Sunday, August 28, 2016

अमीर खुस्रो – तुती – ए - हिंद




          अमीर खुस्रो – तुती – ए - हिंद 


                                                           अंजली मालकर 
                                                                            anjali.malkar@gmail.com


“गर फिरदौस बा-रौ-ए-जमीन अस्त हमी अस्त उ हमी अस्त उ हमी अस्त”. 

धरती पर अगर कही स्वर्ग है, तो यही है, यही है, यही है. कश्मीर विषयी बादशाह जहांगीर यांनी काढलेले हे उद्गार लाल किल्ल्याच्या साउंड अॅण्ड लाईट शो मधून ऐकायला आता जवळपास पस्तीस वर्षे झाली असतील. काय भारी वाटलं होते ते ऐकताना ! आई राष्ट्रसेवादलातली आणि वडील सैन्यामध्ये डॉक्टर, शिवाय त्यावेळचे दहा/ बारा वर्षाचे भाबडे वय, अक्षरशः रोमांच उभे राहिले होते. आजही त्याचे ठसे मनामध्ये तसेच कोरले गेले आहेत. नंतर शाळा संपेपर्यंत ‘ जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा’ हे कुठल्याशा सिनेमातले गाणे मला मिळणाऱ्या फरमाईशीमध्ये नंबर वन असायचे. असे हे देशप्रेमाने ओतप्रोत बालपण गेल्यानंतर तरुणपणी भारतीय संगीत नावाच्या विषयाच्या जे प्रेमात पडले ते आजतागायत ! त्यातून बाहेर यायची संधी मला मिळाली नाही, मी घेतली पण नाही. या विषयाला उलट सुलट, आतून, बाहेरून, सर्वांगाने तपासताना मी त्यात अधिकाधिक गुंतत गेले. त्याच्या संबंधी असणाऱ्या प्रश्नांच्या ओझ्यांनी माझ्या मनाची टोपली भरून जायची आणि ती रिकामी करण्यासाठी कधी पुस्तके, कधी जुनी रेकोर्डिंग्ज, तर कधी बुजुर्ग मंडळींची मदत मला व्हायची. जरा रिकामी झाली की परत प्रश्नांचे ढीग तयारच असायचे. अगदी डबा-ऐस-पैस खेळासारखे ! एकाला बाद करून डब्यापाशी आले की दुसरा लपलेला दिसायचा. तो बाद झाला की तिसरा ! हा खेळ मी बराच काळ खेळल्यावर माझ्या नजरेत एका गड्याचे नाव वारंवार येऊ लागले. स्वतःला ‘तूति-ए-हिंद’ म्हणजे हिंदुस्तानाचा पोपट असं म्हणवून घेणारा हा गडी होता अमीर खुस्रो.१३व्या शतकात दिल्लीच्या खिलजी सल्तनतीत, अल्लाउद्दिन खिलजीच्या पदरी राजकवी म्हणून असलेला हा महत्वाचा माणूस. सुरुवातीला मी त्याच्याकडे दुर्लक्षच केले. म्हटलं असेल कोणी एक, राजाच्या पुढे पुढे करून, ज्या त्या गायन प्रकाराचे, नवराग निर्मितीचे, नवताल निर्मितीचे, नवीन वाद्य निर्मितीचे श्रेय स्वतः कडे घेणारा प्रसिद्ध लोलुप कवी ! पण जेव्हा त्याला ओलांडून पुढे जाता येईना, तेव्हा तोच माझ्या पुढे येऊन उभा राहिला. माझ्या नजरेतली दूरस्थता पाहून दुखावलेल्या स्वरात म्हणाला “का एवढा दुरावा”. त्याच्याकडे एक धारदार कटाक्ष टाकला. “संगीतातल्या सगळ्याच नवनिर्मिती तुझ्या नावाने कशा ?” माझ्या स्वरातून बऱ्याच दिवसांपासून साठलेला फणकारा क्षणात बाहेर पडला. तो हसला. म्हणाला, “चल माझ्याबरोबर, तुला नेतो माझ्या काळात”. मग माझ्या परवानगीची वाटही न बघता त्याने मला ओढतच नेले. मी त्याच्याबरोबर तेराव्या शतकात गेले. कुतुबमिनार दिसल्यावर तो जरा थांबला, म्हणाला “बघ आता काय परिस्थिती आहे ती.” खरतर त्याने मला अशा प्रकारे इकडे आणलेले आवडले नव्हते. तरीसुद्धा कुतूहल म्हणून मी दिल्लीचा परिसर पाहू लागले. जलालुद्दीनची सत्ता संपून अल्लाउद्दिन खिलजीची सत्ता होती तिथे. आधीच्या गजनवी, घोरीच्या स्वाऱ्यांनी होरपळलेली रयत, इल्तुमशच्या आक्रमणांनी भयभीत होऊन आता खिलजी राजवटीत जुलूम सहन करत अर्धमेली झाली होती. तुर्की संस्कृतीचे वर्चस्व जागोजागी दिसत होते. शासनातले सर्व अधिकारी तुर्की होते. राजसत्ता तुर्कांकडे असल्यामुळे, हिंदवी संस्कृती जणू राजपटलावरून पुसून गेली होती. तिथे राहणाऱ्या अनेक सामान्य लोकांनी ‘जान है, तो जहान है’ असे म्हणत निमूटपणे धर्मांतर स्वीकारले होते. अशा लोकांना दुय्यम किंवा तिय्यम दर्जाचे अधिकार मिळाले होते. अमीर, मलिकच्या उच्च पदांवर असलेले राजघराण्यांचे लोक, धर्मांतरितच नव्हे, तर इतर वंशांच्या प्रतिष्ठित लोकांपासून देखील फटकून राहत होते. तुर्की, फारसी,आणि अरबी काव्य संगीतात अखंड बुडालेला उच्च वर्ग, धर्मांतरित होऊन आपली प्रतिष्ठा कशीबशी सांभाळणारा हिंदुस्तानी मध्यमवर्ग, आणि सावकारी, कर्जबाजाराने परेशान, वेठबिगार गरीब वर्ग, समाजाचे असे तीन स्तर मला स्पष्टपणे दिसत होते. “पाहिलंस, किती भीषण परिस्थिती आहे ती. माझे वडील देखील मंगोलांच्या आक्रमणाने भिऊन तुर्कस्तानातून इथे पळून आले. सुलतान बल्बनने आसरा दिला म्हणून बरं झालं. हिंदुस्तानी धर्मांतरित मुलीशी माझ्या वडिलांनी शादी केली म्हणून मी नशीबवान समजतो स्वतःला ! आजोळचे हिंदुस्तानी संस्कार आणि तुर्की नस्ल (वंश) या दोन्ही गोष्टीनी मला काव्य, संगीताचा, संस्कार आणि मलिक, अमीरांचा सहवास या दोन्हीचे फायदे मिळवून दिले”. अमीर खुसरोच्या बोलण्याचा अर्थ मला आता थोडाफार कळू लागला होता. रागही थोडा कमी झाला होता.”अग ! अशा परिस्थितीत हिंदुस्तानी संगीताचे हाल कोणी कुत्र तरी खात होते का? मंदिरं नष्ट झाल्यामुळे ‘इल्म’ (ज्ञान) असलेले संगीत विद्वान दक्षिणेकडे पळून गेले नाहीतर अज्ञातवासात गेले. राजसत्तेमधून हिंदुस्तानी संस्कृती हद्दपार झाल्यामुळे आलीम (ज्ञानी) गायक, जाणते कलाकार, दरबार पर्यंत येणे शक्यच नव्हते”. त्याची बडबड चालूच होती. आता त्याला माझा देखील विसर पडला होता. एका वेगळ्याच मनस्थितीत तो स्वतःशीच बोलत होता. मला आता परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येऊ लागले होते. “तुला जर एवढे सगळे सोयीचे होते आणि एक नव्हे, तर तीन/तीन राजसत्तेतल्या सात सुलतानांचा प्रतिष्ठित कवी म्हणून मान होता तर कशाला केला हा खटाटोप”. माझ्या स्वरात अजूनही धार होती. त्या टोकदार शब्दांनी त्याची तंद्री भंगली. “हं, खटाटोप ! खरंच का केला बर मी? अग आजोळच्या हिंदुस्तानी वातावरणात वाढलोय मी. ऋतुगीते, सोहळे, सणवारात म्हटली जाणारी अनेक गीते मला नादावून टाकायची. काव्याची गोडी मला लहानपणापासूनच होती. एकीकडे मुशायरे, दरबारी रिवायत (रीत) यातून फारसी, अरबीमधले काव्य आणि संगीताचे भरपूर इल्म मिळत होते, पण समाधान नव्हते. तर दुसरीकडे हिंदुस्तानी संगीत माझी रूह (आत्मा) जाळत होती, मला घायाळ करत होती, पण त्याचे इल्म देणारा कोणी आलीम मिळत नव्हता. मला हिंदुस्तानी असण्याचा नाज (अभिमान) होता. सर्व जगात भारतीय संगीत सर्वश्रेष्ठ आहे हे मला उमजलं होतं, पण कळणार कसे ? मी इल्मदोस्ती पसंद कवी आहे. नुसत्या वाहवाहीवर भाळणारा नाही”. त्याच्या बोलण्यात तळमळ होती, सच्चाई होती. मी त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकू लागले. “मग मला सुकून (शांती) मिळाला तो माझे पीर (गुरु) औलिया निजामुद्दीन चिश्तीच्या सहवासात. मी त्यांचा मुरीद (शिष्य) झालो”. माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्नार्थक भाव बघून त्याने हे अपेक्षित असल्याचे स्मित केले आणि तो सविस्तर सांगू लागला. “इस्लामचा प्रसार करण्यासाठी हिंदुस्तानात या सल्तनती यायच्या अगोदरच सुहारवर्दी, काद्री, चिश्ती असे अनेक सुफी पंथ आले होते. प्रेमातून अल्लाहला भेटणे म्हणजेच इश्क-ए-मिजाजी (भौतिक प्रेम) मधून इश्क-ए-हकीकी (अध्यात्मिक प्रेम) पर्यंत जाणे हे या संप्रदायांचे तत्व होते. त्यातही चिश्ती संप्रदाय हिंदुस्तानी मिजाजाच्या अधिक जवळ आला. दिक्र म्हणजेच जिक्र (नामस्मरण) ही या संप्रदायाची खासियत होती. मला हा संप्रदाय आवडला आणि त्यांच्या ‘समा’ (बैठक) मध्ये मी शरीक (सामील) झालो. तुला माहिती आहे, हजरत निजामुद्दीन औलिया यांना देखील हिंदुस्तानी मुसिकीमध्ये (संगीत) बेहद दिलचस्पी होती. औलिया यांनीच संगीताला, त्यातही हिंदुस्तानी संगीताला उत्तेजन दिल्यामुळे त्यांच्या दर्ग्यात आम लोकांची हीsss रांग लागायची. खरतर मौसिकी ही इस्लामला कुबूल नाही, पण औलिया यांच्या प्रेमळ स्वभावाला ‘मौसिकीच’ शोभून दिसली. आणि माझ्यासारख्या वेड्याला त्यांनी हेरून त्यांचा पट्टशिष्य बनवले यात नवल ते काय!”. आता अमीर खुस्रो रंगात आला होता. विषय भरकटत आहे असे वाटून मी त्याला मध्येच तोडत विचारले, “हे सगळं ठीक आहे. पण हिंदुस्तानी संगीताचे काय ?” माझे बोलणे पूर्ण न होऊ देत तो लगेच म्हणाला, “तेच तर सांगतोय, मला फारसी आणि अरबी संगीतातले चार उसूल आणि बारा परदे माहित होते. पण हिंदुस्तानी संगीताशी मी अजिबात वाकीफ (ओळख) नव्हतो”. मला लक्षात आले की ज्या काळात अमीर खुस्रो वावरत होता, तो हिंदुस्तानातल्या सांगीतिक कोलाहलाचा काळ होता. शारंगदेवाच्या संगीतरत्नाकरातल्या अनेक पद्धती कालबाह्य झाल्या होत्या. ७ स्वरांच्या साप्तकाची संकल्पना तर होती, पण मूर्च्छना पद्धतीतून रागांचा आविष्कार करताना बारा स्वरांचा वापर होत होता. च्युत पंचम, च्युत षड्ज अशा अवघड गोष्टी आत्मसात करायच्या म्हणजे केवढा अभ्यास लागत असणार! धैवताला षड्ज मानून त्याच्या मूर्च्छनेत एखादा सांगीतिक विचार मांडण्यासाठी शास्त्राची केवढी बैठक लागेल, आणि हे सगळं अध्यात्म या परदेशी लोकांना कसं कळणार? या पार्श्वभूमीवर, अमीर खुस्रोच्या हिंदुस्तानी संगीत जाणून घ्यायच्या धडपडीचे मला कौतुक वाटू लागले. “मग तू काय केलेस?” शांत झालेल्या माझ्या आवाजाने त्याला जरा बरं वाटलं. माझ्याकडे आत्मविश्वासाचा एक कटाक्ष टाकत तो पुढे म्हणू लागला “मग मी मजलीस (बैठक) भरवू लागलो. गजल, सोहेला, गीत, यांची रचना करून आजूबाजूच्या आमिल (नवशिक्या) गवयांकडून गाऊन घेऊ लागलो. तसे दरबारात सनाचंगी, फुतुहा, नुसरत खातून, मेहेर अफरोज सारखे गायक आणि वादक कलाकार होते, पण त्यांना हिंदुस्तानी संगीताचा इल्म नव्हता. एकदा काही आमील हिंदुस्तानी गवयांनी दक्खनच्या गोपाल नायकाचे नाव सांगितले”. गोपाल नायकाचे नाव ऐकताच माझी कळी खुलली. मी एकदम म्हटले, “ अरे गोपाल नायक तर हिंदुस्तानी संगीतातले फार मोठे नाव होते. देवगिरीच्या यादव साम्राज्याचे ते राजगायक होते. मोठे शिव भक्त होते ते!. प्रबंध गायकीचे मोठे अधिकारी होते. राग कदंबक्कम आणि कुडूक्क तालाच्या निर्मितीचे श्रेय त्यांच्या नावावर आहे. असे म्हणतात की ते गायला लागले की हरीण इत्यादी पशु आणि पक्षी त्यांच्याजवळ येऊन ऐकत बसायचे”. मी भडाभडा सगळी माहिती सांगून टाकली. अमीर खुस्रोने सुद्धा माझ्या होकारात होकार मिळवला आणि म्हणाला “तेच तर, बिना तीर कमानीने शिकार स्वतः शिकाऱ्याकडे शिकार बनून येण्याची बेहोशी याच मौसिकीत आहे, हे मला माहित होते आणि याचे इल्म फक्त गोपालनायक सांगू शकेल असे मला वाटले. म्हणून अल्लाउद्दिन खिलजीच्या एका फतेहमध्ये मी सेनापती मलिक काफुर बरोबर देवगिरीला गेलो. हजरत गोपाल नायक आणि त्याच्या मोठ्या शिष्य परिवाराला बाइज्जत दिल्लीला घेऊन आलो. अनेक दिवस त्याचे गायन ऐकले. माझ्या कुशाग्र बुद्धीने मी तसंच्या तसं गाऊ शकलो. दरबारात पैज जिंकली पण इल्म नाही हासिल करू शकलो. बहुतेक नायकांना मी त्या लायक वाटलो नाही”. अमीर खुस्रोची खिन्नता त्याच्या नजरेतून साफ दिसत होती. संगीताला पवित्र मानणाऱ्या हिंदुस्तानी कलाकारांची धारणा याला कशी कळणार! या रुहानी संगीतासाठी किती निर्मळता राखावी लागते, किती गोष्टींचा संयम राखावा लागतो ! हे याला जमले असते का ? मी मनात म्हटलं. पण पुढे काय झाले याची उत्सुकता मला स्वस्थ बसू देईना. माझी ही अवस्था ओळखून तो बोलू लागला, “पण मी हार मानली नाही. सगळ्या आवामला (लोकांना) या मुसिकीची जादू कळवणे हे जणू माझं मक्सदच बनलं होते. गोपाल नायकाने गायलेल्या प्रबंधांचा माझ्या कुवतीने अभ्यास करून मी इथल्या संगीतात तबदिली आणायचा प्रयत्न केला. हिंदुस्तानी संगीतातली क्लिष्टता कमी करण्यासाठी षड्ज, पंचम यांचे एकच रूप ठेवले. बाकीच्या स्वरांची देखील विकृत आणि शुद्ध असे दोनच रूप ठेवले. फारसी संगीतातील बारा परद्यांप्रमाणेच बारा स्वरांचे प्रमाणीकरण केले. त्यातून निर्माण होणाऱ्या रागांचे अरबी संगीत पद्धतीतील उसुले-मकाम पद्धतीत वर्गीकरण केले”. तो जसा जसा एकेक बदल सांगत होता तसे तसे मला सगळ्या श्रेयांची संगती लागू लागली. मी सहजच बोलून गेले, “अच्छा ! तर नवीन रागांची निर्मिती सुद्धा अशीच केलीस”. त्यावर तो पटकन म्हणाला,”हो तर ! याला निर्मिती असे तुम्ही म्हणता. मी आवाम आणि उमरांना एका धाग्यात जोडण्यासाठी हिंदुस्तानी मौसिकीत फारसी परद्यांची शिरकत (अंतर्भाव) केली. दोन्ही संगीताला एकमेकात मिसळले. म्हणजे बघ, तुम्ही गाता तो राग यमन घे. त्याला ऐमन देखील म्हणतात. हिंदुस्तानीतल्या हिंडोल रागामध्ये फारसीचा नौरोज मिसळला. झीलफ रागात हिंदुस्तानी पट आणि फारसी शहनाज मिसळला. फिरदोस्त तयार करताना कानडा,गौरी,पुरबी आणि फारसी अहंगचे मिश्रण केले. सर्परदा रागात गौड, बिलावल,सारंग आणि फारसी रास्तचे मिश्रण आहे. तसेच उश्शक, शहाना, साझगिरी, मोबर, फरगाना अशा अनेक रागांची रचना मी केली. हिंदुस्तानी संगीताला मुख्य प्रवाहात आणून त्याचा दरबारात मान वाढावा म्हणून केलेले प्रयत्न होते ते”. एकीकडे सरकार दरबारी फारसीचे महत्व आणि वर्चस्व मान्य करणे, आणि दुसरीकडे प्रेम मात्र हिंदुस्तानी तहजीबीवर करणे, ही तारेवरची कसरत तो कसा करत असेल याची पुरेपूर कल्पना मला आली. संगीताप्रमाणेच त्याचे काव्य निर्मितीच्या बाबतीत देखील तसेच धोरण दिसले. फारसी काव्याबरोबरच हिंदवी, ब्रज या हिंदुस्तानी भाषांमधून केलेले काव्य वर्गभेदाविषयी असणारी बंडखोरीच वाटली. त्याच्या ज्या काव्याने माझ्या मनात त्याच्या विषयी कुतूहल निर्माण झाले होते, ते फारसी काव्य डोळ्यासमोर आले.

छु मन तुती- ए- हिंद अर् रास्त पर्सी
झि मन हिंदवी परस्ता नघ्झ गोयं I 

स्वतःला हिंदुस्तानाचा पोपट म्हणवून घेताना केलेल्या बंडखोरीचे पारडे आणि त्याचे संतुलन राखण्यासाठी केलेल्या राजकीय तडजोडी दुसऱ्या बाजूने, असे स्पष्ट चित्र आता माझ्या समोर उभे राहिले. मनातल्या रागाची जागा आदराने घेतली. तरी पण माझ्या प्रश्नांचे पूर्ण उत्तर मिळाले नव्हते. मी अधीरतेने विचारले “ रागांचे समजले, पण तालांचे आणि गायन प्रकारां बद्दल काय ? आणि शिवाय तबला आणि सतार देखील तुझ्याच नावावर आहे की ....” मला मध्येच आडवत तो म्हणाला “अरे हो हो ! सांगतो ना थांब जरा. हे बघ मी आहे कवी माणूस. काव्य हा माझा मूळ पिंड. आता काव्य करताना वेगवेळ्या छंदांचा वापर ओघानेच होणार. त्यातून नवीन तालांची रचना घडली. उदाहरण म्हणून तो सुलफाक्ता तालच घे ना. त्याचे मूळ नाव उसुल–ए- फाक्ता आहे. फाक्ता म्हणजे कबुतर. कबुतराच्या दोन गुटूरण्यामधल्या अंतराचे मी निरीक्षण केले आणि त्याला एका आवर्तनात बांधले. झाला तुमचा १० मात्रांचा सुलफाक्ता, ज्याला तुम्ही आज सूल ताल म्हणता. अशा प्रकाराने फारसी काव्यातले अनेक बहर् (छंद) मी तालात तबदील केले. त्यातले पश्तो, जत, सवारी, फिर्दोस्त, छपक, खामसा झुमरा ताल पुढच्या काळातही टिकले. या शिवाय तू जर कौल, कल्बाना, नक्ष, गुल, कव्वाली, तराना,खयाल या गायन प्रकारांविषयी म्हणत असशील तर मी तुला परत तेच सांगेन की हे फारसी संगीतातले गायन प्रकार औलियाच्या ‘समा’ मध्ये गायले जातच होते. मी फक्त त्याचे हिंदुस्तानीकरण केले. ‘समा’ मध्ये ते जास्तीत जास्त गायले जावेत म्हणून त्यांच्या आकृतीबंधात सुधारणा केल्या, काही गायन प्रकारांमध्ये नवीन रचना केल्या. त्या खानकाहमध्ये गायल्या जाऊ लागल्या. लोकांना आवडू लागल्या. तुला सांगतो,की जेव्हा टाळ्यांच्या असराने बेहोष झालेले कव्वाल आवाज टीपेला नेऊन तराना गाऊ लागत, तेव्हा सगळा माहोल इश्क-ए-हकीकी बनायचा आणि औलीयांच्या चेहऱ्यावर मुस्कान दिसायची. तेव्हा मला जे समाधान मिळायचे ते मी बयाँच करू शकत नाही. मग त्यासाठी मला कोणी चापलूस म्हटलं तरी बेशक ! त्याचं काय आहे की जो पुढे येऊन समाजात काही तबदिली आणण्याची कोशिश करतो त्याला श्रेय आणि अपश्रेय दोन्ही घ्यावे लागते. हिंदुस्तानी मौसिकीचे गुण मला उमजले होते. मी तिचा निस्सीम चाहता होतो. या चाहतने आणि करम करतार औलीयाच्या आशीर्वादानेच फारसी आणि हिंदुस्तानी मौसिकीला एकत्र बांधण्याचा प्रयत्न केला. पुढे काही आमिलांनी तबला आणि सतारीची निर्मितीही माझ्या नावावर टाकून दिली. पण अल्लाह कसम ! मी कुठेच असे म्हटले नाही की हे सगळे मी केलंय”. त्याच्या या पोटतिडीकीच्या स्पष्टीकरणावर मी गंभीरपणे विचार करू लागले. त्याच्या बोलण्यात तथ्य होते. त्याने लिहिलेल्या कुठल्याच साहित्यात या रागांचा, तालांचा, गायन प्रकारांचा उल्लेख दिसला नव्हता. तो पहिल्यांदा दिसला, तो औरंगजेबाच्या काळात, म्हणजे साधारण तीनशे वर्षांनी, फकीरुल्लाह या संगीतज्ञाच्या ‘राग दर्पण’ या ग्रंथातून. याचा अर्थ अमीर खुस्रो आणि हिंदुस्तानी संगीत हे समीकरण खूप नंतर तयार झाले. खुस्रो हा मितभाषी, राजपत्रित अधिकारी होता. जलालुद्दीन खिलजीने त्याला ‘अमीर’ या पदवीने सन्मानित केले होते. एक प्रतिष्ठित अधिकारी म्हणून त्याला मान होता. आपले महत्व कसे राखावे, हा मुत्सद्दीपणा त्याच्यात भिनलेला होता. त्यामुळे त्याने मकाम पद्धतीने केलेले रागवर्गीकरण पुढे विद्यारण्य, व्यंकटमखीसारख्या संगीतज्ञांनी स्वीकारून ते संस्थान, मेल, ठाठ अशा नावांनी हिंदुस्तानी संगीताच्या प्रवाहात एकरूप होणे स्वाभाविक होते. जेव्हा एखादी नवीन गोष्ट प्रकाशात येते आणि ती पुढे दीर्घकाळ टिकून राहते, तेव्हा ती गोष्ट घडण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या संपूर्ण टीमचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला त्याचे यश अथवा अपयश सोसावे लागते, ही समाजाची धारणा इथे चपखल बसतेय असे माझ्या लक्षात आले. याचे एक जातिवंत उदाहरण मला इतिहासातच सापडले. पंधराव्या शतकात धृपद शैलीला अभिजात संगीताच्या प्रवाहात आणण्याचे श्रेय ग्वाल्हेरचा राजा मानसिंह तोमर याला जात असले तरी त्यासाठी संशोधन करून, लोकप्रिय करण्यासाठी नायक बक्षु, भन्नू, बैजू, अशी संगीतज्ञांची तुकडीच राजाच्या पदरी होती. त्यामुळे खऱ्या अर्थाने तुती- ए- हिंद असलेल्या अमीर खुस्रो आणि त्याचे गुरु हजरत निजामुद्दीन औलिया यांनी हिंदुस्तानी संगीतासाठी केलेली अजोड कामगिरी नाकारणे मला त्यांच्यावरच नव्हे तर हिंदुस्तानी संगीतावर अन्याय केल्यासारखे वाटू लागले. वरवरच्या किंवा सांगोवांगी गोष्टीमुळे आपण भरकटलो ही चूकही उमजली. अमीर खुस्रोची माफी मागितली पाहिजे, असे वाटून मी शेजारी पाहिले तर तो नव्हताच ! त्याच्या बरोबर केलेल्या मुशाफिरीने मन हलकं झालं होतं. मी सस्मित होऊन मग नेहेमीप्रमाणे प्रश्नांचे ढीग उपसून रिकाम्या टोपलीकडे पाहू लागले.