्हणत,समाजातील सर्व स्तरात गायले जायचे. हे वर्षानुवर्षे वारशाने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्स्फर झालेल्या अंगाई गीते, भोंडल्याची गाणी यातून सहज लक्षात येते. त्यामुळे अशी ठिकाणे माझी अभ्यास कम इमोशनल केंद्रे होणे नॅचरल होतं. गुरुचरित्रात येणारे गाण्याचे रेफरन्स, १६व्या शतकात आंबेजोगाई जवळ राहणारे, रोज एक ढब्बू पैशाची शाई वापरणारे दत्त भक्त कवी आणि रागसंगीताचे गायक दासोपंत आणि शतकानुशतके शास्त्रीय गायनाचे महोत्सव घेणारी माणिकनगर, गाणगापूर, अक्कलकोट सारखी धार्मिक स्थाने म्हणून माझ्यासाठी इंटलेक्चुअल आणि इमोशनल विषय ठरतात. एरवी महाराज, कर्मकांड, नैवेद्य अशा गोष्टीकडे तटस्थपणे पाहणारी मी, याबाबतीत मात्र तशी राहू शकत नाही.

तर गेली १०० वर्षे, दर माघ प्रतिपदेला चार दिवस होणाऱ्या शास्त्रीय संगीताच्या महोत्सवात सहभागी होण्यासाठी उद्यान एक्स्प्रेसने मी गाणगापूरला निघाले. नाही म्हटलं तरी अशा स्थळांवर होणाऱ्या शास्त्रीय संगीताच्या महोत्सवाचे एक, दोन अनुभव माझ्या गाठीशी होतेच. पण गाणगापूर हे जाज्वल्य स्थान असून भूत प्रेत उतरवण्याचे लोकप्रिय ठिकाण आहे अशी वेगळी माहिती मला मिळाली होती. त्यामुळे तशा तयारीनेच मी निघाले होते. छोटी तंबोरी, एक सॅक आणि पर्स अशा सामानासहित सेकंड क्लासमध्ये बसले. आताशा एसी बोगी किंवा स्वतंत्र कार, लक्झरी बसची सवय झाल्यामुळे साध्यासुध्या लोकांबरोबर खाद्य पदार्थ शेअर करत, गप्पा मारत झालेल्या या प्रवासाने, शहरी शिष्टपणा घालवला आणि मन हलकं झालं. शिवाय अशा ठिकाणी गायला जाताना फॉरमॅलिटीज बाजूला ठेवल्या तर अनुभवाची तीव्रता अधिक वाढते, हे मी आतापर्यंत अनुभवले होते. सोबतच्या प्रवाशांचा रागरंग बघितला आणि अभ्यासासाठी घेतलेले पुस्तक, अभ्यास तसेच बॅगेत ठेवत, बरोबरच्या प्रवाश्यांशी फोन नंबर, व्हॉट्सअॅप एक्स्चेंज करत गाणगापूर रोडच्या स्टेशनवर उतरले. स्टेशनावर उतरायच्या अगोदर दोन मोठ्ठ्या पाणीदार नद्या, ऊस, ज्वारीची हिरवी, सोनसळी शेते, समृद्धीच्या तुरळक खुणा दाखवत असली तरी वातावरणात एकप्रकारचे औदासिन्य होते. छोटी छोटी गावं, त्यातही उंच टेकड्यांवर गोपुर असलेली मंदिरं, तुरळक झाडी, नापीक माळरानं हताश आयुष्याच्या अस्पष्ट जाणीवा तयार करीत होती.

मुंबईहून आलेला एक सहकलाकार आणि मी नाकावर रुमाल ठेवूनच स्टेशन बाहेर गेलो. धूळ ! प्राणवायूच्या बरोबरीने आपले अस्तित्व दाखवत तिने आमच्या कपड्यांवर, बॅगांवर कब्जा मिळवला होता. मी मूळची मराठवाड्यातली, त्यामुळे मला धुळीच्या अंगलटीची थोडी फार सवय होती. पण मुंबईचा माझा मित्र मात्र स्टेशनपासून बसस्टॅण्डपर्यंतचे अर्धा किलोमीटर अंतर पायी चालताना हैराण झाला. रस्त्याच्या कडेने रांगेत असलेली चहाची टपरी, मग भज्यांचा स्टॉल,त्याला लागुनच पानटपरी आणि नंतर सिमकार्ड आणि काहीबाही विकणारी दोन चार दुकाने,दुकानांसमोर  कोंडाळी करून बसलेली मंडळी, येणाऱ्या प्रवाशांकडे कुतूहलाने पाहणारी लहान सहान मुले, गाडीतून उतरलेल्या गावातल्या प्रवाशांचा गलका,कुठल्याही तालुक्याच्या गावात दिसते तसे दृश्य बघत आम्ही बसस्टॅण्डवर पोहोचलो, तेव्हा सूर्य अस्तास गेला होता. धूळ आणि संधिप्रकाशाच्या मिश्रणातून गावातला मुळात असलेला बकालपणा जास्तच जाणवायला लागला. आमच्या समोरूनच एक बस गाणगापूरला गेल्यामुळे स्टॅण्ड सुस्त झाले होते. बस स्टँड समोर पँसेंजरची वाट बघत बसलेल्या रिक्षावाल्यांनी आमचे नवखेपण बघून आम्हाला डायरेक्ट मंदिरात नेण्याचा लकडा आमच्या मागे लावला. पण त्यांचे दर  ऐकून आम्ही आमचा मोर्चा एकच उरलेल्या बसकडे वळवला. ‘हो बस गाणगापूर मंदिरालाच जाते’ असं कानडी हेलात बोलून ड्राईव्हर, कंडक्टर आमच्या समोरून दुसरीकडे निघून गेले. आता ही बस कधी भरणार, कधी जाणार, आणि गेल्यावर मला विश्रांती न घेता लगेच गावे लागणार या काळजीत मी होते. पण दूसरा उपायही नव्हता. शेवटी एक, दोन पॅसेंजर चढल्यावर मी सुद्धा सामान घेऊन एक लांब सीट आपल्या सामानासहित ताब्यात घेतली. थोड्याच वेळात ड्राईव्हर, कंडक्टर आले. आणि गुळाचा वास येऊन सगळ्याकडून मुंगळे चिटकावेत, तसे पाहता पाहता बस भरू लागली. इरकली साड्या, खणाची पोलकी, टिकल्यांच्या फॅन्सी साड्या, फ्रॉक, गांधी टोप्या, शर्ट पायजामा, शर्ट पॅंट याने बस तुडुंब भरली. बस मध्ये घाम आणि दारूचा एकत्र वास दरवळला. कानडी, हिंदी, आणि मराठीचा कलकलाट सुरु झाला आणि ‘राईट’ आवाज येताच ड्राईव्हरने गाडी स्टॅण्ड बाहेर काढली. ‘अरे! आपण कर्नाटक राज्यात आलो. टिंग टिंग नाही इथे’ स्वतःशीच हसत सभोवतालचा अंदाज घेत असतानाच खस्सकन माझ्या खिडकीची काच पलीकडे ओढली गेली. गाडीतला मंद दिवा, सामान आणि गोंधळ यामुळे मागे बघणे शक्यच नव्हते. एकीकडे कंडक्टर झोपलेल्यांना उठवत, दोनाच्या ठिकाणी तीन बसवत होता, तोंडाने कधी मराठीत तर कधी कानडीत लोकांवर खेकसत होता तर दुसरीकडे प्रवासी आणि कंडक्टरचे हे मनमोकळे वाक्युद्ध ड्राईव्हरने व्यवस्थित कानाआड केले होते. ‘खस्स’ खिडकीची काच माझ्या दिशेला सरकली गेली. माझ्या काचेला हँडल नसल्यामुळे मी ‘खस्स’ ला प्रत्युत्तर देऊ शकत नव्हते. सरकणारी काच बघत बसणे आणि आपला हात सांभाळणे एवढेच काय ते माझे काम ! गाडी आता मोकळ्या वाऱ्याला लागली आणि गावाकडची खास थंडी जाणवू लागली. ‘खस्स’ परत काच सरकली, मागचा किलबिलाट थांबला आणि टिपेला गेलेले आवाज हळू हळू निवळू लागले. उभ्या लोकांना धरण्यासाठी असलेल्या स्टीलच्या उभ्या खांबाने वरच्या आडव्या खांबाशी एकदम भांडण काढले आणि तो धरेल त्याच्या बरोबर आडव्याच्या मागे पुढे फिरू लागला. प्रवाशांमध्ये हशा पिकला आणि बसमध्ये खेळकरपणा आला. रस्त्याच्या पिवळट प्रकाशाचे एक पिल्लू बसमध्ये लावलेले असल्यामुळे जुनेपणाचा आभास आत आणि बाहेर असा दोन्हीकडे जाणवत होता. निजामशाहीत असलेल्या एका टिपिकल गावाचा लूक मला मध्ययुगाकडे नेत होता. काळाचे यंत्र उलटे फिरवून बस मला एकोणिसाव्या शतकाकडे घेऊन चालली होती. ‘खड्ड’ बस अचानक थांबली. माझ्या विचारांची तंद्रीही भंगली. चौकशी केली तर सगळ्यांची तिकिटे काढून व्हावे म्हणून ड्राईव्हरने बस थांबवली होती. माझ्या कपाळावर आठ्या चढल्या. पण प्रवाशांना बहुतेक माहित असावे. ‘गाडी हळू हळू चालवा, होतील सगळ्यांची तिकिटे काढून’, ‘उशीर झाला आहे’, ‘आम्हाला गुलबर्ग्याला जायचे आहे, गाडी चौडपूरला थांबवा’ अशा अनेक सूचनांच्या भडीमारावर ड्राईव्हरने मौन बाळगले. ‘खस्स’ पुन्हा एकदा खिडकी माझ्याकडे ढकलली गेली आणि अर्धं अंग बाहेर काढून मागच्या स्त्रीने तीन खिडक्या पलिकडच्या ड्राईव्हरशी थेट संवाद साधला. ‘अर्धी गाडी झाली राईट’. ‘राईट’ हा परवलीचा शब्द ऐकताच ड्राईव्हरने गाडी सुरु केली आणि समोरच्या वेशीचा बुरुज ओलांडून ती भरधाव मंदिराच्या दिशेने निघाली. ‘तिकीट किती आहे ?’. ‘मुअत्तु’. ‘अहो परवाच तर वीस रुपये होते, आता तीस कसे?’. ‘यात्रा म्हटलं की वाढवली की त्यांनी’. प्रवाशांच्या संवादांना कंडक्टरकडून टर्र टर्र एवढेच उत्तर आले. थोड्या वेळाने बसच्या समोरच्या भागात रिकाम्या पोटी दारू प्याल्यावर कसा त्रास होतो ही चर्चा, मधल्या भागात गुलबर्ग्याला जाण्यासाठी किती वेळ लागतो हा हिशोब, तर शेवटच्या भागात मोबाईल वरून ‘सांग सांग भोलानाथ’ या बालगीताचे मोठ्या आवाजात प्रक्षेपण सुरु झाले. बस आता सेटल झाली होती. बस मधली बहुतेक शरीरं उन्हात रापलेल्या कष्टकऱ्यांची होती. काटकुळे हात पाय, सुरकुतलेले चेहरे त्यांच्या खडतर आयुष्याची कथा सांगत होते. हीच लोकं माझं गाणं ऐकणार आहेत का ? तेही क्लासिकल ? माझ्या समोर यक्ष प्रश्न पडला होता. माझा मुंबईचा मित्र मात्र एवढ्या गर्दीला आणि वातावरणाला जाम वैतागला होता. शेवटी तासाभराने एका मोठ्या चौरस्त्यावर आम्हाला सोडून गाडी जोऱ्यात पुढे निघून गेली. संध्याकाळचा धूसर प्रकाश आता काळ्या मिट्ट अंधारात विरघळून गेला होता.एखाद्या तालुक्याच्या गावी रात्री जेवण झाल्यावर जे निजानिजेचे वातावरण असते, तसेच दृश्य मला रस्त्यावर दिसत होते. बंद दुकानांच्या कानडी, मराठी पाट्या, जागो जागी शांत धर्मशाळा, मंदिरं, आणि शेवटची कामे उरकणारी मंडळी. यात्रेची रोषणाई, आनंद, गर्दी कुठेच नाही. नाही म्हटलं तरी माघ पौर्णिमेनंतरचा भरात आलेला चंद्र आभाळभर आपली माया पसरत होता.
त्रासलेले, थकलेले आम्ही एकदाचे आमच्या निवासस्थानापाशी पोहोचलो. वाट पहात असलेल्या यजमानांनी आपुलकीने स्वागत केले. ओळख होऊन प्रवासाची विचारपूस करत असतानाच एक गाडी भरून यात्रेकरू आले. यात्रेसाठी आलेल्या यात्रेकरूंचे शिधेचे सामान, ‘अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तचा’ गजर करत चाललेली भजन पाहून माझ्या पुढचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले. उत्साह, आनंद, हास्य अशा मनुष्याच्या इंद्रधनुषी छटांपेक्षा, गांभीर्य, तटस्थता, आणि कर्तव्याच्या करड्या रंगाची छाया जाणवू लागली. गाणगापूरच्या दत्तात्रयाच्या सौम्य, सोशिक स्वरुपाकारात गूढवाद शिरला होता. पटकन आवरून फर्लांगभर लांब असलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी गेले तेव्हा गाण्याच्या प्रयोजनाची कल्पना पुरेशी स्पष्ट झाली. जुनाट धर्मशाळेच्या मध्यभागी असलेल्या मोठ्या उंबराच्या झाडाखालच्या छोट्या दत्ताच्या मंदिराभोवती शे-सव्वाशे लोकं बसतील असा मंडप घातला होता. समोर चाललेल्या कीर्तनाला पन्नास जागी मंडळी साक्षीदार होती. बाकी धर्मशाळेच्या सर्व ओट्यांवर डोक्यापासून पायापर्यंत पांघरूण घेतलेल्या निद्रिस्त मानवाकृती ! आपल्यापासून दहा फुटावर चाललेल्या सूर लयीच्या व्यवहाराशी काडीचाही संबंध नसणारी ! गम्मत म्हणजे संपूर्ण रात्रभर चाललेल्या या संगीत महोत्सवाच्या दरम्यान एकानेही पांघरूण उघडून साधे पहिले देखील नाही. पाचशे मीटरच्या परिघात असलेली ही दोन जग एकमेकांपासून इतकी अलिप्त कशी राहू शकत होती याचे मला राहून राहून आश्चर्य वाटत होते. पोपडे निघालेल्या धर्मशाळेतल्या भिंतींइतकेच का पोपडे निघालेले त्यांचे आयुष्य होते की ज्यामुळे त्यांना सूर लयीच्या मखमली जाणीवा स्पर्शू शकत नव्हत्या ! दोन्ही जग इतके आत्ममग्न होते की त्यांचे एकमेकांसोबत असणे हे नसण्याच्या बरोबर होते.

मी मग माझ्या जगातल्या माणसांकडे बघू लागले. निद्रिस्त जगाची काळी गडद छाया या रंगीबेरंगी जगावर पडलेली स्पष्ट दिसत होती. त्यामुळे या जगातल्या बहुरंगी बहुढंगी स्वर लयींचे रंग, आकार निर्गुणी झाले होते. व्यवहारी जगात यशस्वी झालेले मोठे मोठे कलाकार,सर्वच बाबतीत मोजकेपणा असणाऱ्या या अव्यवहारी गूढ जगाकडे वर्षानुवर्षे का येत आहेत याचेही कोडे वाटले. आपल्या घराण्यातली शतकाची गायनाची परंपरा अनेक कष्ट उपसून इमानाने ओढणारे आयोजक, संगीतासारख्या चैतन्यमयी कलेला बाधक असणारं विपरीत वातावरण आणि अशा वातावरणातही कलेचे गूढत्व शोधणारे एकापेक्षा एक कलाकार ! या सर्व जाणीवा मला वेगळ्या स्तरावर नेत होत्या. सुरेल प्रासादिक गायनाच्या पार्श्वभूमीवर मनस्वास्थ्य हरवलेले चीत्कारणारे स्त्री पुरुष किंवा उलटं म्हणा, मला निरुत्तर करत होते. बरं इतरांना असं काही वेगळे वाटते का हे बघण्यासाठी आजूबाजूला पाहिले तर हे जे मला जाणवत होते ते इतरांच्या दृष्टीने अत्यंत सहज होते, सवयीचे होते.
सकाळी गर्दीत दर्शन घेण्यापेक्षा रात्री निवांतपणे जावे म्हणून आम्ही काही कलाकार मुख्य मंदिराचे दर्शन घेण्यासाठी बोचऱ्या थंडीत रात्री अडीचला गेलो. मला वाटले असतील पाच- पंचवीस लोकं. प्रत्यक्षात होते शंभर- दीडशे ! सर्व देवस्थानांमध्ये दोन्ही बाजूने दुकाने असणारी छोटी वाट इथे सुद्धा होती. रात्री दुकाने जरी बंद असली तरी सकाळी होणारी वर्दळ लक्षात येत होती. मंदिरापाशी भक्क पिवळा प्रकाश आणि या भक्क प्रकाशात जुनाट हेमाडपंथी मंदिर, लोखंडी जाळ्यांनी कैद होते. विशेष अतिथींसाठी वेगळा मार्ग आणि सामन्यांसाठी वेगळा, अशा दोन्ही मार्गांवर पुजाऱ्यांची करडी नजर होती.मानसिक स्वास्थ्य हरवलेले अनेक भक्त या ठिकाणी बरे होतात अशी श्रद्धा असल्यामुळे अनेक बऱ्या वाईट प्रसंगांना तोंड देता देता वस्कून अंगावर धावायची सवयच या अखंड ओलेत्या पुजाऱ्यांना लागलेली दिसली. एका छोट्या खिडकीतून दर्शन घेण्यासाठी वाकले तर चांदीचा वर्ख लावलेला छोटासा गाभारा आणि त्या गाभाऱ्यात ठेवलेल्या पादुका म्हणजे चांदीच्या चपलेमध्ये ठेवलेले दोन दगडी गुळगुळीत पाय सदृश आकार ! कुठेही मूर्ती नाही, कुठेही रंग नाही, केवळ चंदेरी रंगामध्ये दोन काळे मोठे ठिपके. काळ्या पांढऱ्याचा हा तटस्थपणा स्वरात उतरला की त्याला येणारे निर्गुणत्व हेच या गाणगापुरच्या मातीचे वैभव असावं, असे मात्र त्या क्षणी वाटून गेले ...


4 comments:

  1. अंजू
    खूपच अप्रतिम लेख लिहिला आहेस. गाणगापूरची भेट घडवून आणलीस जणू ... तनाने आणि मनाने ही !
    सुंदर !!!!!
    सुनील गोडसे

    ReplyDelete
  2. काहीसा पुन: प्रत्ययाचा आनंद व अन्य भावना. चांगले वाटले .
    मागच्या वर्षी वाचले होतें म्हणून संवाद साधला.
    खरच छान लिहले आहे.

    ReplyDelete