Sunday, March 25, 2018

जयपूर गायकी आणि कुमुदिनी काटदरे

      




जयपूर गायकी आणि कुमुदिनी काटदरे                                       अंजली मालकर 

भारतातल्या सगळ्या मुलांसारखीच मी देखील गुरु - शिष्यांच्या ऐतिहासिक आणि पौराणिक गोष्टी ऐकत वाढले. महाभारतातील अर्जुनाने, धनुर्विद्येचा सरावात गुरु द्रोणाचार्यच्या आज्ञेवरून फांदीवर बसलेल्या पक्ष्याच्या डोळ्याचा वेध घेतलेला असो, द्रोणाचार्य आणि एकलव्याची गोष्ट असो, श्रीकृष्णाने सांदिपनी ऋषींचा मुलगा सुकर्मा, याला गुरुदक्षिणा म्हणून दास्यातून मुक्त करणे असो किंवा धौम्य ऋषी आणि त्यांचा आज्ञाधारक शिष्य अरुणी असो, या सर्व कथांनी माझ्या मनात या नात्याविषयी आणि त्याच्या परंपरांविषयी लहानपणीच आकर्षण निर्माण केले होते. ते इतके, की अशा नात्यावर आधारित एक भाबडा चित्रपट तेव्हा मी पाच वेळा पाहिला होता ! जसे जसे वय वाढू लागले, आणि शास्त्रीय संगीतासारख्या पारंपारिक गुरुमुखी कलेचा अभ्यास करू लागले, तसे तसे या नात्यातले खाच खळगे दिसू लागले. शरीर, बुद्धी आणि मन या तीनही गोष्टी कला निर्मितीत अनिवार्य आहेत. गायन कला ही मनुष्याकडून मनुष्याकडे प्रवाहित होणारी असल्यामुळे आणि याला अजूनतरी पर्याय सापडला नसल्यामुळे, गुरु शिष्य नात्याचे प्रचंड वलय तयार झाले आहे, हे सुद्धा या कला प्रवासात लक्षात येऊ लागले. गाण्यासारख्या क्षणात मनाचा ठाव घेणाऱ्या कलेच्या अभ्यासाचे अनेक मार्गही दिसू लागले. आणि गंमत म्हणजे सगळेच मार्ग, त्या त्या वेळेला बरोबर आहेत असे जाणवायला लागले. प्रामाणिकपणाचा खांब जीवापाड धरून या कलेचा, कलाव्यवहार, गुरु, शिक्षण, माणूस अशा अनेक पैलूंनी अभ्यास करत असताना मला पारंपारिक घराणेदार गायनाच्या अनेक सुंदर खिडक्या दिसू लागल्या. पुढे, खिडक्यांच्या चौकटीवर रेखाटलेल्या कलाबुतींचे निर्मितीक्षण पहायला मिळाले आणि त्या रेखाटण्याचे थोडेफार कौशल्यही मिळाले. निर्माणकर्त्या गुरुकलाकारांसमोर बसून ही जादू बघताना, माझी मनाची अवस्था एकाच वेळी हरखलेली आणि आसुसलेली अशी कैक वेळा अनुभवली. मनुष्यत्वाच्या मर्यादा, कलेची अथांगता आणि जीवाची तडफड, हेच काय ते माझ्या अभ्यासाचे फलित !
बंदिशीच्या समेनंतर सरधोपटपणे रागाचा आलाप सुरु करून मुखडा घेऊन परत पहिल्या मात्रेवर, समेवर येणे, या प्रारंभिक टप्प्यानंतर, हळू हळू  अवर्तनातल्या तालासुरांची लगट मला कळू लागली. तालाच्या प्रत्येक मात्रेला सुरांचा विळखा देत चालणाऱ्या बंदिशींचा चुस्तपणा समजू लागला. तिची घट्ट वीण तितकीच घट्ट रहावी म्हणून तिला वश करण्यासाठी ती हज्जारवेळा तशीच म्हणण्याची रग कळू लागली. बंदिश गाताना, संगतकाराकडून लयीचे जे दान पडेल त्यातच खेळताना आखलेले डावपेच कळू लागले. डाव हरण्याचे जास्त आणि जिंकण्याचे कमी असतात ही पण अनुभवांची शिदोरी वाढायला लागली. एरवी अशक्तपणाने निपचित झोपलेला कलाकार, गायला लागल्यावर कसा परकाया प्रवेश करतो, हे चमत्कार सुद्धा या काळात मला पाहायला मिळाले. स्वतःचे गाणे न ऐकण्याचा भित्रेपणा सोडून मी जशी अंतर्मुख होऊन पुढे सरकले, तशा मला या घट्टविणीच्या बंदिशींमधल्या मोकळ्या जागा दिसू लागल्या. रागांच्या वाक्यांमधले स्वल्पविराम, पूर्णविराम, उद्गारचिन्ह दिसू लागले. रागांची भाषा आता पूर्ण उलगडू लागली होती. घराण्यांच्या वेशीच्या आत मी शिरल्याचे मला लक्षात आले. ग्वाल्हेर, आग्रा, किराणा, या दिमाखदार राजवाड्यांमध्ये विसावलेले हे राग प्रत्येक ठिकाणी किती वेगळे भासतात याचे अप्रूप वाटत असताना जयपूरचा राजवाडा मात्र माझ्यासाठी उघडत नव्हता. मी लांबूनच त्याच्याकडे जरा भीतीने, थोड्या अविश्वासाने बघत होते. दीड, तीनच्या विषम संख्येची त्याची महिरप, थोडी मागे, मग पुढे अशी चालणारी त्याची मांडणी, पूर्ण आकाराचा आवाका मला कोड्यात टाकत होता. याने माझ्या ‘गाणं कळण्याच्या’ शोधाला आव्हान दिले. ते आव्हान स्वीकारून, मी उलट फिरले आणि त्यासाठी ‘गुरुमुखाचा’ शोध सुरु केला. माझी विमनस्क अवस्था पाहून मैत्रिणीने दया येऊन मला एका गरीब वस्तीच्या मागे असलेल्या सोसायटी मध्ये नेले. फाटकाजवळ फणस लगडलेले प्रौढ झाड, अंगणात शहाबादी फारश्या आणि चार पायऱ्या चढून ओटा असलेल्या घरात आम्ही गेलो. गेल्या गेल्या खुर्चीवर बसलेल्या कृश स्त्रीला उद्देशून मैत्रीण म्हणाली “काकू , ही अंजली. तुमच्याकडे तुमच्या बंदिशी शिकायला आली आहे”. जयपूर घराण्याची विशुद्ध गायकी ज्यांच्याकडे आहे, त्या विदुषी कुमुदिनी काटदरे यांच्या समोर मी उभी होते. श्री ना.र मारुलकर, श्रीमती कमल तांबे,        सौ कौसल्या मंजेश्वर, मधुसूदन कानेटकर आणि गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांच्या सारख्या जयपूरच्या धुरंधर गुरूंकडून ज्यांनी अतोनात कष्टाने गायकी मिळवली, त्यांच्याकडे, म्हटलं तर फुटकळ कारण घेऊन शिकायला आले होते.

जुजबी विचारपूस झाल्यानंतर मी माझ्या ‘भीतीबद्दल’ मोकळेपणाने सांगितल्यावर हसून त्या म्हणाल्या,”बघू, पुढच्या आठवड्यात ये”. जयपूरचा महाल माझ्यासाठी किलकिला झाला होता. माझ्या भडभड बोलण्याला मोजके पण नेमके उत्तर देत कुमुदताईंनी कधी त्यांच्या गुरूंच्या आठवणीतून कधी बंदिशींच्या रचना उलगडून दाखवताना जयपूरचे पीळदार सौंदर्य माझ्यासमोर ठेवले.
एखाद्या महालाची रचना समजण्यासाठी ठराविक रागांच्या माड्याच लागतात असे नव्हे, तर कुठल्याही माडीवर जाण्याच्या पायऱ्या समजाव्या लागतात हा पहिला मूलभूत विचार मला त्यांच्याकडून कळला. त्यांच्या सौम्य, तजेलदार आकाराच्या दर्शनाने मी स्तिमित झाले. कुठेही जरासुद्धा खरचट नसलेला सुभग गोल आकार मला पहिल्यांदाच उमजला. श्वासपटलापासून मुखावाटे निघणारा स्वर जेव्हा नैसर्गिक दाबाने घशातील स्वरतंतूना स्पर्श करून सहज आकाराच्या खुल्या जबड्यातून बाहेर येतो, तेव्हा त्याला येणारी गोलाई एखाद्या नितळ गोलकासारखी भासते. हा आकार केवळ मुखाचा न राहता तो मनाच्या गाभाऱ्यात आकृती रूपात दडलेला असतो. तो जेव्हा प्रस्फुटीत होऊन तालाच्या आवर्तनात गुंफला जातो, तेव्हा येणारी नादाची भव्यता, जयपूर गायकीच्या धृपद कुळाकडे नेते. आवर्तन भरताना रागविचारांमध्ये जराही संदेह निर्माण झाला तर मुखाचा आकार आक्रसताना मी मला अनेकदा पाहिले असल्यामुळे आकारातगाणे किती अवघड आणि धाडसाचे आहे, किती अमूर्ताकडे नेणारे आहे हे उमजू लागले. अतूट श्वासाची, बेजोड दमसासाची कलाकुसर करताना लागणारा संयम, आणि तशात गायल्या जाणाऱ्या बडाख्यालाची लय ‘मध्य’ ठेवणे किती गरजेचे असते हे माझ्या लक्षात येऊ लागले. जयपुरी कथक नृत्यांगनांच्या गिरक्यासारखी गोलाईने चालणारे स्वर अधिक वेगाने पळू शकत नाही. आणि पाळले तर त्यांची गोलाई अबाधित रहात नाही. त्यामुळे जयपुरी तानांचा वेग गिरक्यांइतकाच मध्य लयीत राहू शकतो, हे आता कळू लागले होते.
तालाचे आवर्तन शब्दात भरताना मात्रेवर आधी स्वर ठेवावा मग अक्षर म्हणावा, कुमुदताईंच्या या सोप्या क्लुप्तीमुळे तालाचा जयपुरी आघात, अनाघात आणि अतीतचा खेळ, सर्पगतीची चाल कशी सहजगत्या साध्य होते, हे पाहताना गंमत वाटून आपोआप ‘वाह’ निघून जातो. मोठ्या आजारपणामुळे अशक्त झालेल्या शरीराने कुमुदताई वरच्या स्वरांचा प्रभाव, स्वतः वारंवार गाऊन आमच्या गळ्यातून काढण्यासाठी धडपडतात तेव्हा स्वतःचीच लाज वाटून आम्ही आमच्या असामर्थ्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तेव्हा ‘माझ्या गुरुंनी देखील माझ्यावर असेच कष्ट घेतले आहेत’ या त्यांच्या वाक्यातून मला गुरु-शिष्य नात्याचे नितांत सुंदर दर्शन घडते. ज्या गोष्टी ऐकत मोठी झाले, त्या गोष्टींमधले साररूप अनुभवताना मन भावूक होते.
कुमुदताईंची कलासंवेदना त्यांच्या रचनांमधून प्रकर्षाने जाणवतात. गोव्याला आग्रा घराण्याचे प्रसिद्ध गायक, रचनाकार पं. रत्नकांत रामनाथकर यांचा सहवास त्यांना काही काळ लाभला. सुरेख बंदिशींची बीजे बहुतेक तिथेच रुजली असावीत. बंदिशीतल्या शब्दांचा, त्यातील अक्षरांच्या उच्चारणातून येणाऱ्या नादवलयांचा इतका सूक्ष्म विचार मी त्यांच्याकडे पहिल्यांदाच अनुभवला. अक्षरांना स्वरवाहक करताना त्याच्या स्वतःच्या नादाचा आणि त्यातील शब्दार्थाचा प्रभाव बंदिशीचे लपलेले अनेक परिमाणं श्रोत्यांपुढे आणतात याची प्रचीती मला अनेक वेळेला त्यांच्याकडे आली. छातीतून येणारा ‘ह’, नाकपुडीतून येणारा ‘न’, ‘म’ म्हणताना विलग होणाऱ्या ओठांचे मार्दव उच्चारण, या शिवाय त्यांचे शब्दातले लघुत्व, गुरुत्व आणि त्यातून निर्माण झालेल्या आकर्षक लयाकृती जेव्हा तालाच्या चौकटीतून पुढे येतात, तेव्हा बंदिशीतली प्रगल्भता मनाला दिपवून टाकते.                       
कुमुदताईंच्या बंदिशीतल्या शब्दरचनेचा बारकावा जेवढा लक्षात आला तेवढाच बारकावा त्यांच्या बंदिशीतल्या स्वररचनेत आहे, हे त्यांनी उलगडून दाखवल्यामुळे कळला. षड्ज, पंचम हे एकरूपी स्वर जेव्हा रागवाक्यांमध्ये पूर्णविरामाचे काम करतात तेव्हा रागाचे इतर स्वर अल्पविराम आणि उद्गारचिन्हाचे काम करतात ही मेख त्यांनी गाऊन दाखवल्यावर लक्षात आली. रागातले वेगवेगळे न्यास स्वर राग वाक्य पूर्ण करण्यासाठी जेव्हा षड्ज किंवा पंचमात विलीन होतात, तेव्हा स्वरविचार आणि स्वरभावाला आलेला ठहराव, पूर्णत्व शब्दातीत असते, हा अनुभव कुमुदताईंकडे मला उमजला. बंदिश म्हणताना तालाच्या एखाद्या खंडात स्वर सहज दुगुनीत म्हणणे, बंदिशीतल्या शब्दार्थांचे स्वल्पविराम गाताना देखील सहज राखत त्यांना लयार्थाचे वेगळे परिमाण देणे, अशा छोट्या छोट्या पण प्रभावी गोष्टी चपखल पणे सांगून त्या बिंबवणे यातून त्यांची जबाबदारीने शिकवण्याची तळमळ आणि जयपूर गायकीशी असलेली एकरूपता नेहमी पहायला, अनुभवायला मिळाली आहे.
मी कुमुदताईंकडे जयपूरचा महाल पहायला शिकले. त्यातून उस्ताद अल्लादिया खाँ साहेब यांनी आपल्या प्रतिभेतून घडवलेल्या या भव्य वास्तूचे दर्शन झाले. यामुळे आग्रा, ग्वाल्हेर, या राजवाड्यांचे वैभव मला चांगले कळू लागले. संस्कृतीचा मानदंड असलेल्या शास्त्रीय संगीताच्या समृद्ध परंपरेचे दर्शन अशा थोर गुरुंमुळे झाले याची विनम्र जाणीव जेव्हा जेव्हा होते, तेव्हा तेव्हा मी या गुरु-शिष्य नात्याच्या विशुद्ध रूपापुढे नतमस्तक होते.     

   

Tuesday, August 29, 2017

लहजा

लहजा
                           अंजली मालकर

 “या फार मोठ्या गायिका आहेत बरं का, शास्त्रीय संगीताच्या” एका अनौपचारिक समारंभात, एका वकील मित्राने त्याच्या वकील भाचीला माझी ओळख करून देताना म्हटले. माझ्या विषयाचे लेबल घेऊन फिरताना मला आतापर्यंत शास्त्रीय संगीत आवडणारी आणि न आवडणारी अशी दोन्ही टोकाची माणसं पहायला मिळाली आहेत. शास्त्रीय संगीतासारखा क्लिष्ट तरीही आकर्षक विषयासंबंधी, त्या परिघाबाहेरच्या सुशिक्षित लोकांच्या मनात त्याच्या विषयीचे आकर्षण आणि गोंधळ मला सातत्याने पहायला आणि ऐकायला मिळाले आहेत. त्यादिवशी सुद्धा या दोन वकील रसिकांचे कुतूहल, कौतुक आणि आदराचे विधान मला सुखावून गेले, ते यासाठी की वकिलीसारख्या तर्कनिष्ठ व्यवसायातले लोक देखील शास्त्रीय संगीतासारखा भावनिष्ठ पण किचकट विषयाची मजा घेऊ शकत होते. तिथे जमलेल्या प्रतिष्ठित वकील आणि लेखक मंडळींनी गप्पांच्या ओघात शास्त्रीय संगीत हा विषय काढला. एक जण माझ्याकडे बघून म्हणाले, ‘ काहो, तुमच्या बंदिशी हिंदीतच का असतात? मराठीत का असू शकत नाहीत. मी त्यांना मराठी भाषेतली कठोर व्यंजने, त्यांचा गाण्यासाठी होणारा अडथळा, खंडित होणारा प्रवाह वगैरे समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी मुद्दा सोडला नाही. मृदू व्यंजने वापरून बंदिशी करता येतील इत्यादी मुद्दे समर्थनार्थ मांडू लागले. तेवढ्यात तिथे असलेले एक बहुश्रुत लेखक म्हणाले, “ अरे यांचं संगीत उत्तर हिंदुस्तानातून आले आहे, त्यामुळे ते हिंदी भाषा वापरतात.” मी एकदम चकित झाले. शास्त्रीय संगीतात शब्द हे सुरांचे वाहक असतात, असे आम्ही मनात असल्यामुळे शब्दांना घेऊन त्यांनी आणलेला हा प्रादेशिक भेद, यावर मी कधी विचारच केला नव्हता. जाणीवपूर्वक मराठी बंदिशी करणे आणि रागाला सहज घेऊन फिरू शकतील अशा हिंदी भाषिक बंदिशी घडणे, यातले ‘करणे’ आणि ‘घडणे’ यातले अंतर जाणवण्याइतके मोठे असते,हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे अशा परिघाबाहेरच्या प्रश्नाने मला विचारात टाकले. नाही म्हटलं तरी मराठीतून बंदिशींचा प्रयत्न न.चि. केळकरांच्या काळापासून आजतागायत सुरु आहेत. त्या वैचित्र्य म्हणून गायल्या सुद्धा जातात. पण मूळ प्रवाहात रुजू शकल्या नाहीत. एरवी हिंदी बोलताना मराठीपणाचा ठसठशीत लहजा असणाऱ्या गायक कलाकारांनी उत्तम बंदिशी मात्र उत्तर भारतीय भाषेत केल्या आहेत. हे कसं काय? उत्तर हिंदुस्तानी संगीत या भागात येऊन किमान आठशे वर्षे झाली असताना, व ते आपल्या जगण्याचा एक भाग बनले असताना, त्यातली भाषा परकी कशी होते? अशा अनेक प्रश्नांचे या निमित्ताने मनात उठले. समोर अनेक पारंपारिक बंदिशींचे शब्द आणि त्या गायल्या गेलेल्या अनेक बुजुर्ग कलाकारांचे रेकॉर्डिंग समोर दत्त म्हणून उभे राहिले. त्यांच्या उलटतपासणीत पहिला मुद्दा लगेच लक्षात आला. तो हा की, उत्तर हिंदुस्तानी ख्याल संगीताच्या बंदिशी या हिंदी भाषेत कमी आणि ब्रज, मैथिली या पोटभाषेत अधिक आहेत. म्हणजे व्याकरणनिष्ठ नागर भाषेपेक्षा भावनिष्ठ बोलीभाषेला इथे झुकतं माप दिलं आहे. त्यामुळे ‘पिया’ या शब्दाला ‘पियर’, ‘पियरवा’, ‘पियू’, ‘पी’ किंवा ‘गगर’ या शब्दाला ‘गगरी’, ‘गागर’, ‘गगरीया’ असे अनेक पर्याय रचनाकाराला मिळाल्यामुळे या लवचिक भाषेला अधिक स्वीकारले गेले. याच लवचिकतेने सुराधिष्ठीत गायन प्रवाही केले. शब्द हे दगडी अडथळे न ठरता, रागात वापरल्या जाणाऱ्या अमूर्त स्वरभावांचे सुंदर शिल्प झाले. सुरांचे प्रवाहित्व अबाधित राखण्यासाठी मग बंदिशीतल्या जोडाक्षरांनाही गोंडसपणे तोडून विलग अक्षर गाण्यात गायकांना जरा ही संकोच वाटला नाही. त्यामुळे ‘तुर्कमान’चे ‘तोरेकमान’, ‘प्रताप’चे ‘परताप’ म्हणून गाताना, शब्द गाणाऱ्याच्या तोंडात खड्यासारखे न लागता, खडीसाखरेसारखे ते सुरात विरघळून जातात. अशा उच्चारातून स्वर, लय मिळते आणि स्वरलयीतून तल्लीनता ! त्यामुळे सुराच्या भाषेचे मराठी सारख्या सडेतोड भाषेपेक्षा मृदू व्यंजनी हिंदीतल्या बोलीभाषेशी सख्य असणे स्वाभाविकच आहे असे वाटले.

शास्त्रीय संगीत आस्वादनाच्या एका छोटेखानी मैफिलीत, रागसंगीतातल्या एका नवसाक्षर रसिकाने मला विचारले ‘ का हो, तुमच्या बंदिशींमध्ये सैंया, सास, ननंद या शिवाय इतर विषय नसतात का? आणि तुम्ही शब्द विसरल्यासारखे एकच शब्द सारखा का म्हणता? अशा प्रश्नांमुळे ख्याल संगीतातील बंदिशींची घडण आणि हेतूकडे अधिक डोळसपणे पाहू लागले. रागसंगीतातील इतर गायनप्रकारांमध्ये ख्यालसंगीत हा सर्वात आधुनिक प्रकार मानला गेला आहे. धृपदातली रागशुद्धता, कव्वालीतली तानक्रिया आणि ठुमरी, दादरा,कजरी या लोकगीतप्रकारातून आलेले शब्द, यांच्या संयोगाने या गायन प्रकाराची निर्मिती झाली असे संगीतज्ञ मानतात. जेव्हा शब्दाधिष्ठीत काव्यप्रकार स्वराधिष्ठीत गायन प्रकार म्हणून बदलले तेव्हा त्यांची अनेक कडवी गळून पडली. फक्त स्थायी आणि अंतरा ही दोनच राहिली. मग या दोन कडव्यांना रागातील स्वरवाक्यांच्या झालरी लावून त्या मखरात एका अमूर्त भावस्वप्नाची स्थापना करणे हा या गायन प्रकाराचा हेतू बनला. एकाच शब्दाला रागातल्या अनेक स्वरवाक्यांनी खुलवणे ही त्या भावस्वप्नाकडे जायची एक रीत झाली. शब्द जरी तोच तोच असला तरी त्यांची स्वर रीत वेगळी असते. शब्दावर स्वर मांड टाकून त्याला एका अनामिक अवस्थेकडे नेतात, तेव्हा ही सुरांची भाषा अधिक बोलकी होते. स्वरांची झुंबरं जर लक्षवेधी करायची, तर शब्द दालनाच्या भिंती साध्याच असाव्या लागतात. त्यामुळे प्रेमासारखा चिरंतन विषय असो, जीवन तत्वज्ञान असो किंवा ऋतूवर्णन असो, सामान्य लोकांना आवडेल, रुचेल अशा विषयवास्तूतून नादाच्या अनिर्बंध,असीम सफरीला नेणे या गायनप्रकाराचे ध्येय बनले. ज्या शब्दांच्या पालख्या रागातले स्वर वाहून नेतात त्यांची नक्षी मी आता अजून जवळून बघू लागले. शब्दोच्चाराबरोबरच कुठल्याही रागांचे स्वर, त्या स्वरांची लय, त्यांचे उच्चारण आणि त्यातून साधली गेलेली भावप्रभा हा संस्काराचा परिणाम असतो. तो संस्कार गुरु शिष्यावर घडवत असतो. या विचारांच्या दिशा मला प्रादेशिक रागांकडे घेऊन गेल्या. प्रादेशिक भाषेतले शब्द तिथल्या संस्कृतीचा आरसा बनून, तिथल्या धुनांमध्ये न्हाऊन रागाच्या कोंदणात बसून येतात तेव्हा त्यांचा सुवास रातराणीच्या फुलांसारखा दरवळतो. माझ्या डोळ्यासमोर धनाश्री रागाची बंदिश तिच्या रंग वेषासाहित तरळू लागली. ‘थे म्हारो राजेंद्र, मोह्यो मोह्यो ढिली नथवाली’ गाताना नाकात मोठे, जड नथ घातलेल्या  राजस्थानातल्या मरूभूमीतल्या स्त्रिया आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करताना दिसू लागल्या. धनाश्रीतल्या स्वरांची लगबग लय, रागाची छोटी स्वरवाक्य आणि गाताना ‘ढिली’ला दिलेला हलकासा झोका ! रंगीलो राजस्थानचे गानचित्र उभे करून गेले.
जुन्या बंदिशींच्या शोधात, अशाच एका बंदिशीने माझा ठाव घेतला तो ‘ ए नबी के दरबार, सब मिल गावो बसंत की मुबारकी’ या बसंतच्या बंदिशीने. बसंत रागाची चैनदार लय. स्वरांच्या लगावातली भव्यता आणि दरबारातला बसंतोत्सव शब्दांमधून येताना तिचे सर्व सामाजिक, राजकीय संदर्भ घेऊन येत होता. केवळ शब्दच नाही तर बंदिशींच्या व्यंजनांचे, त्यातल्या स्वराचा लहजा, नादोच्चाराच्या वेगळ्या जाणीवा निर्माण करतात. ‘हँस हँस’ म्हणताना उच्चारलेला अनुनासिक ‘ह’ जेव्हा छातीच्या पोकळीतून येतो, तेव्हा नकळत अस्फुट हास्याची भासमानता तयार होते. ‘रंग’ म्हणताना जेव्हा ‘र’ चा ‘रौं’ होतो, तेव्हा अनुनासिक तीव्रता साऱ्या रागछटेत गडदपणा आणते. असं म्हणतात की सामगायन काळात प्रत्येक ऋचा गायनाचे फळ ठरलेले असायचे. आज वाटते की ते फळ म्हणजे त्या नादोच्चारातून निर्माण झालेले नादवलय असावेत, जे सजीवांना सुखाच्या जाणीवेपर्यंत घेऊन जायचे. रागदारी संगीतातील बंदिशी वाचताना, ऐकताना मला वाटून गेले की यांच्या उच्चारणाच्या ढंगदार लकबी त्यांना जिवंत करतात. त्यांच्यातला काव्यार्थ आणि काव्याला लगटलेला स्वरार्थ तिचे व्यक्तिमत्व घडवतातच या शिवाय कलाकाराची गायकी देखील घडते. अशा बंदिशी आणि त्यातल्या गायकीचे सांस्कृतिक मूल्य आतल्या खणात ठेवलेल्या वंशपरंपरेने चालत आलेल्या दागिन्यांसारखे असते. एकदा का या घडणावळीचे मर्म कळले की मग आत्मानंदाचा सुवास शतगुणित होतो. मन हलकं होतं. अत्तराचा सुगंध कुठूनसा येऊन चित्तवृत्ती प्रफुल्लीत होते. कदाचित हाच परिणाम रागसंगीतातील बंदिशींमधून अपेक्षित असावा.
लेखक मित्राच्या प्रश्नातून घुसळून निघालेल्या विचार मंथनाने पारंपारिक बंदिशींकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन बदलला. ओबडधोबड काव्याच्या आडून त्यांची समाजाशी घट्ट जोडलेली नाळ दिसून आली. रागाच्या एकत्वातून बंदिशींचे प्रादेशिक वैविध्य, देशाच्या हरवलेल्या समृद्ध पाऊलवाटा दाखवून गेले.           


Tuesday, April 18, 2017

सुवर्णभूमीच्या स्वरसावल्या




                   सुवर्णभूमीतल्या स्वरसावल्या                   

                                                 अंजली मालकर                                       

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. गोष्ट तुमच्या माझ्या पूर्वजांच्या पूर्वजांच्या पूर्वजांची. एका आटपाट देशामध्ये ते रहायचे. देश कसला मोठ्ठा प्रदेशच होता तो. उपखंडच म्हणा ना त्याला ! सुजलाम सुफलाम त्याचे नाव होते. नावाप्रमाणेच होता तो भाग, सदाहरित वृक्षराजिंपासून मोसमी झाडांपर्यंत असणारी जंगलं, खळाळणाऱ्या अवखळ झऱ्यापासून महाकाय नद्यांपर्यंत नवजीवन पाणी, लांबून सुद्धा ज्याचा दाह जाणवायचा अशा गंधकाच्या उष्ण स्रोतापासून हाडं गोठवणाऱ्या हिमनगापर्यंत पर्वत, क्षितिजापर्यंत पसरलेल्या वाळवंटापासून डोळ्यात मावणार नाही इतक्या दूरवर हजारो गलबत वाहून नेणाऱ्या सागरापर्यंत, किडे, मुंगी, पशू, पक्षी काय नव्हतं या उपखंडात. पृथ्वीवरच्या भौगोलिक वैविध्याचे लघुरूपच जणू ! सुजलाम सुफलाम मध्ये राहणारी संस्कृती सुद्धा अशीच बहुरंगी बहुढंगी. कित्ती प्रकारचे वेष, केवढ्या भाषा, खाण्या पिण्याच्या केवढ्या पद्धती. नंदनवनच म्हणायचं की याला ! अशा रंगाढंगात वावरणारी इथली माणसं बुद्धिमान, लवचिक आणि श्रद्धाळू होती. अध्यात्म, कला, तत्वज्ञान, भाषा आणि उपचारपद्धती या पाच अदृश्य धाग्यांनी इथल्या माणसांभोवतीचे कोष घट्ट विणले गेल्यामुळे ती त्यात अत्यंत सुरक्षित होती. बाहेर कितीही आक्रस्ताळेपणा झाला तरी मनाचा गाभा शाबूत राही. मनात उमललेली स्वप्न पंचमहाभूतांवर स्वार होत आणि ज्ञानाची कवाडे सताड उघडी होऊन नाद, स्पर्श, रूप, गंध आणि रसनेची अलौकिक आभूषणे समाजात मूर्त रूपात प्रकट व्हायची. बुद्धिमत्तेचा पिवळा, चैतन्याचा हिरवा आणि भक्तीच्या भगव्या रंगातून फाकलेल्या सुवर्णप्रभेने या अवघ्या उपखंडाला सुवर्ण भूमी केले होते. पुनर्जन्मावर प्रगाढ विश्वास आणि  मोक्षसाधना हेच आयुष्याचे अंतिम ध्येय अशा मुशीतून घडलेल्या इथल्या लोकमानसाच्या सावल्या स्थिरता आणि दैववादाच्या अद्भुत मिलाफातून बनल्या होत्या. समाजरचनेतल्या आपल्या आपल्या पायऱ्यांचा मनापासून स्वीकार करून त्यात आयुष्याची सार्थकता शोधणे यात इतर सर्व लोकांप्रमाणेच तिथली कलाकार मंडळीही सहभागी होती. राजाश्रयातील स्निग्धता, स्वप्रतिभेच्या सुगंधाची उमज आणि कला निर्मितीतून मोक्षसाधनेचे ध्येय हेच त्यांचे भाव विश्व होते. एकाच कला प्रकाराचा ढोल बडवण्यापेक्षा बहुपदरी कलाज्ञानातून आलेली समृद्धता शिल्प, प्रासादे, मंदिरे यातून ओसंडून वाहत होती. समाजातील या सौख्याचे समाधान लोकोत्सवात गाणाऱ्या, वाजवणाऱ्या तुर्यवादकाच्या आनंदी चेहऱ्यांवर स्वच्छपणे दिसून येई. अवकाश तत्वाशी नाते सांगणारी नादविद्या आणि स्थापत्य कला यांचा सूक्ष्म अभ्यास करून नर्तकी राणीच्या रंगमंडपात शेकड्याने उभे असलेले वाद्यनादाचे स्तंभ तिच्या संगतीसाठी कोरण्याची किमया करणाऱ्या किमयागार कलाकारांनी पुढच्या अनेक पिढ्यांसाठी हा वारसा ठेवला होता. आपल्या प्रज्ञेच्या जोरावर संगीतासारख्या अलवार कलेला शिल्परूपात गोठवून ठेवण्याची किमया त्यांनी साधली होती.     या अशा विस्मय चकित करणाऱ्या कलाकृतींचे पडसाद नंतरच्या अनेक पिढ्यांना एकाचवेळी अंतर्मुख आणि बहिर्मुख करून जात होती.
परंतु काळाची चक्रे फिरली. सुजलाम सुफलाम स्वप्नभूमीला ग्रहण लागले. सुवर्णमृगाच्या सुगंधाने वेडावलेले याचक या भूमीचे दार ठोठावू लागले. अतिथीच्या रूपाने आलेल्या काळाने, दिलेल्या ओसरीचा अपमान करीत घराचा ताबा मिळवला. ज्या घराची दारे उघडली नाहीत, ती दारे फोडून तिथली समृद्धता लुटून नेण्याचा उद्दामपणा देखील करण्याचे त्यांनी सोडले नाही. इतके दिवस लुटुपुटुच्या लढायांची सवय असलेल्या या सुवर्णभूमीतल्या लोकांच्या मनाच्या गाभ्यालाच जेव्हा धक्का बसला तेव्हा सारा उपखंडच थिजून गेला. जगण्याचा जीवनरस असणारे दृश्य अदृश्य धागे तुटू लागले आणि सारा समाज सैरभैर झाला. हे सारे हतबद्धपणे पाहत असलेल्या कलाकाराला प्राणापलीकडे जपलेल्या कलेची विटंबना सहन करणे जेव्हा शक्य झाले नाही, तेव्हा त्याने कलेला सती चढवले. आपले प्रज्ञाचक्षु बंद करून टाकले आणि राजाश्रयाची स्निग्धता हरपल्याने मोक्षमार्ग स्वतःसाठी आणि इतरांसाठीही नाकारला. इतिहासाला एवढी जबर शिक्षा कुठल्याच काळात मिळाली नव्हती. ऐहिक श्रीमंतीचा पुरेपूर उपभोग घेणाऱ्या याचकाला या भूमीच्या कलेतली समृद्धी कळलीच नाही. इथल्या मनांचा धागाच उलगडला नाही. पुढच्या काळात सत्ताधीशांनी मग आपल्या पद्धतीने ही समृद्धी विलासितेत परिवर्तीत केली. आता गर्भरेशमी वस्त्रातल्या मखमली तेजापेक्षा चटकदार चमकेचा भाव जास्त वधारला होता. लोकोत्सवातले तुर्यवादक अस्वस्थ झाले होते तर किमयागार कलाकारांची प्रतिभा निस्तेज झाली होती. संभ्रमातून आलेल्या निष्क्रियतेचा अंमल साऱ्या समाजावर चढू लागला. स्त्रियांचा मुक्तपणा बंदिस्त झाला. पारंपारिक ज्ञानाचे कंबरडे मोडले. कलाकार देशोधडीला लागले आणि समाज जीवनाची घडी विस्कटली. जसे जसे समाजाला हीनत्व स्वीकारण्यात धन्यता वाटू लागली तसा तसा या सुवर्णभूमिच्या समृद्धतेभोवती फास आवळला गेला................
न जाणे कितीक पिढ्या तशाच गेल्या. आता इथल्या माणसांभोवती असलेल्या कोषाचे धागे विदीर्ण होऊन त्यांची मनं कधीच उघड्यावर आली आहेत. समृद्धतेच्या कलेवरावर देखील आता खरेदी विक्रीचे ठोक व्यवहार या सुजलाम सुफलाम देशात होतात. स्थिर चित्ताच्या निढळ मनाला आता शोधावे लागते. भिरभिरणाऱ्या डोळ्यांनी स्वीकारलेली तडजोड राजरोस झाली आहे. प्रज्ञा आणि समाधानाचा आस्वाद घेणाऱ्या हाडामांसाचे कलाकार दुर्मिळ झाल्यामुळे वीजेवर चालणारी रसहीन वाद्ययंत्र मानवी आनंदाची  रोबोटिक अभिव्यक्ती बनली आहे. जगण्यासाठी काम न करता कामासाठी जगणाऱ्या यंत्रमानवी कलाकारांची फौज ही सध्या इथली कथा आणि व्यथाही. सामुहिक प्रतिभांचा वापर तेव्हाही होता आजही आहे. फरक पडला तो स्वप्नांमध्ये ! 

आज रणरणत्या उन्हात कालच्या समृद्ध अवशेषांचे शिल्पस्वर ऐकताना आणि त्याच वेळी वास्तवातला गोंगाट पाहताना मन काहूरले. त्याच मातीत जगलेल्या आणि जगणाऱ्या दोन वेगळ्या जगांचा महासेतू बांधताना माझी दमछाक झाली. कलाकाराची भावुकता आणि नियतीची तटस्थता यांचे द्वंद्व बघताना बेचैन झाले. अनुपम अशा कलाभूमीत अजूनही एखादा चैतन्यमयी स्वर कोणीतरी गाईल या आशेने, ही शोधयात्रा थोडी थांबवून पुन्हा सुरु करण्याच्या मानसाने मी परत फिरले.  
   

Thursday, April 6, 2017

शोध एका जिप्सी स्वराचा ..........




                              
                                
शोध एका जिप्सी स्वराचा ..........
                                                    अंजली मालकर


भारतीय संगीताच्या निरंतर प्रवाहात असे काही कलाकार होतात जे ‘मार्गी’ असतात. नवीन मार्गाचा शोध घेत, प्रचलित क्षितिजे विस्तारण्याचे काम करतात. संगीताच्या स्वर,लय,शब्द या मूळ घटकांकडे पुन्हा नव्याने पहात एका अर्थाने परंपरेचा वसा पुढे चालवत असतात. किशोरी आमोणकर हे या मार्गी कलाकारांमधले ठळक नाव होते. माझ्यापुरते बोलायचे तर ‘किशोरीताई’ या fatal attraction चा शोध अपूर्ण राहणार याची चुटपूट मनात कायमची राहणार असे वाटून गेले. त्यांच्या स्मरणरंजनात राहताना आठवले ते पोथीनिष्ठ तरुण मनावर पडलेले भूप, बागेश्री आणि जौनपुरीचे आव्हानात्मक ठसे. त्या अबोध वयातही ‘बाजे झनन’ मधला आवेग स्पर्शून गेला होता. ‘छननन बिछुवा’ मधला खनकदारपणा त्यावेळी भलताच आवडून गेला होता. गाणे शोधण्याच्या प्रवासात मला किशोरीताई नावाचे वादळ कळत्या वयातच भेटले. अनेक थोरामोठ्यांच्या उंचावलेल्या भुवया, तटस्थ आवाज झेलीत छातीठोकपणे उभे ठाकलेले वादळ ! चौकटीतले प्रश्न सोडवण्यात गुंतले  असल्यामुळे, या चौकटीबाहेरच्या प्रश्नाला तेव्हा वैकल्पिक म्हणून सोडून दिले होते. आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात त्याच्याकडे पाहता येईल म्हणून त्यांच्या विचारांना तेव्हा बाजूला ठेवले होते. पण या विचारांनी परत परत धडका देऊन, असे फार काळ बाजूला ठेवता येणार नाही अशी तंबीच मला तेव्हा दिली होती. शास्त्राला वाकवत, कधी झुगारत, तर कधी कधी त्याच्याशी दोन हात करत, त्याचेच तत्व त्याच्या गळ्यात टाकण्याचा ताईंचा बेधडकपणा समजून घेण्याची माझ्या कलामनाची कुवत एकीकडे वाढवत असताना दुसरीकडे स्वतःच्या अनुभवाशी एकनिष्ठ राहून तर्क आणि विवेकाचा काटा तोलत होते.....

वेळ सकाळची. टिळकस्मारक मध्ये किशोरीताई गाणार होत्या. हॉल संपूर्ण भरलेला होता. सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. टाळ्यांच्या कडकडाटात ताई स्वरमंचावर बसल्या. त्यांनी हातात स्वरमंडळ घेतले, डोळे मिटले आणि तोडीच्या स्वरांनी रंग भरायला सुरुवात केली. बराच वेळ षड्जाभोवती घुटमळत त्यांनी कोमल रिषभ लावला, आणि रसिकांची कुजबुज सुरु झाली. माझ्या शेजारच्याने त्वरित कोमल रिषभ ‘चढा’ लागलाय असा निर्वाळा देऊन टाकला. माझ्या तोपर्यंतच्या स्वरानुभावानुसार तो रिषभ चढाचहोता. त्या दिवशी ताईंनी संपूर्ण मैफल त्या ‘चढ्या’ रिषभाने रंगवली. कार्यक्रम संपल्यावर मी विचार करू लागले तर जाणवले ते संपूर्ण रागभर राखलेले ‘चढा’ रिषभाचे स्थान, त्याला वापरून केलेल्या विलक्षण स्वरसंगती आणि गवताच्या पात्यासारखे लवलवित स्वर ! तो राग त्यादिवशी माझ्या डोळ्यात अंजन घालून गेला. त्या कार्यक्रमानंतर त्यांचा तोडी अनेकवेळा ऐकायला मिळाला. पण त्या दिवशीच्या तोडीने कला, कलाकार आणि परंपरा यावर जे भाष्य केले, त्याने माझी रागरसास्वादाची अनेक कवाडे उघडली. संगीतासारख्या श्राव्य कलापरंपरा कालप्रवाहात वाहताना एखाद्या महानदी सारख्या आपला प्रवाह बदलता ठेवत असतात. त्यात रागातल्या स्वरांच्या श्रुतींचे थांबेदेखील काळाच्या प्रवाहात बदलतात. काल ज्या श्रुतीचा थांबा स्वर झाला असतो, तो कदाचित आज नसतो. उद्या अजून वेगळाच असू शकेल. इतक्या सूक्ष्म पातळीवर चाललेल्या श्रुतींच्या भरती, ओहोटीवर आपली हुकुमत ठेवणे अशक्यच ! त्यामुळे त्याक्षणी कलाकाराच्या सृजनपटलावर स्वराची कुठली ‘कला’ उमटेल आणि ती ‘कला’ घेऊन तो कलाकार रागाच्या किती कॅलिडीओस्कोपिक सौंदर्याकृती निर्माण करून त्याचे भावबंध रसिकांपर्यंत पोहोचवतो हीच त्याची कामगिरी !

जन्माच्या आधीपासून गाण्यात बुडालेल्या किशोरीताईंना त्यांच्या घराण्याच्या पारंपारिक ज्ञानाचे आकलन खूप लवकर झाले. घरातून मिळालेली गाण्याची सौंदर्य खाण आणि त्याच्याविषयी बाहेरच्या जगात असलेली उदासीनता, अज्ञान यातून त्यांच्यातला कलाकार डिवचला गेला असावा आणि जे हाती घेईन ते सुंदर करून ठेवीन या मनस्वी आवेगाने त्यांनी मुळातून काम सुरु केले. एखाद्या शास्त्रज्ञाप्रमाणे गायन परंपरांचे पुनरावलोकन त्या करू लागल्या. भरताच्या नाट्यशास्त्रापासून जगन्नाथ पंडिताच्या रसगंगाधरापर्यंत अनेक रसशास्त्र, नाट्य, काव्य ग्रंथांचे वाचन मनन, चिंतन करण्याच्या ओघात संगीतातील प्राणघटक ‘स्वर’ याचे दर्शन त्यांना घडले. स्वयंप्रकाशी उर्जा जेव्हा कंठातून उमलते, तेव्हा तिचा असर स्वतःसह सर्वांना आपल्याकडे ओढून नेतो याची जाणीव किशोरीताईंना याच दरम्यान झाली असणार. त्यानंतर त्या असराचा शोध घेण्यासाठी त्यांचे मन जिप्सी झाले. त्याच्या शोधात व्याकूळ झाले. ही विरहदग्धता जेव्हा स्वररूपाने प्रस्फुटीत झाली, तेव्हा रागरूपाची मानवी बंधने गळून पडली. कधी ती झुगारली देखील गेली ! हा स्वरकृष्ण एकांतात भेटू शकतो असे वाटल्यामुळे चिंतन, मनननाने एकांतिक झालेल्या किशोरीताई अधिकाधिक आपल्याआपल्यात राहू लागल्या. ‘भेटी लागी जीवा लागलीसी आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी’ अशी अवस्था त्यांची झाली असणार. एकीकडे या स्वयंप्रकाशी उर्जेचे गुपित रसिकांना सांगण्याची तळमळ, तर दुसरीकडे ती निसटून जाईल म्हणून जगाला पाठ करून त्याच्या मागे धावण्याचा आवेग, अशा द्वंद्वात सापडलेले त्यांचे कलामन मला त्यांच्या कलाविचाराचा मागोवा घेताना दिसू लागले. अर्जुनाला बाण मारताना झाडावरल्या पक्षाचा फक्त डोळाच जसा दिसत होता, त्याप्रमाणे किशोरीताईंना केवळ ‘स्वरत्व’ दिसू लागले होते. स्वरातली लय, शब्दातील स्वरत्व, त्याची व्याप्ती, स्वरभाव, त्याचा प्रभाव यांच्या अस्पष्ट जाणीव त्यांना अस्वस्थ करू लागल्या. त्या ‘स्वराला’ सखा बनवण्यासाठी धडपडत होत्या. त्यामुळे व्यावहारिक जगातले विसंगत आयुष्य त्या जगत असतानाही या विसंगतीकडे डोळेझाक करून त्यांच्या स्वरामृताला प्राशन करण्यास उत्सुक असलेला रसिकवर्ग सदोदित त्यांच्या मैफलीला हजर असायचा. स्वरसख्याबरोबर राहताना त्यांचा स्वरभाव कधी आरक्त राधेचा होई तर कधी विरागी मीरेचा ! त्यांचे गाणे मानवीय होते. मनुष्याच्या अनंत रंगात रंगलेले त्यांचे स्वर त्यांच्या जीवनदर्शनाचा मोठा भाग व्यापून होते.

सृजनशील कलाकार ही मोठी बेटं असतात. किनाऱ्यावर उभे असणाऱ्या लोकांना ती स्वतःकडे खेचून घेतात. त्यांच्यावरील सौंदर्यशोभा पाहणाऱ्याला नेत्रसुख आणि चित्तशांती देतात. पण जर त्या बेटाच्या जवळ गेलात तर तुमचे स्वागतच होईल असे नाही. ते जरी अंगाखांद्यावर वृक्ष, वेली, झुडुपं खेळवत असली तरी एका क्षणी ते बेट कोणाचेच नसते. ते केवळ स्वतःचेच असते. त्याची सुखदुःख त्याचीच असतात. ती इतर कोणाची नसतात, होऊ शकत नाहीत. किशोरीताई देखील अशाच एक बेट होत्या. जगात असताना रागांचे रागत्व स्वरांमधून शोधत त्या फिरल्या. आता उरलेला शोध त्या दुसऱ्या जगाच्या  मैफलीत घेतील. दात्याने दिलेला प्रत्येक श्वास त्यांनी स्वरध्यासासाठी खर्च करून त्यांच्या जीवनाची मैफिल रंगवली. आता त्या आयुष्याच्या प्रबंधाचा आभोग पूर्ण करून संगीताच्या आकाशात ‘ध्रुव’ झाल्या आहेत. या धृवाकडे बघून आता मागून येणाऱ्या वाटसरूंना पुढची वाट दिसेल. 





Tuesday, March 7, 2017

शुद्धकल्याणच्या निमित्ताने




             शुद्धकल्याणच्या निमित्ताने .......

                                    अंजली मालकर


कलेचे प्रवाहित्व हे तिच्या जिवंतपणाचे लक्षण मानले गेले आहे. शतकानुशतकाच्या वाहण्यात त्यातल्या काही गोष्टी बदलतात, काही पुढे प्रवाहित होतात. संगीतकला विशेषतः भारतीय शास्त्रीय संगीतासारख्या कलेमध्ये, ज्यात पारंपारिक कला सौंदर्याची गृहीतके असोशीने सांभाळली जातात, नव्हे मिरवली जातात, त्यात बदलाचा स्वीकार जरा उशीराच होतो. काळाच्या प्रवाहात रागरूपे बदलतात, प्रस्तुतीकरण बदलतात, कधी कधी कलेची उद्दिष्टे देखील थोड्याफार फरकाने बदलतात. पण सूर लयीची चिरंतन मुल्ये अबाधित रहातात, रहात आली आहेत. सूर लयीशी एकरूपत्व हे पूर्वीसुद्धा आणि आजही कलेचे सर्वश्रेष्ठ ध्येय मानले गेले आहे. परवा कृष्णाजी गाडगीळ स्मृती सभेत पं. विकास कशाळकर यांनी गायलेला शुद्धकल्याण अशीच चिरंतन संगीतमुल्ये दाखवून गेला.
कशाळकर सर माझे गुरु. एखाद्या शिष्याने गुरूविषयी काय बोलावे? जवळच्या माणसाविषयी बोलणे खरंतर अवघडच नव्हे अशक्यच असते. सरांच्या या आधी अनेक मैफली मी ऐकल्या आहेत. तरीपण गुरूच्या गायनाचे परिपक्व दर्शन आणि शिष्याच्या संगीत आकलनाचा परिपक्व टप्पा म्हणून या सभेतल्या शुद्धकल्याणाकडे  मला पहावेसे वाटले. त्यांनी गायलेल्या शुद्धकल्याणने शास्त्रीय संगीतातील मला माहित असलेल्या काही पारंपारिक मूल्यांना प्रश्न विचारले. मैफिल मारणारे गवयी म्हणून सरांचा लौकिक नाही, पण शास्त्रशुद्ध, प्रयोगशील, अभ्यासू कलाकार म्हणून शास्त्रीय संगीत क्षेत्रात त्यांचे नाव आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या गायनाने माझ्या संगीत चिंतनाला परत मुळाकडे नेले.
शास्त्रीय संगीतात घराणेदार गायनासाठी भरदार, पल्लेदार आवाजच लागतो, नाहीतर ते सुगम संगीत होते या माझ्या पहिल्या गृहितकाला त्यांनी छेद दिला. सरांचा आवाज पातळ आणि मर्यादित पल्ल्याचा. पण जेव्हा या गृहितकाला बाजूला सारून त्यांच्या आवाजात डोकावले तर जाणवली ती आवाजाची पारदर्शक, हलक्या जवारीची नाजूक स्थिरता ! साबणाच्या पाण्याचा मोठा बुडबुडा अलगद हातावर स्थिरावावा इतका अलवारपणा. मग मी अजून आत शिरले, तेव्हा दिसले सौम्य, मधुर विशुद्ध सूर ! एरवी अनेकवेळा आपला मुद्दा पटवण्याच्या नादात स्वरांवर अवाजवी दाब दिला जातो, विनाकारण आवाज मोठा होतो. अहंकाराची छोटी खेळीच असते ती. पण इथे जाणवला तो सुरेल तंबोऱ्याला समर्पित सहज सूर. शुद्धकल्याण मध्ये षड्जावरून धैवताकडे जाताना लागणारा निषाद, आणि पंचमाकडून गांधाराकडे जाताना लागणारा तीव्र मध्यम, पक्ष्याने वरच्या फांदीवरून खालच्या फांदीवर  बसताना हलकेच उतरावे असा होता. ते उतरणे इतके हलके, की मला वाटले हा स्वरपक्षी फांदी चुकणार. बसताना देखील कुठे धडपड नाही, अंदाज चुकण्याचा संदेह नाही. त्या अलगदपणाने शास्त्रीय संगीतातील माझ्या ठोसपणाच्या गृहितकाला दुसरा धक्का दिला. शुद्धकल्याणची ही सात्विक सुंदर शीतल आभा, पूर्णचंद्रासारखी मैफिल भर पसरली होती. तिलवाड्याचा ठेका सुरु झाल्यावर स्वरलयीचे नक्षीकाम सुरु झाले. रागवाक्य छोटी होती, पण फेड आउट आणि फेड इन मुळे ती तंबोऱ्यात मिसळून त्यांना दिर्घत्व मिळत होते. लहान श्वासात इतकं सहजपणे मांडणे, ते ही कुठलीही ओढाताण स्वतःला आणि इतरांना न जाणवता, म्हणजे मनाच्या स्थैर्याची केवढी मशागत असणार ! गाताना सर दोन रागवाक्यांमध्ये अवकाश ठेवत होते. कधी एका मात्रेचा तर कधी दोन मात्रेचा अवकाश. एक वाक्य संपल्यावर दुसरे वाक्य टाकायच्या मधला अवकाश असा काही तोलत होते की जसं काही अवकाश पेरत त्यांची आवर्तनाची कशिदाकारी चालली आहे. तंबोऱ्याला लगडलेले शुद्धकल्याणचे सूर आणि लयीला बिलगलेल्या रागवाक्याने सगळेच जण ‘प्रवाहपतित’ झाले होते.
शब्द, हे शास्त्रीय संगीतात स्वर टांगायच्या खुंट्या आहेत किंवा अडगळ असतात अशी धारणा असणारे बरेच गायक आहेत. माझी अशी धारणा नसली तरी शास्त्रीय संगीत हे सुराधीष्ठितत संगीत असल्यामुळे शब्दांवर विशेष मेहनत घ्यायची गरज नसते या गृहितकाला देखील शुद्धकल्याणने छेद दिला. व्यंजनांच्या शेवटी येणाऱ्या आकार, इकार, उकार आणि मकार यांना श्वासाच्या नियंत्रित दाबाने फुलवले तर त्यांची प्रभा किती उल्हासित करू शकते याची प्रचीती सरांच्या शुदकल्याणने तेव्हा दिली. कधी इकाराच्या चपटेपणाला धारदार करीत, कधी उकारात स्वरांची भेंडोळी सोडत, ‘न’ कारात नाकाचा संयमित वापर करीत त्यांनी या अमूर्त नादाकृती अधिक व्यापक आणि अर्थपूर्ण केल्या. एका लयीत धावणाऱ्या घोडागाडीत बसल्यावर जी एकतानता जाणवते, ती, सरांच्या बोलताना आणि ताना ऐकताना तिथे जमलेल्या श्रोत्यांना लागली होती. मधाळ आलापी नंतर सुखावह वाटेल इतकाच जोर देत गमक आणि आघातांच्या तानलडी बरसत होत्या. अनेकवेळेला अवाजवी पुरुषी आक्रमकता दाखवण्यासाठी अंगावर धावून येणाऱ्या किंवा डोक्याला मुंग्या येतील इतक्या खाली वर ताना घेणाऱ्या अनेक गायकांच्या तुलनेत या ताना अंगभर मोरपीस फिरवून गेल्या. माझ्या मनाची तृप्ती झाल्यामुळे माझ्यासाठी ही मैफल इथेच संपली होती. खरतर कुठल्याही मैफिलीचे यश हे केवळ कलाकारच नाही तर रसिकांवर देखील अवलंबून असते. भिंग लावून चुका काढण्यापेक्षा, रसिकांचे मनाचे औदार्य, सहिष्णुता कलाकाराची कला आणि कलाकार या दोघांना वेगळ्या उंचीवर नेते. याचाही अनुभव या मैफिलीच्या निमित्ताने आला. मोठमोठ्या समारोहामध्ये भिरभिरणाऱ्या डोळ्यांनी श्रोत्यांना न बघता छोट्या बैठकांमध्ये रसिकांच्या नजरेला नजर देऊन पावती मिळवणाऱ्या मैफिलींची रंगत या सभेत  शुद्धकल्याणने आणली. गाणं कुठल्या घराण्याचे होते, किती कौशल्यपूर्ण होते, शास्त्रीय कसोट्यामध्ये किती बरोबर होते, यापेक्षा विचारांचा एकजिनसीपणा, कल्पकता यातून निर्माण होणारा प्रवाह या रागाने मला दाखवला. त्यातील मानवीयता मला अधिक व्यापक आणि उदार बनवून गेली. प्रवाहात गाण्याचे आणि जीवनाचे देखील सार दडले आहे, या शाश्वत मूल्याची या निमित्ताने पुन्हा एकदा आठवण हा शुद्धकल्याण देऊन गेला.


Sunday, August 28, 2016

अमीर खुस्रो – तुती – ए - हिंद




          अमीर खुस्रो – तुती – ए - हिंद 


                                                           अंजली मालकर 
                                                                            anjali.malkar@gmail.com


“गर फिरदौस बा-रौ-ए-जमीन अस्त हमी अस्त उ हमी अस्त उ हमी अस्त”. 

धरती पर अगर कही स्वर्ग है, तो यही है, यही है, यही है. कश्मीर विषयी बादशाह जहांगीर यांनी काढलेले हे उद्गार लाल किल्ल्याच्या साउंड अॅण्ड लाईट शो मधून ऐकायला आता जवळपास पस्तीस वर्षे झाली असतील. काय भारी वाटलं होते ते ऐकताना ! आई राष्ट्रसेवादलातली आणि वडील सैन्यामध्ये डॉक्टर, शिवाय त्यावेळचे दहा/ बारा वर्षाचे भाबडे वय, अक्षरशः रोमांच उभे राहिले होते. आजही त्याचे ठसे मनामध्ये तसेच कोरले गेले आहेत. नंतर शाळा संपेपर्यंत ‘ जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा’ हे कुठल्याशा सिनेमातले गाणे मला मिळणाऱ्या फरमाईशीमध्ये नंबर वन असायचे. असे हे देशप्रेमाने ओतप्रोत बालपण गेल्यानंतर तरुणपणी भारतीय संगीत नावाच्या विषयाच्या जे प्रेमात पडले ते आजतागायत ! त्यातून बाहेर यायची संधी मला मिळाली नाही, मी घेतली पण नाही. या विषयाला उलट सुलट, आतून, बाहेरून, सर्वांगाने तपासताना मी त्यात अधिकाधिक गुंतत गेले. त्याच्या संबंधी असणाऱ्या प्रश्नांच्या ओझ्यांनी माझ्या मनाची टोपली भरून जायची आणि ती रिकामी करण्यासाठी कधी पुस्तके, कधी जुनी रेकोर्डिंग्ज, तर कधी बुजुर्ग मंडळींची मदत मला व्हायची. जरा रिकामी झाली की परत प्रश्नांचे ढीग तयारच असायचे. अगदी डबा-ऐस-पैस खेळासारखे ! एकाला बाद करून डब्यापाशी आले की दुसरा लपलेला दिसायचा. तो बाद झाला की तिसरा ! हा खेळ मी बराच काळ खेळल्यावर माझ्या नजरेत एका गड्याचे नाव वारंवार येऊ लागले. स्वतःला ‘तूति-ए-हिंद’ म्हणजे हिंदुस्तानाचा पोपट असं म्हणवून घेणारा हा गडी होता अमीर खुस्रो.१३व्या शतकात दिल्लीच्या खिलजी सल्तनतीत, अल्लाउद्दिन खिलजीच्या पदरी राजकवी म्हणून असलेला हा महत्वाचा माणूस. सुरुवातीला मी त्याच्याकडे दुर्लक्षच केले. म्हटलं असेल कोणी एक, राजाच्या पुढे पुढे करून, ज्या त्या गायन प्रकाराचे, नवराग निर्मितीचे, नवताल निर्मितीचे, नवीन वाद्य निर्मितीचे श्रेय स्वतः कडे घेणारा प्रसिद्ध लोलुप कवी ! पण जेव्हा त्याला ओलांडून पुढे जाता येईना, तेव्हा तोच माझ्या पुढे येऊन उभा राहिला. माझ्या नजरेतली दूरस्थता पाहून दुखावलेल्या स्वरात म्हणाला “का एवढा दुरावा”. त्याच्याकडे एक धारदार कटाक्ष टाकला. “संगीतातल्या सगळ्याच नवनिर्मिती तुझ्या नावाने कशा ?” माझ्या स्वरातून बऱ्याच दिवसांपासून साठलेला फणकारा क्षणात बाहेर पडला. तो हसला. म्हणाला, “चल माझ्याबरोबर, तुला नेतो माझ्या काळात”. मग माझ्या परवानगीची वाटही न बघता त्याने मला ओढतच नेले. मी त्याच्याबरोबर तेराव्या शतकात गेले. कुतुबमिनार दिसल्यावर तो जरा थांबला, म्हणाला “बघ आता काय परिस्थिती आहे ती.” खरतर त्याने मला अशा प्रकारे इकडे आणलेले आवडले नव्हते. तरीसुद्धा कुतूहल म्हणून मी दिल्लीचा परिसर पाहू लागले. जलालुद्दीनची सत्ता संपून अल्लाउद्दिन खिलजीची सत्ता होती तिथे. आधीच्या गजनवी, घोरीच्या स्वाऱ्यांनी होरपळलेली रयत, इल्तुमशच्या आक्रमणांनी भयभीत होऊन आता खिलजी राजवटीत जुलूम सहन करत अर्धमेली झाली होती. तुर्की संस्कृतीचे वर्चस्व जागोजागी दिसत होते. शासनातले सर्व अधिकारी तुर्की होते. राजसत्ता तुर्कांकडे असल्यामुळे, हिंदवी संस्कृती जणू राजपटलावरून पुसून गेली होती. तिथे राहणाऱ्या अनेक सामान्य लोकांनी ‘जान है, तो जहान है’ असे म्हणत निमूटपणे धर्मांतर स्वीकारले होते. अशा लोकांना दुय्यम किंवा तिय्यम दर्जाचे अधिकार मिळाले होते. अमीर, मलिकच्या उच्च पदांवर असलेले राजघराण्यांचे लोक, धर्मांतरितच नव्हे, तर इतर वंशांच्या प्रतिष्ठित लोकांपासून देखील फटकून राहत होते. तुर्की, फारसी,आणि अरबी काव्य संगीतात अखंड बुडालेला उच्च वर्ग, धर्मांतरित होऊन आपली प्रतिष्ठा कशीबशी सांभाळणारा हिंदुस्तानी मध्यमवर्ग, आणि सावकारी, कर्जबाजाराने परेशान, वेठबिगार गरीब वर्ग, समाजाचे असे तीन स्तर मला स्पष्टपणे दिसत होते. “पाहिलंस, किती भीषण परिस्थिती आहे ती. माझे वडील देखील मंगोलांच्या आक्रमणाने भिऊन तुर्कस्तानातून इथे पळून आले. सुलतान बल्बनने आसरा दिला म्हणून बरं झालं. हिंदुस्तानी धर्मांतरित मुलीशी माझ्या वडिलांनी शादी केली म्हणून मी नशीबवान समजतो स्वतःला ! आजोळचे हिंदुस्तानी संस्कार आणि तुर्की नस्ल (वंश) या दोन्ही गोष्टीनी मला काव्य, संगीताचा, संस्कार आणि मलिक, अमीरांचा सहवास या दोन्हीचे फायदे मिळवून दिले”. अमीर खुसरोच्या बोलण्याचा अर्थ मला आता थोडाफार कळू लागला होता. रागही थोडा कमी झाला होता.”अग ! अशा परिस्थितीत हिंदुस्तानी संगीताचे हाल कोणी कुत्र तरी खात होते का? मंदिरं नष्ट झाल्यामुळे ‘इल्म’ (ज्ञान) असलेले संगीत विद्वान दक्षिणेकडे पळून गेले नाहीतर अज्ञातवासात गेले. राजसत्तेमधून हिंदुस्तानी संस्कृती हद्दपार झाल्यामुळे आलीम (ज्ञानी) गायक, जाणते कलाकार, दरबार पर्यंत येणे शक्यच नव्हते”. त्याची बडबड चालूच होती. आता त्याला माझा देखील विसर पडला होता. एका वेगळ्याच मनस्थितीत तो स्वतःशीच बोलत होता. मला आता परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येऊ लागले होते. “तुला जर एवढे सगळे सोयीचे होते आणि एक नव्हे, तर तीन/तीन राजसत्तेतल्या सात सुलतानांचा प्रतिष्ठित कवी म्हणून मान होता तर कशाला केला हा खटाटोप”. माझ्या स्वरात अजूनही धार होती. त्या टोकदार शब्दांनी त्याची तंद्री भंगली. “हं, खटाटोप ! खरंच का केला बर मी? अग आजोळच्या हिंदुस्तानी वातावरणात वाढलोय मी. ऋतुगीते, सोहळे, सणवारात म्हटली जाणारी अनेक गीते मला नादावून टाकायची. काव्याची गोडी मला लहानपणापासूनच होती. एकीकडे मुशायरे, दरबारी रिवायत (रीत) यातून फारसी, अरबीमधले काव्य आणि संगीताचे भरपूर इल्म मिळत होते, पण समाधान नव्हते. तर दुसरीकडे हिंदुस्तानी संगीत माझी रूह (आत्मा) जाळत होती, मला घायाळ करत होती, पण त्याचे इल्म देणारा कोणी आलीम मिळत नव्हता. मला हिंदुस्तानी असण्याचा नाज (अभिमान) होता. सर्व जगात भारतीय संगीत सर्वश्रेष्ठ आहे हे मला उमजलं होतं, पण कळणार कसे ? मी इल्मदोस्ती पसंद कवी आहे. नुसत्या वाहवाहीवर भाळणारा नाही”. त्याच्या बोलण्यात तळमळ होती, सच्चाई होती. मी त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकू लागले. “मग मला सुकून (शांती) मिळाला तो माझे पीर (गुरु) औलिया निजामुद्दीन चिश्तीच्या सहवासात. मी त्यांचा मुरीद (शिष्य) झालो”. माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्नार्थक भाव बघून त्याने हे अपेक्षित असल्याचे स्मित केले आणि तो सविस्तर सांगू लागला. “इस्लामचा प्रसार करण्यासाठी हिंदुस्तानात या सल्तनती यायच्या अगोदरच सुहारवर्दी, काद्री, चिश्ती असे अनेक सुफी पंथ आले होते. प्रेमातून अल्लाहला भेटणे म्हणजेच इश्क-ए-मिजाजी (भौतिक प्रेम) मधून इश्क-ए-हकीकी (अध्यात्मिक प्रेम) पर्यंत जाणे हे या संप्रदायांचे तत्व होते. त्यातही चिश्ती संप्रदाय हिंदुस्तानी मिजाजाच्या अधिक जवळ आला. दिक्र म्हणजेच जिक्र (नामस्मरण) ही या संप्रदायाची खासियत होती. मला हा संप्रदाय आवडला आणि त्यांच्या ‘समा’ (बैठक) मध्ये मी शरीक (सामील) झालो. तुला माहिती आहे, हजरत निजामुद्दीन औलिया यांना देखील हिंदुस्तानी मुसिकीमध्ये (संगीत) बेहद दिलचस्पी होती. औलिया यांनीच संगीताला, त्यातही हिंदुस्तानी संगीताला उत्तेजन दिल्यामुळे त्यांच्या दर्ग्यात आम लोकांची हीsss रांग लागायची. खरतर मौसिकी ही इस्लामला कुबूल नाही, पण औलिया यांच्या प्रेमळ स्वभावाला ‘मौसिकीच’ शोभून दिसली. आणि माझ्यासारख्या वेड्याला त्यांनी हेरून त्यांचा पट्टशिष्य बनवले यात नवल ते काय!”. आता अमीर खुस्रो रंगात आला होता. विषय भरकटत आहे असे वाटून मी त्याला मध्येच तोडत विचारले, “हे सगळं ठीक आहे. पण हिंदुस्तानी संगीताचे काय ?” माझे बोलणे पूर्ण न होऊ देत तो लगेच म्हणाला, “तेच तर सांगतोय, मला फारसी आणि अरबी संगीतातले चार उसूल आणि बारा परदे माहित होते. पण हिंदुस्तानी संगीताशी मी अजिबात वाकीफ (ओळख) नव्हतो”. मला लक्षात आले की ज्या काळात अमीर खुस्रो वावरत होता, तो हिंदुस्तानातल्या सांगीतिक कोलाहलाचा काळ होता. शारंगदेवाच्या संगीतरत्नाकरातल्या अनेक पद्धती कालबाह्य झाल्या होत्या. ७ स्वरांच्या साप्तकाची संकल्पना तर होती, पण मूर्च्छना पद्धतीतून रागांचा आविष्कार करताना बारा स्वरांचा वापर होत होता. च्युत पंचम, च्युत षड्ज अशा अवघड गोष्टी आत्मसात करायच्या म्हणजे केवढा अभ्यास लागत असणार! धैवताला षड्ज मानून त्याच्या मूर्च्छनेत एखादा सांगीतिक विचार मांडण्यासाठी शास्त्राची केवढी बैठक लागेल, आणि हे सगळं अध्यात्म या परदेशी लोकांना कसं कळणार? या पार्श्वभूमीवर, अमीर खुस्रोच्या हिंदुस्तानी संगीत जाणून घ्यायच्या धडपडीचे मला कौतुक वाटू लागले. “मग तू काय केलेस?” शांत झालेल्या माझ्या आवाजाने त्याला जरा बरं वाटलं. माझ्याकडे आत्मविश्वासाचा एक कटाक्ष टाकत तो पुढे म्हणू लागला “मग मी मजलीस (बैठक) भरवू लागलो. गजल, सोहेला, गीत, यांची रचना करून आजूबाजूच्या आमिल (नवशिक्या) गवयांकडून गाऊन घेऊ लागलो. तसे दरबारात सनाचंगी, फुतुहा, नुसरत खातून, मेहेर अफरोज सारखे गायक आणि वादक कलाकार होते, पण त्यांना हिंदुस्तानी संगीताचा इल्म नव्हता. एकदा काही आमील हिंदुस्तानी गवयांनी दक्खनच्या गोपाल नायकाचे नाव सांगितले”. गोपाल नायकाचे नाव ऐकताच माझी कळी खुलली. मी एकदम म्हटले, “ अरे गोपाल नायक तर हिंदुस्तानी संगीतातले फार मोठे नाव होते. देवगिरीच्या यादव साम्राज्याचे ते राजगायक होते. मोठे शिव भक्त होते ते!. प्रबंध गायकीचे मोठे अधिकारी होते. राग कदंबक्कम आणि कुडूक्क तालाच्या निर्मितीचे श्रेय त्यांच्या नावावर आहे. असे म्हणतात की ते गायला लागले की हरीण इत्यादी पशु आणि पक्षी त्यांच्याजवळ येऊन ऐकत बसायचे”. मी भडाभडा सगळी माहिती सांगून टाकली. अमीर खुस्रोने सुद्धा माझ्या होकारात होकार मिळवला आणि म्हणाला “तेच तर, बिना तीर कमानीने शिकार स्वतः शिकाऱ्याकडे शिकार बनून येण्याची बेहोशी याच मौसिकीत आहे, हे मला माहित होते आणि याचे इल्म फक्त गोपालनायक सांगू शकेल असे मला वाटले. म्हणून अल्लाउद्दिन खिलजीच्या एका फतेहमध्ये मी सेनापती मलिक काफुर बरोबर देवगिरीला गेलो. हजरत गोपाल नायक आणि त्याच्या मोठ्या शिष्य परिवाराला बाइज्जत दिल्लीला घेऊन आलो. अनेक दिवस त्याचे गायन ऐकले. माझ्या कुशाग्र बुद्धीने मी तसंच्या तसं गाऊ शकलो. दरबारात पैज जिंकली पण इल्म नाही हासिल करू शकलो. बहुतेक नायकांना मी त्या लायक वाटलो नाही”. अमीर खुस्रोची खिन्नता त्याच्या नजरेतून साफ दिसत होती. संगीताला पवित्र मानणाऱ्या हिंदुस्तानी कलाकारांची धारणा याला कशी कळणार! या रुहानी संगीतासाठी किती निर्मळता राखावी लागते, किती गोष्टींचा संयम राखावा लागतो ! हे याला जमले असते का ? मी मनात म्हटलं. पण पुढे काय झाले याची उत्सुकता मला स्वस्थ बसू देईना. माझी ही अवस्था ओळखून तो बोलू लागला, “पण मी हार मानली नाही. सगळ्या आवामला (लोकांना) या मुसिकीची जादू कळवणे हे जणू माझं मक्सदच बनलं होते. गोपाल नायकाने गायलेल्या प्रबंधांचा माझ्या कुवतीने अभ्यास करून मी इथल्या संगीतात तबदिली आणायचा प्रयत्न केला. हिंदुस्तानी संगीतातली क्लिष्टता कमी करण्यासाठी षड्ज, पंचम यांचे एकच रूप ठेवले. बाकीच्या स्वरांची देखील विकृत आणि शुद्ध असे दोनच रूप ठेवले. फारसी संगीतातील बारा परद्यांप्रमाणेच बारा स्वरांचे प्रमाणीकरण केले. त्यातून निर्माण होणाऱ्या रागांचे अरबी संगीत पद्धतीतील उसुले-मकाम पद्धतीत वर्गीकरण केले”. तो जसा जसा एकेक बदल सांगत होता तसे तसे मला सगळ्या श्रेयांची संगती लागू लागली. मी सहजच बोलून गेले, “अच्छा ! तर नवीन रागांची निर्मिती सुद्धा अशीच केलीस”. त्यावर तो पटकन म्हणाला,”हो तर ! याला निर्मिती असे तुम्ही म्हणता. मी आवाम आणि उमरांना एका धाग्यात जोडण्यासाठी हिंदुस्तानी मौसिकीत फारसी परद्यांची शिरकत (अंतर्भाव) केली. दोन्ही संगीताला एकमेकात मिसळले. म्हणजे बघ, तुम्ही गाता तो राग यमन घे. त्याला ऐमन देखील म्हणतात. हिंदुस्तानीतल्या हिंडोल रागामध्ये फारसीचा नौरोज मिसळला. झीलफ रागात हिंदुस्तानी पट आणि फारसी शहनाज मिसळला. फिरदोस्त तयार करताना कानडा,गौरी,पुरबी आणि फारसी अहंगचे मिश्रण केले. सर्परदा रागात गौड, बिलावल,सारंग आणि फारसी रास्तचे मिश्रण आहे. तसेच उश्शक, शहाना, साझगिरी, मोबर, फरगाना अशा अनेक रागांची रचना मी केली. हिंदुस्तानी संगीताला मुख्य प्रवाहात आणून त्याचा दरबारात मान वाढावा म्हणून केलेले प्रयत्न होते ते”. एकीकडे सरकार दरबारी फारसीचे महत्व आणि वर्चस्व मान्य करणे, आणि दुसरीकडे प्रेम मात्र हिंदुस्तानी तहजीबीवर करणे, ही तारेवरची कसरत तो कसा करत असेल याची पुरेपूर कल्पना मला आली. संगीताप्रमाणेच त्याचे काव्य निर्मितीच्या बाबतीत देखील तसेच धोरण दिसले. फारसी काव्याबरोबरच हिंदवी, ब्रज या हिंदुस्तानी भाषांमधून केलेले काव्य वर्गभेदाविषयी असणारी बंडखोरीच वाटली. त्याच्या ज्या काव्याने माझ्या मनात त्याच्या विषयी कुतूहल निर्माण झाले होते, ते फारसी काव्य डोळ्यासमोर आले.

छु मन तुती- ए- हिंद अर् रास्त पर्सी
झि मन हिंदवी परस्ता नघ्झ गोयं I 

स्वतःला हिंदुस्तानाचा पोपट म्हणवून घेताना केलेल्या बंडखोरीचे पारडे आणि त्याचे संतुलन राखण्यासाठी केलेल्या राजकीय तडजोडी दुसऱ्या बाजूने, असे स्पष्ट चित्र आता माझ्या समोर उभे राहिले. मनातल्या रागाची जागा आदराने घेतली. तरी पण माझ्या प्रश्नांचे पूर्ण उत्तर मिळाले नव्हते. मी अधीरतेने विचारले “ रागांचे समजले, पण तालांचे आणि गायन प्रकारां बद्दल काय ? आणि शिवाय तबला आणि सतार देखील तुझ्याच नावावर आहे की ....” मला मध्येच आडवत तो म्हणाला “अरे हो हो ! सांगतो ना थांब जरा. हे बघ मी आहे कवी माणूस. काव्य हा माझा मूळ पिंड. आता काव्य करताना वेगवेळ्या छंदांचा वापर ओघानेच होणार. त्यातून नवीन तालांची रचना घडली. उदाहरण म्हणून तो सुलफाक्ता तालच घे ना. त्याचे मूळ नाव उसुल–ए- फाक्ता आहे. फाक्ता म्हणजे कबुतर. कबुतराच्या दोन गुटूरण्यामधल्या अंतराचे मी निरीक्षण केले आणि त्याला एका आवर्तनात बांधले. झाला तुमचा १० मात्रांचा सुलफाक्ता, ज्याला तुम्ही आज सूल ताल म्हणता. अशा प्रकाराने फारसी काव्यातले अनेक बहर् (छंद) मी तालात तबदील केले. त्यातले पश्तो, जत, सवारी, फिर्दोस्त, छपक, खामसा झुमरा ताल पुढच्या काळातही टिकले. या शिवाय तू जर कौल, कल्बाना, नक्ष, गुल, कव्वाली, तराना,खयाल या गायन प्रकारांविषयी म्हणत असशील तर मी तुला परत तेच सांगेन की हे फारसी संगीतातले गायन प्रकार औलियाच्या ‘समा’ मध्ये गायले जातच होते. मी फक्त त्याचे हिंदुस्तानीकरण केले. ‘समा’ मध्ये ते जास्तीत जास्त गायले जावेत म्हणून त्यांच्या आकृतीबंधात सुधारणा केल्या, काही गायन प्रकारांमध्ये नवीन रचना केल्या. त्या खानकाहमध्ये गायल्या जाऊ लागल्या. लोकांना आवडू लागल्या. तुला सांगतो,की जेव्हा टाळ्यांच्या असराने बेहोष झालेले कव्वाल आवाज टीपेला नेऊन तराना गाऊ लागत, तेव्हा सगळा माहोल इश्क-ए-हकीकी बनायचा आणि औलीयांच्या चेहऱ्यावर मुस्कान दिसायची. तेव्हा मला जे समाधान मिळायचे ते मी बयाँच करू शकत नाही. मग त्यासाठी मला कोणी चापलूस म्हटलं तरी बेशक ! त्याचं काय आहे की जो पुढे येऊन समाजात काही तबदिली आणण्याची कोशिश करतो त्याला श्रेय आणि अपश्रेय दोन्ही घ्यावे लागते. हिंदुस्तानी मौसिकीचे गुण मला उमजले होते. मी तिचा निस्सीम चाहता होतो. या चाहतने आणि करम करतार औलीयाच्या आशीर्वादानेच फारसी आणि हिंदुस्तानी मौसिकीला एकत्र बांधण्याचा प्रयत्न केला. पुढे काही आमिलांनी तबला आणि सतारीची निर्मितीही माझ्या नावावर टाकून दिली. पण अल्लाह कसम ! मी कुठेच असे म्हटले नाही की हे सगळे मी केलंय”. त्याच्या या पोटतिडीकीच्या स्पष्टीकरणावर मी गंभीरपणे विचार करू लागले. त्याच्या बोलण्यात तथ्य होते. त्याने लिहिलेल्या कुठल्याच साहित्यात या रागांचा, तालांचा, गायन प्रकारांचा उल्लेख दिसला नव्हता. तो पहिल्यांदा दिसला, तो औरंगजेबाच्या काळात, म्हणजे साधारण तीनशे वर्षांनी, फकीरुल्लाह या संगीतज्ञाच्या ‘राग दर्पण’ या ग्रंथातून. याचा अर्थ अमीर खुस्रो आणि हिंदुस्तानी संगीत हे समीकरण खूप नंतर तयार झाले. खुस्रो हा मितभाषी, राजपत्रित अधिकारी होता. जलालुद्दीन खिलजीने त्याला ‘अमीर’ या पदवीने सन्मानित केले होते. एक प्रतिष्ठित अधिकारी म्हणून त्याला मान होता. आपले महत्व कसे राखावे, हा मुत्सद्दीपणा त्याच्यात भिनलेला होता. त्यामुळे त्याने मकाम पद्धतीने केलेले रागवर्गीकरण पुढे विद्यारण्य, व्यंकटमखीसारख्या संगीतज्ञांनी स्वीकारून ते संस्थान, मेल, ठाठ अशा नावांनी हिंदुस्तानी संगीताच्या प्रवाहात एकरूप होणे स्वाभाविक होते. जेव्हा एखादी नवीन गोष्ट प्रकाशात येते आणि ती पुढे दीर्घकाळ टिकून राहते, तेव्हा ती गोष्ट घडण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या संपूर्ण टीमचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला त्याचे यश अथवा अपयश सोसावे लागते, ही समाजाची धारणा इथे चपखल बसतेय असे माझ्या लक्षात आले. याचे एक जातिवंत उदाहरण मला इतिहासातच सापडले. पंधराव्या शतकात धृपद शैलीला अभिजात संगीताच्या प्रवाहात आणण्याचे श्रेय ग्वाल्हेरचा राजा मानसिंह तोमर याला जात असले तरी त्यासाठी संशोधन करून, लोकप्रिय करण्यासाठी नायक बक्षु, भन्नू, बैजू, अशी संगीतज्ञांची तुकडीच राजाच्या पदरी होती. त्यामुळे खऱ्या अर्थाने तुती- ए- हिंद असलेल्या अमीर खुस्रो आणि त्याचे गुरु हजरत निजामुद्दीन औलिया यांनी हिंदुस्तानी संगीतासाठी केलेली अजोड कामगिरी नाकारणे मला त्यांच्यावरच नव्हे तर हिंदुस्तानी संगीतावर अन्याय केल्यासारखे वाटू लागले. वरवरच्या किंवा सांगोवांगी गोष्टीमुळे आपण भरकटलो ही चूकही उमजली. अमीर खुस्रोची माफी मागितली पाहिजे, असे वाटून मी शेजारी पाहिले तर तो नव्हताच ! त्याच्या बरोबर केलेल्या मुशाफिरीने मन हलकं झालं होतं. मी सस्मित होऊन मग नेहेमीप्रमाणे प्रश्नांचे ढीग उपसून रिकाम्या टोपलीकडे पाहू लागले.  

Thursday, July 28, 2016

Rediscovering Veenatai Sahasrabuddhe – Exemplary artist of Paluskar Tradition


Rediscovering Veenatai Sahasrabuddhe – Exemplary artist of Paluskar Tradition 

                                                                                                                                                                                                                                                                                           Anjali Malkar

On 29th June this year, Veenatai departed, for the heavenly abode. She became one with the the eternal sound of the universe.  For the last four years, us, students were watching her, battling helplessly with an incurable disease.  We were in awe of Baba’s (Dr. Hari Sahasrabuddhe) ability to savor every precious moment with Veenatai, displaying strength to face the adversity with courage and fortitude.
As for me, I was fortunate to be her disciple for many years, the years when her career was on flight. Armed with a degree of M.A music, I joined her class and for ten years for at least three hours nearly every day, I had witnessed her magician-ship in singing.  Whether there be a festival, or a holiday, all the days in the year were converted into music celebration.  A simple and graceful woman, Veenatai was an ultimate example of an inspired musician for me. The obsession I experienced during those days is unforgettable. Veenatai purposefully avoided indulgence in matters other than music and focused on improvement in music making. She introduced to us to the compositions of Pt Ramashreya Jha, Pt Balwantrai Bhatt, and Pt. Vasant Thakar and also to the music of her father Pt. Shankar Shreepad Bodas and her brother Pt. Kashinath Shankar Bodas. Flawless both in words and tunes, she demonstrated the beauty of the compositions with great ease. When I joined her class, I was a small girl coming from a small town. Every class opened the deepest caves of musical treasure and I felt overwhelmed and desperate at the same time.  The glittering notes, meaningful words in the Bandish imbibed in us, the aesthetic beauty of lyrics in Classical music.
Veenatai was a humble musician.  As I remember, she never felt beneath to learn a particular bandish she needed for the cassette from a novice girl like me. She sat for hours with a Dagga to teach a large group of multileveled students in SNDT College even on fasting days without a slightest sign of exertion. Long after she resigned from the college, the department still cherished the memories of her dedication to the