Friday, December 4, 2015

           तराना – सगुणाकडून निर्गुणाकडे.....



                                              अंजली मालकर
                                                                                                      
                                                                                                      www.anjalimalkar.com

‘‘अगं तू वीणाताई सहस्रबुद्धेंची शिष्या ना ! मग कर ना तरान्यावर एक कार्यक्रम’’ शैलाताई मला म्हणाल्या आणि माझी ढकल गाडी चालू लागली. काळाने रिवर्स घेतला आणि वीणाताईंनी रचलेले, म्हटलेले एक से एक तराने डोळ्यासमोर फ्लॅश होऊ लागले. त्यांच्या आवाजातला व्हायब्रंस,स्वरांची अचूक फेक,गाण्यातला जोश आणि लयीच्या नोंकझोंकितून तयार झालेल्या स्वरनादाच्या लाटा क्षणात तरळून गेल्या.त्या मंतरलेल्या दिवसांतील भावुकता आणि संगीताची एक अभ्यासक असण्यातला शिस्तबद्धपणा, अशा दोन किल्ल्या घेऊन मी ‘तराना’ या शास्त्रीय संगीतातील लोकप्रिय गीतप्रकाराची वेगवेगळी कुलुपं उघडायला निघाले.माझ्या लक्षात आले होते की हा गायन प्रकार केवळ शास्त्रीय संगीतातच नाही तर चित्रपट संगीत, पार्श्वसंगीत यात देखील वापरला गेला आहे. कोहिनूर चित्रपटातले ‘मधुबन में राधिका नाचे रे’ नंतर रफीसाहेबांचा हमीर रागातला तराना, गाण्याचा साधारण कान असणाऱ्या माणसालाही कसा डोलवतो हे ही मी अनेक वेळा पाहिले होते,अनुभवले होते.त्यामुळे माझा हा उद्योग अनाठायी होणार नाही याची मला खात्री होती.मी भराभर कामाला लागले.ढीगभर पुस्तके पुढ्यात घेऊन त्यातून माहिती शोधू लागले.पण अहो आश्चर्यं ! कुठल्याच पुस्तकात मला तरान्यावर एका पानाच्या वर माहिती मिळाली नाही.मध्ययुगात जन्मलेला हा गायनप्रकार अनेक वळण घेत आजच्या आधुनिक काळापर्यंत चांगलाच फोफावला होता. पण त्याच्या विषयी खूपच त्रोटक माहिती लिखित स्वरूपात मला मिळाली.पुस्तकांमधल्या छापील जगाच्या पलीकडे असणाऱ्या एका वेगळ्या जगाच्या खिडक्या आता मला खुणावू लागल्या.वरकरणी निरर्थक शब्दांच्या कसरती वाटणाऱ्या या आकर्षक गीतप्रकाराच्या पायऱ्या मला जास्त खोल खोल नेऊ लागल्या.
पहिल्याच पायरीत अमीर खुस्रो या नावासमोर मी अडखळले. साधारण १३ आणि १४व्या शतकात  भारतीय संगीतात जे जे काही महत्वाचे बदल घडले,त्यातल्या अनेक बदलांचे श्रेय अमीर खुस्रोला देण्यात आलेले पुस्तकातून दिसले. सूफी गायक गातात ते कव्वाली,कौल,कलबना या गीत प्रकारांप्रमाणेच तरान्याच्या निर्मितीचे श्रेय सुद्धा अमीर खुस्रोला दिले गेल्याचे पुस्तके सांगत होती. तसं पाहिला गेलं तर भारतीय संगीताच्या दृष्टीने खरच हा काळ कलाटणी देणारा होता.याच काळात हिंदुस्तानी आणि कर्नाटक असे दोन संगीत प्रवाह भारतीय संगीतात स्पष्टपणे वेगळे दिसू लागले होते.याच काळाच्या आगे मागे भारताच्या वायव्य सरहद्दी पलीकडून आलेल्या अनेक स्वाऱ्या, केवळ राज्यकर्तेच नाही तर तिथली संस्कृती,भाषा,संगीत भारताला भेट म्हणून देऊन गेल्या होत्या.फारसी,अरबी या भाषांची भारतीय समाजात शासनकर्त्यांच्या योगाने चांगलीच मिसळण झाली होती.तरीसुद्धा या लिखित अक्षरांच्या सत्यते विषयी माझ्या मनात शंका येऊ लागल्या.खरतर फारसी भाषेत तराना याचा शब्दशः अर्थ गीत असा असताना त्याची बांधणी इतर काव्य प्रकारासारखा नाही.असे का ? आणि शेकडो वर्ष संगीत रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या एका संपूर्ण गीतप्रकाराचे श्रेय एकाच माणसाला कसे देता येईल? मनातल्या प्रश्नांची सुई मग अमीर खुस्रोच्या जडण घडणीच्या दिशेकडे वळली. १३व्या शतकात अल्लाउद्दिन खिलजीच्या राजवटीत पर्शियन वडील आणि भारतीय आईच्या पोटी अमीर खुस्रो यांचा जन्म झाला. त्यांच्या लहान वयात वडील वारल्यामुळे बालपणीचे भारतीय संस्कार आईकडच्या आजोबांचे झाले असले तरी शिक्षण आणि वावर खिलजी घराण्याच्या उच्चपदस्थांमध्ये झाला होता.जसे आजोबा सैन्यामध्ये अधिकारी असल्यामुळे घरात साध्या शिपायापासून अधिकारी वर्गापर्यंत सर्व प्रकारच्या माणसांचा सहवास अमीर खुस्रोला मिळाला.तसेच वडील आणि आजोबांच्या पदामुळे अमीर खुस्रो यांना खिलजी दरबारामध्ये थेट प्रवेश मिळत असल्यामुळे तिथले तौर तरीके, कवी संमेलने, गायनाच्या मैफिली यांचा गहिरा प्रभाव त्याच्यावर झाल्याचे लक्षात आले.जन्मजात कुशाग्र बुद्धीमत्ता आणि आकलन शक्तीची अद्वितीय देणगी लाभलेल्या या इसमाचे व्यक्तिमत्व,प्रेरणा,आणि कार्य चित्रपटासारखे उलगडत गेले.राजकवी म्हणून दरबारात मिळालेला मान, स्वभावातला धूर्तपणा,राजकारणी आणि धोरणी व्यक्तिमत्व एका बाजूला आणि सूफी संत निजामुद्दीन औलिया यांची निस्सीम भक्ती,काव्य,संगीताची अद्वितीय पारख, अमीर उमरावां एवढेच सामान्य जनतेमध्ये मिसळण्याची हातोटी,आणि स्वतःला तुतिए हिंदम्हणजेच भारताचा पोपट म्हणून घेण्यात वाटणारी धन्यता दुसऱ्या बाजूला .... सगळंच विलक्षण होते. त्यांची काव्य संपदा वाचता वाचता त्यांनी लिहिलेल्या फारसी काव्यात मला तरान्यात वापरतात ती अक्षरे दिसली आणि माझ्या विषयाला दिशा देणारा धागा मिळाल्याचा आनंद झाला. पण ही अक्षरे एखाद्या वाक्यासारखी न वाटता एखादी नादमय अक्षरांची रांग असावी असे वाटले. पुढे त्यांनी रचलेल्या कौल कलबना कव्वाली मध्ये सुद्धा अशीच अक्षरे पाहायला मिळाली. अशा प्रकारच्या अक्षरांचा वापर भारतात पूर्वापार आलेला आहे हे माझ्या वाचनात आले  होते.भारतीय संगीत शास्त्रात अशा प्रकारच्या अक्षरांना स्तोभाक्षरे म्हटल्याचे माहित होते. उद्गार वाचक शब्दांचे काम ही स्तोभाक्षरे करतात.तशीच अक्षरे आहेत का ही ? कव्वाली नंतर अशी अक्षरे वरच्या लयीत म्हणण्याचा प्रघात काव्वालांमध्ये तेव्हाच तर आला नाही ना ! या अक्षरांचा अध्यात्माशी तर काही संबंध नाही ना ? पाणी आता अधिक गहिरे होऊ लागले होते. खुस्रोने रचलेल्या आणि नुसरत फतेह अलीने गायलेल्या ‘मन कुंतो मौला’ या कव्वालीचे स्वर कानात घुमू लागले.खानकाहात गोलाकार बसून ‘समा’ मध्ये म्हणणाऱ्या कव्वालांच्या जोशपूर्ण टाळ्या,टीपेचे आवाज तनामनाला रोमांचित करू लागले.वावटळीबरोबर गिरकणाऱ्या पालापाचोळ्यासारखे टाळ्यांच्या धुंदीत घुमणारे कव्वाल,त्या धुंदीला बर्करार ठेवण्यासाठी आता लयीचा वेग वाढवू लागले. आता कव्वालीच्या अर्थवाही शब्दांना आता वेग सोसवेना.ते हेलपाटू लागले आणि नकळत मृदू व्यंजनी ‘तननन तोमतन’ ‘यललि’ ‘यला’ ही अक्षरे त्या गतीवर स्वार झाली.टीपेच्या आर्त स्वरात म्हटलेल्या या व्यंजनांनी सूफी तत्वज्ञानाचा गूढ गाभा खोलून दाखवला. स्वर व्यंजनांच्या चमत्कृतीतून ईश्वरानुभूतीला जवळ करण्याची ही कोशिश या अक्षरांमध्ये उतरली. पुढे नंतरच्या काळात ही अक्षरेच कव्वालांच्या गळ्यातील ताईत बनली.
काही जणांनी यलली’ म्हणजे ‘या अली’, ‘यलला’ म्हणजे ‘या अल्लाह’, ‘तोम’ म्हणजे तुम असे अर्थ सांगितले म्हणून मी या ‘निरर्थक’ शब्दांना अर्थ जोडण्याचा निरर्थक प्रयत्न करू लागले.फर्माईशी तराना नावाच्या तराना प्रकारात असे काही काव्य सापडले देखील.पण या जोडाजोडीच्या नादात स्वरांनी ही अक्षरे इतकी पुढे नेली की मला धावत धावतच त्यांना गाठावे लागले. पिढी दर पिढी कव्वाली म्हणणाऱ्या कव्वाल बच्चांनी आता या अक्षरांनाच ठाकून ठोकून नवे स्वरघाट तयार केले होते. कुंभार जसा चाकाचा वेग नियंत्रित करून शैलीदार आणि वेगवेगळ्या घाटाची मडकी तयार करतो तशाच शैलीदार रचना आता तालचक्राच्या वेगवेगळ्या गतीत घालून आणि तरान्याच्या अक्षरातील आकार,इकार,उकार,मकार यांना कधी लांबवून,कधी तोडून तर कधी आघात देऊन होऊ लागल्या.अर्थ-अनर्थाच्या फेऱ्यातून आता तराना मुक्त झाला होता.कव्वालीच्या मागेमागे फिरणाऱ्या लिंबूटिंबू तरान्याचे आता प्रौढ ख्यालात रुपांतर झाले होते. त्या त्या रागानुसार सुंदर नादाक्षरांची चित्तवेधक संगती लावून लोकांना नादाला लावायचे आणि निर्गुणत्वाचे सुभग दर्शन घडवायचे अशी जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली.शब्दार्थांचे संसारिक झगे गळून पडले आणि अनावृत्त सौंदर्याच्या नादमय अक्षरांची सुवर्णकांती झळाळून उठली.स्वर,व्यंजने यातून तयार झालेल्या यातल्या शब्दांना आता सर्वसाधारण अर्थ न सांगता शब्दांच्या पलीकडे जाणारा संगीतात्मक अर्थ सांगायचा होता. एक नवी परिभाषा आता तयार झाली होती. जन्मलेलं बाळ शब्द शिकायच्या अगोदर स्वरातूनच बोलतं की ! ती निरागसता, प्रामाणिकपणा आता तराना मांडू लागला.नवजात बालकासारखेच त्याचे हे बोलणे समाजातील सर्व स्तरातील लोकांना आवडू लागले. कलाकार मंडळींनाही हे खेळणं हवहवंस वाटू लागलं. त्याला कधी झपतालात बांधून बघ.कधी वेगवान तीनतालात फिरवून बघ,तर कधी ठाय एकतालात पसरून बघ,एक ना दोन ! मज्जाच सुरु झाली. निसार हुसेन खान,विनायकबुआ पटवर्धन,सलामत अली नजाकत अली सारखे अनेक निष्णात खेळाडू तरान्याला खुमारीने लीलया फिरवू लागले. अमीरखान साहेब,जितेंद्र अभिषेकी सारखे तत्वचिंतक सांगीतिक तत्वज्ञानातला गूढार्थ त्यातून मांडू लागले. कुमार गंधर्वांसारखा प्रतिभावंत कलाकार अक्षरांच्या नादालाच मित्र मानून त्यांच्याशी बोलू लागले.बडे गुलाम अली खान सारख्या रसिल्या कलाकाराने सापशिडीच्या खेळासारखा त्यात मुक्त विहार सुरु केला तर मालिनी राजूरकर, ,वीणा सहस्रबुद्धे सारख्या अनेक स्त्री कलाकारांनी स्त्री शक्तीच्या वेगवेगळ्या प्रतिमा या गायन प्रकारातून उभ्या केल्या. प्रभा अत्रे सारख्या प्रयोगशील गायिकेने हिंदुस्तानी तरान्यात कर्नाटकी ढंग आणून त्याला आणखीन व्यापक केले.कोणी टप्प्या बरोबर त्याला घेऊन टपतराना करू लागले तर कोणी शब्द,स्वर,पाटाक्षरे आणि तरान्याची अक्षरे घेऊन क्वार्टरेट सँडविच म्हणजेच चतुरंग म्हणून गाऊ लागले. ‘वेश तसा भेष’ या उक्ती प्रमाणे कर्नाटक संगीतात देखील तरान्याने ‘तिल्लाना’ या नावाने प्रवेश करून स्वतःला त्या संगीत धाटणीत विरघळून टाकले. त्याच्या आघात अनाघाताचे साद पडसाद झाल्याच्या रूपाने  वादनात सुद्धा उमटू लागले होते.एवढेच नाही तर तरान्याच्या चैतन्य तत्वाने आता नर्तकांच्या शयनगृहातही तिल्लाना,रासतराना म्हणून प्रवेश केला होता. नृत्याच्या कार्यक्रमात उत्कर्ष बिंदूच्या रुपात श्रोत्यांना अमूर्त भावास्थेचे दर्शन देऊन सगुणातून निर्गुणाकडे नेण्याचे अवघड काम सहजपणे तो करू लागला. या गीत प्रकाराने संगीतातील गीत,वाद्य,नृत्य या तीनही घटकांना आपल्या कवेत घेतले. शुद्ध कलाप्रकारात मंचावर दिमाखात वावरणारा तराना विसाव्या शतकात संपूर्ण भारतीय समाजाला वेड लावणाऱ्या चित्रपटांमध्ये देखील प्लेबॅकच्या वेशात आपले महत्व दाखवायचा विसरला नाही. सर्वव्यापी परमेश्वराला सगळीकडे पाहावे तशी मला आता तरान्याची व्यापकता जाणवू लागली. माझे अंग मोहरून आले. मन नतमस्तक झाले. खोल पाण्याचा तळ आता मी गाठला होता. ख्यालासारख्या प्रगल्भ वटवृक्षापासून फ्युजन संगीतात किंवा चित्रपटात वापरण्यासाठी पेरलेले तरान्याचे इवलाले कोंब चिरतरुण मनाच्या रसरशीतपणाचे प्रतिबिंबच झाले होते..