लहजा
अंजली मालकर

शास्त्रीय
संगीत आस्वादनाच्या एका छोटेखानी मैफिलीत, रागसंगीतातल्या एका नवसाक्षर रसिकाने
मला विचारले ‘ का हो, तुमच्या बंदिशींमध्ये सैंया, सास, ननंद या शिवाय इतर विषय
नसतात का? आणि तुम्ही शब्द विसरल्यासारखे एकच शब्द सारखा का म्हणता? अशा
प्रश्नांमुळे ख्याल संगीतातील बंदिशींची घडण आणि हेतूकडे अधिक डोळसपणे पाहू लागले.
रागसंगीतातील इतर गायनप्रकारांमध्ये ख्यालसंगीत हा सर्वात आधुनिक प्रकार मानला
गेला आहे. धृपदातली रागशुद्धता, कव्वालीतली तानक्रिया आणि ठुमरी, दादरा,कजरी या
लोकगीतप्रकारातून आलेले शब्द, यांच्या संयोगाने या गायन प्रकाराची निर्मिती झाली
असे संगीतज्ञ मानतात. जेव्हा शब्दाधिष्ठीत काव्यप्रकार स्वराधिष्ठीत गायन प्रकार
म्हणून बदलले तेव्हा त्यांची अनेक कडवी गळून पडली. फक्त स्थायी आणि अंतरा ही दोनच
राहिली. मग या दोन कडव्यांना रागातील स्वरवाक्यांच्या झालरी लावून त्या मखरात एका
अमूर्त भावस्वप्नाची स्थापना करणे हा या गायन प्रकाराचा हेतू बनला. एकाच शब्दाला रागातल्या
अनेक स्वरवाक्यांनी खुलवणे ही त्या भावस्वप्नाकडे जायची एक रीत झाली. शब्द जरी तोच
तोच असला तरी त्यांची स्वर रीत वेगळी असते. शब्दावर स्वर मांड टाकून त्याला एका
अनामिक अवस्थेकडे नेतात, तेव्हा ही सुरांची भाषा अधिक बोलकी होते. स्वरांची झुंबरं
जर लक्षवेधी करायची, तर शब्द दालनाच्या भिंती साध्याच असाव्या लागतात. त्यामुळे
प्रेमासारखा चिरंतन विषय असो, जीवन तत्वज्ञान असो किंवा ऋतूवर्णन असो, सामान्य
लोकांना आवडेल, रुचेल अशा विषयवास्तूतून नादाच्या अनिर्बंध,असीम सफरीला नेणे या
गायनप्रकाराचे ध्येय बनले. ज्या शब्दांच्या पालख्या रागातले स्वर वाहून नेतात
त्यांची नक्षी मी आता अजून जवळून बघू लागले. शब्दोच्चाराबरोबरच
कुठल्याही
रागांचे स्वर, त्या स्वरांची लय, त्यांचे उच्चारण आणि त्यातून साधली गेलेली
भावप्रभा हा संस्काराचा परिणाम असतो. तो संस्कार गुरु शिष्यावर घडवत असतो. या
विचारांच्या दिशा मला प्रादेशिक रागांकडे घेऊन गेल्या. प्रादेशिक भाषेतले शब्द
तिथल्या संस्कृतीचा आरसा बनून, तिथल्या धुनांमध्ये न्हाऊन रागाच्या कोंदणात बसून
येतात तेव्हा त्यांचा सुवास रातराणीच्या फुलांसारखा दरवळतो. माझ्या डोळ्यासमोर
धनाश्री रागाची बंदिश तिच्या रंग वेषासाहित तरळू लागली. ‘थे म्हारो राजेंद्र,
मोह्यो मोह्यो ढिली नथवाली’ गाताना नाकात मोठे, जड नथ घातलेल्या राजस्थानातल्या मरूभूमीतल्या स्त्रिया आपल्या
श्रीमंतीचे प्रदर्शन करताना दिसू लागल्या. धनाश्रीतल्या स्वरांची लगबग लय, रागाची
छोटी स्वरवाक्य आणि गाताना ‘ढिली’ला दिलेला हलकासा झोका ! रंगीलो राजस्थानचे गानचित्र
उभे करून गेले.
जुन्या
बंदिशींच्या शोधात, अशाच एका बंदिशीने माझा ठाव घेतला तो ‘ ए नबी के दरबार, सब मिल गावो बसंत की मुबारकी’
या बसंतच्या बंदिशीने. बसंत रागाची चैनदार लय. स्वरांच्या लगावातली भव्यता आणि
दरबारातला बसंतोत्सव शब्दांमधून येताना तिचे सर्व सामाजिक, राजकीय संदर्भ घेऊन येत
होता. केवळ शब्दच नाही तर बंदिशींच्या व्यंजनांचे, त्यातल्या स्वराचा लहजा, नादोच्चाराच्या
वेगळ्या जाणीवा निर्माण करतात. ‘हँस हँस’ म्हणताना उच्चारलेला अनुनासिक ‘ह’ जेव्हा
छातीच्या पोकळीतून येतो, तेव्हा नकळत अस्फुट हास्याची भासमानता तयार होते. ‘रंग’
म्हणताना जेव्हा ‘र’ चा ‘रौं’ होतो, तेव्हा अनुनासिक तीव्रता साऱ्या रागछटेत गडदपणा
आणते. असं म्हणतात की सामगायन काळात प्रत्येक ऋचा गायनाचे फळ ठरलेले असायचे. आज
वाटते की ते फळ म्हणजे त्या नादोच्चारातून निर्माण झालेले नादवलय असावेत,
जे सजीवांना सुखाच्या जाणीवेपर्यंत घेऊन जायचे. रागदारी संगीतातील बंदिशी वाचताना,
ऐकताना मला वाटून गेले की यांच्या उच्चारणाच्या ढंगदार लकबी त्यांना जिवंत करतात.
त्यांच्यातला काव्यार्थ आणि काव्याला लगटलेला स्वरार्थ तिचे व्यक्तिमत्व घडवतातच
या शिवाय कलाकाराची गायकी देखील घडते. अशा बंदिशी आणि त्यातल्या गायकीचे
सांस्कृतिक मूल्य आतल्या खणात ठेवलेल्या वंशपरंपरेने चालत आलेल्या दागिन्यांसारखे असते.
एकदा का या घडणावळीचे मर्म
कळले की मग आत्मानंदाचा सुवास शतगुणित होतो. मन हलकं होतं. अत्तराचा सुगंध कुठूनसा
येऊन चित्तवृत्ती प्रफुल्लीत होते. कदाचित हाच परिणाम रागसंगीतातील बंदिशींमधून
अपेक्षित असावा.
लेखक
मित्राच्या प्रश्नातून घुसळून निघालेल्या विचार मंथनाने पारंपारिक बंदिशींकडे
बघण्याचा माझा दृष्टीकोन बदलला. ओबडधोबड काव्याच्या आडून त्यांची समाजाशी घट्ट
जोडलेली नाळ दिसून आली. रागाच्या एकत्वातून बंदिशींचे प्रादेशिक वैविध्य, देशाच्या
हरवलेल्या समृद्ध पाऊलवाटा दाखवून गेले.