Sunday, April 15, 2018

बबनराव हळदणकर नावाचे गाणारं झाड




           बबनराव हळदणकर नावाचे गाणारं झाड

                                                अंजली मालकर

‘श्री’ रागाचा अभ्यास करण्यासाठी यु ट्यूबवर मी वेगवेगळ्या गायकांचे ‘श्री’ ऐकत होते. त्यात बबनराव हळदणकरांचा ‘श्री’ पण होता. बुजुर्ग गवयाच्या गाण्यात पारंपारिक विचार मिळत असल्यामुळे मी त्यांचा राग ऐकू लागले आणि ऐकतच राहिले. स्वर कोणते आहेत यापेक्षा कसे आहेत याकडे माझे लक्ष वेधले गेले. गाण्यात ताजेपणा होता. स्वर सांडत सांडत भरलेला रागरंग, शब्दांचे लडिवाळ उच्चारण लयीबरोबर येताना मान आणि मन डोलायला लावत होता. तीहायांच्या फैरी बुचकळ्यात टाकू लागल्या. सूर तालाच्या पुढचे बोलणे, ज्याला ढंग म्हणतात तो मला त्यात दिसला. त्या ओबडधोबड वाटणाऱ्या शब्दोच्चारातला गोडवा कळाला आणि मनोमन त्यांना वंदन केले. आज त्यांचे देहावसान झाल्याचे कळल्यावर माझी त्यांची ही पहिली भेट आठवली आणि डोळे आदराने लवले.
बबनराव हळदणकर आणि आग्रा घराणे असे समीकरण शास्त्रीय संगीत समजणाऱ्या प्रत्येकाला माहित होते. आयुष्यभर बोलबांट, लोचदार लयकारी, तिहाया यांचे बोट धरून ते फिरले आणि शेवटी गायन कलेच्या अथांग अवकाशात नादरूप झाले. आग्रा घराण्याच्या भव्यतेचा, बोल अंगाचा, ढंगाचा, रागांच्या स्वरलगावांचा, अक्षर आणि स्वरनादाचा सूक्ष्म विचार मांडत मांडत ते घराण्याच्या चौकटीला ओलांडून पुढे गेले. समर्पित कलाकाराला येणारा ऐटदार शेवट त्यांच्याही वाट्याला आला. ते वयाच्या ८९ व्या वर्षी शेवटपर्यंत जोमाने गात दुसऱ्या जगाच्या स्वरमंचावर गाण्यासाठी निघून गेले.
‘मीपण ज्यांचे पक्व फळापरी गळले हो’ या बोरकरांच्या ओळी सार्थ करणारे जीवन बबनराव जगले. त्यांच्याकडे येणाऱ्या अनेक कलाकारांना नि:स्वार्थपणे काही ना काही दिल्याने त्यांचे गुरुपण सार्थ ठरले. गुरुपणाचा एक नवा आदर्श ठेवून ते गेले.
खरंतर माझी आणि त्यांची प्रत्यक्षात तीन, चारदाच भेट झाली असेल, पण प्रत्येक भेटीत त्यांचे चैतन्यतत्व मला विस्मित करून गेले. त्यांनी लिहिलेली पुस्तके मी वाचली आहेत. त्यांच्या बंदिशी पण ऐकल्या आहेत. पण या सगळ्यापेक्षा त्यांच्या व्यक्तीमत्वातली चुंबकीय शक्ती फार मोठी वाटली. चेहऱ्यावरचे निखळ हास्य, जगण्यातला आनंद दाखवणारे चमकदार डोळे आणि कोणालाही कधीही शिकवण्याची तयारी असलेले उदार मन, एखाद्या नवागताला सुद्धा मोहून टाकायचे. मला मोठ्या कलाकारांशी बोलायला नेहमीच दडपण वाटते. काही वर्षांपूर्वी असेच एकदा ते एका परिचितांकडे भेटले. मी गाते म्हटल्यावर त्यांनी प्रेमाने विचारपूस केली. खूप वेळ गेल्यावर मी भीत भीत मला बंदिश शिकवाल का, असे म्हटल्यावर ‘अगं आधी का नाही सांगायचं’ असे म्हणून मला मोकळं केलेला तो प्रसंग अजूनही स्मरणात आहे.
बबनरावांच्या दातृत्वामध्ये सहजपणा होता. त्यांचे मन निर्लोभी होते. त्यामुळे लोकांना ज्ञान देऊन आपण फार मोठे काम करतोय असा भाव कुठेही न येता उलट हे माझे कामच आहे, असा जबाबदारीचा भाव असे. दुर्मिळ होत चाललेल्या पितृत्वभावनेची ही ओली निशाणी आजच्या काळात फार कमी जणांकडे दिसून येते. गाणं शिकवायला जायचंय म्हटल्यावर कोणाही बरोबर कुठल्याही वाहनावर बसून जाण्यासाठी लागणारा त्यांचा निर्व्याज उत्साह या जगातला वाटायचा नाही. एखादा गायक चांगला गाणारा असेल आणि नम्र असेल तर तो कोणाचाही शागीर्द असला तरी त्याला विद्या शिकवण्याची तयारी दाखवणाऱ्या जुन्या काळातील गुरूंच्या पंक्तीत बबनराव आता जाऊन बसले आहेत. त्यांनी आपल्या शिष्यांना तर पुत्रवत शिकवलेच पण इतरांनाही तेवढ्याच तळमळीने शिकवून शास्त्रीय संगीत परंपरेतल्या काही सुंदर मूल्यांचा मान राखला. कलेच्या अवघड वाटेवरून चालताना दमलेल्या कलासाधकांसाठी ते विश्रांतीची जागा झाले. त्यांच्या प्रेमळ सावलीत ताजेतवाने होऊन अनेक गायक जोमाने पुढे गेलेले काळाने पहिले आहे. आपल्याकडून उर्जा घेऊन नवीन बिऱ्हाड थाटणाऱ्या गवयाचे कृतकृत्य होऊन कौतुक करण्याचा दुर्मिळातला दुर्मिळ गुण त्यांच्याकडे होता.
कलेच्या साधनेमध्ये दोन प्रकारचे साधक आढळतात. पहिली जी कलेची साधना करत एकटेच इतके दूर जातात की त्यांची समाजाशी असलेली नाळ गळून जाते. त्यांचे तेज सूर्यासारखे प्रखर असते. कधी कधी असह्य देखील. दुसऱ्या प्रकारचे साधक समाजामध्ये राहून इतरांनी आपल्याबरोबर थोडं चालावं म्हणून स्वतःची गती थोडी कमी करतात. त्यांचं चांदणं सौम्य आणि सुखकारक असतं. बबनराव हे दुसऱ्या प्रकारात मोडणारे कलासाधक होते. त्यांना पार कळला होता पण मायेच्या ममतेने इतरांना बरोबर घेऊन जाण्यात त्यांना अधिक आनंद होता. त्यामुळे नवीन मुलांबद्दल बोटं न मोडता कोणाच्याही कार्यक्रमाला जाऊन त्यांच्या योग्य गुणांची प्रशंसा करणे आणि काय कमी आहे हे दाखवण्याचे कर्तव्य चोखपणे पार पाडण्याची निष्ठा त्यांनी प्रामाणिकपणे बजावली.
अशातच त्यांची मैफल ऐकण्याचा योग आला होता. तरुणांनाही लाजवेल असा सळसळता उत्साह, भक्कम बैठक आणि साध्या साध्या रागातील स्वरांचे ठेहराव बदलून केलेल्या विलक्षण स्वरसंगतीने दोन अडीच तास कसे गेले ते कळलेच नाही. एखाद्या रागाचे सागरत्व काय असते याचा अनुभव घेताना सूर, बेसूर, कणसूर या व्याख्या देखील कचकड्याच्या वाटू लागल्या. गाणं म्हणण्याचा जसा रियाज असतो तसेच गाणं ऐकण्याचा देखील रियाज असतो, या वाक्याचे शंभर टक्के प्रत्यंतर त्या दिवशी आले. मैफल संपल्यावर औपचारिक बोलण्याने स्वरलयशब्दांचे सुंदर स्वप्न भंगून जाईल, अशी भीती वाटून गेल्याचेही मला चांगलेच आठवते.

बबनराव हळदणकर नावाचे विशुद्ध संगीत आता पुढच्या मैफलीसाठी आपल्यातून गेले आहे. त्यांनी अत्यंत डोळसपणे, प्रसंगी बंड पुकारून शास्त्रीय संगीत अधिकाधिक मोकळं करायचा प्रयत्न केला. आग्रा गायकी अधिक रसदार करण्यात या ‘रसपिया’ने आपले आयुष्य समर्पित केले. अपरिचित रागांना लोकांजवळ नेऊन त्यांची तोंडओळख करून दिली. काही रागांचे प्रमाणीकरण करून छोट्यांची भांडणे मिटवण्याचा वडीलधारी प्रयत्न पण केला. माणसात रमलेला माणूस उठून गेला की त्याची जागा रिकामी होते. तो कधी ना कधी उठून जाणारच असतो. ती जागा रिकामी होणारच असते. पण बबनरावांसारखे वडाचे झाड उन्मळून पडले तरी त्यांच्या पारंब्यांचे नवे वटवृक्ष तयार होणार असतात. अशा पारंब्या जर वटवृक्षासारख्या झाल्या तर त्यांच्या खाली आश्रयाला येणारे नवे वाटसरू निवांत होतात. अशीच ही कला आणि सत्प्रवृत्तीची परंपरा निरलसपणे वाहती राहते....