Thursday, September 24, 2015

                  नाद
                        अंजली मालकर
                                anjali.malkar@gmail.com

लोणावळा इथल्या मनशक्ती केंद्राच्या ‘ब्रिद्वेल’ अल्बमचे रेकॉर्डिंग चालले होते. सतार, मृदंग, टाळ आणि गायन अशा वेगवेगळ्या वाद्यांच्या नादांचा उपयोग ध्वनिमुद्रणात होत होता. स्टुडीओतल्या स्क्रीनवर या नादरेषांची सुरेख रांगोळी मांडली जात होती. रेकॉर्डिंस्ट प्रत्येक प्रकारच्या नादाला वेगळा रंग देऊन तो पट अधिक रंगीबेरंगी करत होता. स्क्रीनवर आलापीच्या वेळी उमटलेल्या वर खाली रेषा एखाद्या हेलकावणाऱ्या लाटेसारख्या दिसत होत्या तर तानांच्या रेषा जुन्या काळातल्या जाळीदार लिफ्टसारख्या वाटत होत्या. नादाचे ध्वनीचित्र बघताना खूप मजा वाटत होती. जसा काही नादाचा कार्डीओग्रामच पहात होते. कुठल्याही कवचाशिवायचा नितळ आवाज ऐकताना जशी गम्मत वाटत होती, तसेच दडपण सुद्धा येत होते. एरवी खुल्या ठिकाणी गाताना बाहेरच्या वातावरणातलं अदृश्य कवच आपल्या भोवती घट्ट लपेटून असते. पण स्टुडिओच्या बंद डब्यात हाच नाद अनावृत होऊन लख्ख आरशासारखा तुमच्या समोर उभा राहतो. त्यातली रेष न रेष तुमची प्रतिमा स्पष्ट करते. त्यामुळे उत्तम आणि न्यून अशी दोन्ही नादबिंब तुमच्या समोर उभी असतात. हाच नाद बाहेरच्या जगात येताना इतका रंगरंगोटी करून येतो की एखाद्या स्वरपारख्यालाच त्याची मूळ खूण दिसावी. स्टुडीओतल्या नाद लयीच्या या गमती जमती बघत असताना बालपण आठवले आणि आमच्या संगीत शिक्षणातला एक परवलीचा शब्द चमकून पुढे आला ‘षड्ज साधना’. कोणी त्याला खर्ज साधना किंवा खर्ज भरन सुद्धा म्हणतात. लहानपणी मनात यायचे “काय एवढ त्या ‘सा’ मध्ये ठेवलंय.” पण आईचे धपाटे खायला नको म्हणून तासभर पेटीवर ‘सा’ लावून बसायचे. थोडफार गाणं शिकलेल्या माझ्या आईला देखील ‘सा’ लावायचा म्हणजे काय असतं हे माहित होतं का हे मला आज सांगता येणार नाही. कदाचित तिच्या गुरुजींनी तिला जे सांगितले ते तिने माझ्याकडून करवून घेतले असेल. या घटनेला तीस-पस्तीस वर्षे झाल्यानंतर आता जाणत्या वयात त्या ‘सा’ मधली गंमत, त्याचे महत्त्व मला कळू लागले आहे. तसं पाहिलं तर प्रत्येक स्वर हा एक नाद असतो स्थिरचित्त, तटस्थ. त्याला आपल्या विचाराने, भावनेने उद्दीपित करण्याची क्रिया म्हणजे ‘षड्ज साधना’. ‘सा’ हा सात स्वरातला पहिला स्वर आणि सप्तकाच्या इमारतीचा पाया, त्यामुळे तो अधिक महत्वाचा. जेव्हा त्या ‘सा’च्या पोतीचा, स्थिरतेचा, दीर्घतेचा विचार अधिक डोळसपणे करू लागले तेव्हा कान, नाक, घसा, मन आणि बुद्धी यांची संगती आपोआप उलगडून समोर आली. एखादा राग मांडताना तो पहिल्यांदा मनःपटलावरून ‘सा’च्या शिडीवर उतरतो. उतरतांना तो कधी खालच्या आळीतल्या ‘नी’,’ध’,’प’ किंवा वरच्या आळीतल्या ‘रे’,’ग’,’म’चा आधार घेऊन येतो. तटस्थ षड्जाला मग दुसऱ्या स्वराचा रंग लागतो आणि पहिल्या स्वरातच राग उमलण्याची किमया घडायला लागते. पहिल्या स्वरातच राग दिसला पाहिजे या बुजुर्गांच्या शिकवणीचा अर्थ मग कळू लागला. जशी जशी मी साध्यासुध्या वाटणाऱ्या इतर स्वरांचा विचार करू लागले, तसतसे माझ्या लक्षात आले की रे,ग,म,प,ध,नी ही अंतरे फुटपट्टीवरची नसून ‘सा’ च्या कडीवरून सुटलेले अधांतरी बॉल्स आहेत. मग संगीतामध्ये चूक बरोबर हे शब्दच तर्कविसंगत वाटू लागले. 

षड्ज साधने नंतर संगीत शिक्षणात सर्वसाधारणपणे येणारा दुसरा टप्पा असतो स्वरालंकार घोटण्याचा. आयुष्यातला सगळ्यात निरस भाग म्हणून समजली जाणारी स्वरालंकारे जेव्हा मींडेच्या झोक्याने, गमकेच्या आर्जवाने, खटका मुर्कीच्या रुसव्याने, कणाच्या थापेने जिवंत होऊन माझ्या भोवती फेर धरू लागली तेव्हा दोन, तीन, चार किंवा पाच स्वरांच्या साखळ्यांमधून आलापीच्या काशिदाकारीची पूर्वतयारी कधी पूर्ण झाली हे कळलेच नाही. लहानपणीच करकरीत कवायतीमधून भेटलेल्या लयीने आपल्या काटकोनी कडक नजरेने मला पार घाबरवून टाकले होते. उजव्या हातात तंबोरा आणि डाव्या हाताने मांडीवर टाळी अशी अनेक वर्ष प्रयत्नांची शिकस्त करून मी लयीचा टोकदारपणा बोथट करण्याच्या मागे लागले होते. हाताने टाळी दिली की स्वर निसटायचे, स्वर धरायला जावे तर टाळी चुकायची. स्वर आणि टाळी बरोबर आली तर तालाची कितवी मात्रा चालू आहे हे कळायचे नाही. सर्कसमध्ये कमीत कमी तीन आणि जास्तीत जास्त कितीही चेंडू आकाशात फेकून नजाकतीने झेलण्याची कसब असणाऱ्या कलाकाराप्रमाणे माझी या तीनही गोष्टी साधण्याची कसरत बरेच वर्ष चालली. आपण गायलेल्या शब्दकाव्याच्या अक्षरनादात जर रमलो नाही तर हा खटाटोप अल्पायुषी आणि प्रभावशून्य ठरतो हे मग उमजायला लागले. काट्याने काटा काढावा या उक्ती प्रमाणे तबल्याची भीती घालवायला तबलाच शिकायला लागले. हळू हळू भीतीची जागा आत्मविश्वासाने घेतली. तबला ऐकण्याचा सुद्धा रियाझ झाला. त्यातल्या नादाची घुमारदार स्पंदने मनाला भिडली. ‘धा’चा बसका, ’धिन’चा उठावदार नाद आकर्षक वाटू लागला. ‘तिन’ थाप, 'ना 'मधला अनुनासिक गोडवा, ‘तिरकीट’ची मार्दवता उल्हास निर्माण करू लागली. ठेक्यातल्या दोन नादाक्षरांमधल्या ‘आस’ चा सेतू हळुवारपणे सुखावू लागला. काटकोनाला डोल तयार झाला आणि तालाचे ऐटबाज वर्तुळ नादवू लागले. लहानपणी चिरकी खेळताना तो चपटा फरशीचा तुकडा पाहिजे त्या खान्यात ती बरोबर पडला पाहिजे अशी आम्हा मैत्रिणींमध्ये चढाओढ असायची. आता गाण्याचा खेळ खेळता खेळता तालाच्या पाहिजे त्या खंडात गमक, कण, खटका, मींड अशा सुंदर दागिन्यांनी नटलेले स्वर खेळली पाहिजेत अशी ईर्षा मनात तयार होऊ लागली. हा खेळ खेळण्याचा कैफ जसा जसा चढू लागला तशी तशी नादलयीची, स्वरतालाची अदृश्य दालने उघडू लागली. नादाक्षराकडून स्वराकडे, स्वरातून श्रुतीकडे, मात्रेतून लघु गुरु कडे जाणारे सूक्ष्म प्रवाह अंगाला झोंबू लागले. एक अंधुक पण आल्हादायक माहोल आजूबाजूला तयार होऊ लागला. बहुरंगी स्वरलगावाचे विस्मयकारी दर्शन घडवणाऱ्या प्रतिभावंत कलाकारांची प्रतिभा, दालनांमधून प्रकट होऊ लागली. प्रत्येकाचे नादोच्चार विश्वाच्या अनाहत नादाचे सगुण रूप होते. प्रत्येकाच्या गायनाचा अंदाज, अवकाशातल्या नादलहरींनी बनवलेल्या कॅलिडीओस्कोप मधली काचेच्या तुकड्यांसारखा होता. संगीत कलेत समरस होऊनही आपली वेगळी ओळख राखणारा. सागराच्या गर्भातून उमटलेल्या प्रशांत नादाचे धनी उस्ताद अमीर खाँ, एखाद्या पतंगाला थांग लागली की तो जशी हवेची मजा घेतो तसा भीमसेनी स्वरपोतीचा आवाज लाभलेल्या पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरांना तार सप्तकात लागलेली थांग, काळजाचा ठाव घेत एखादी कट्यार घुसावी तसा मिठठास छुरीचा उस्ताद अब्दुल करीम खाँ यांचा स्वर, अनंताच्या प्रवासाला निघाल्यासारखा पंडित मल्लिकार्जुन मन्सूरांचा निर्लेप स्वर, ‘किनारा तुला पामराला’ म्हणणाऱ्या कुसुमाग्रजांच्या कोलंबससारख्या चित्तवृत्ती आणि स्वरवृत्तीचे पंडित कुमार गंधर्व, नखरेल, लडिवाळ स्वरांचे उस्ताद फैय्याज खाँ. तीर्थस्नान करून शुचिर्भूत होऊन आल्यासारखा पंडित डी. व्ही. पलुस्करांचा निकोप स्वर. गायन कलेच्या दालनातले एक एक स्वर नक्षत्र पाहताना नजर ठरत नव्हती. स्त्री प्रतिभेचे दालनही काही कमी देखणे नव्हते. विदुषी हिराबाई बडोदेकरांचा नखशिखांत सात्विक स्वरलगाव, कातळासारखा गुळगुळीतपण भव्य भासणारा पंडिता केसरबाई केरकरांचा स्वर, अगत्यशील गृहिणीसारख्या सोज्वळ स्वराच्या विदुषी माणिक वर्मा, मोकळा ढाकळा आणि थेट स्वरलगावाच्या विदुषी मालिनी राजूरकर, स्वरास्वरातून जिप्सीच्या स्वच्छंदीपणाचे दर्शन घडवणाऱ्या विदुषी किशोरी आमोणकर. प्रत्येकाला आपलंसं करणारा विदुषी प्रभा अत्रे यांचा स्वर, आपल्या नादसौंदर्याचे पुरेपूर भान असलेला बेगम परवीन सुलताना यांचा शृंगारिक स्वरलगाव. प्रत्येकीचा स्वरलगाव आकर्षक, हृदयाचा  ठाव घेणारा होता. शास्त्रीय संगीतातल्या या अढळ स्थानांची स्वरशोभा बघता बघता मी स्वतःलाच विसरले. त्यांच्यात एकरूप झाले. त्यामुळे वादक कलाकारांच्या प्रतिभेचे दालन राहून गेले. पुन्हा परत बघू असा विचार करून मी तिथेच रमले. या गायक कलाकारांच्या सहवासाने आता परकेपणा संपला होता. त्यांच्या स्वरलगावांची आता एक भाषा तयार झाली होती. ती भाषा मला कळू लागली होती. माझ्याशी आता बोलू लागली होती. माझ्या आणि तिच्यात आता मैत्र निर्माण झाले होते........


“काय हो तुमचं गाणं ! जे ‘आ’ करून बसता, तासभर संपतच नाही, आणि पिया, सैंया, सास, ननंद या शिवाय तुमच्याकडे शब्द नाहीत का हो?”. ‘’तुम्ही तेच तेच शब्द सारखे सारखे का म्हणता? पुढच्या ओळी विसरता का ?’’ असं कोणी म्हटलं की मला खूप वाईट वाटायचं. असं आमचं तुमचं केलं की वाळीत टाकल्यासारखं वाटायचं. मनात यायचं की हाच भाव जर चित्रपट गीतातून आला तर तो टोचत नाही, मग शास्त्रीय संगीतानेच काय घोडं मारलंय ? पण मग जेव्हा मीच माझ्यापासून वेगळी होऊन त्या आरोपांकडे बघू लागले तेव्हा सगळे घोळ लक्षात आले. स्वरभाषेच्या लकबी शब्दार्थावर चिटकवल्या गेल्यामुळे आलेला बेंगरूळपणा लोकांना या आनंदापासून लांब नेत होता. मूळात शास्त्रीय गायन हे सूरगायन असते. रोजच्या आयुष्यातल्या घटनांचे संदर्भ इथल्या संगीताला अर्थासाठी अपेक्षितच नाही मुळी. त्यामुळे काव्य देखील एक किंवा दोन ओळींचेच असते. काव्य,ज्याला संगीताच्या भाषेत बंदिश म्हणतात, गाताना शब्द जरी तेच तेच असले तरी प्रत्येक वेळी त्यांचे उच्चारण वेगळे असते. त्यांना ज्या स्वरात ओवलेले असते, ते वेगळे असतात. त्यांना झुलवलेले लयीचे झोके दरवेळा निराळे असतात. जर ही बंदिश आहे तशी म्हटली तर ती दोन मिनिटात संपू शकते. पण तिची खरी मजा असते ती तिला स्वरलयीत घोळवून घोळवून म्हणण्यात. सर्वांना समजतील अशा लोकप्रिय शब्द भावाचे वेष्टन घेऊन, त्यातल्या शब्दांच्या नादाला आकार, इकार, उकार, मकाराच्या स्वरभाषेने खुलवले आणि मींड गमकेच्या स्वरालंकरणांनी सजवलं की त्यातून येणाऱ्या रसश्रीमंतीने ही ज्ञाताची चौकट गळून पडते आणि अज्ञाताचा आनंददायी प्रवास सुरु होतो. निसर्गातल्या अनेक नाद प्रतिमांचे मूर्त अमूर्त स्वररूपात उनसावली प्रमाणे खेळवून कलाकाराची कला किती सहजपणे आयुष्याचा अर्थ सांगून जाते. अशा निरपेक्ष आनंदासाठी शास्त्रीय संगीतासारखी सुंदर, सहज, सोपी भाषा आणखी कोणती असू शकेल ? 

No comments:

Post a Comment